जपानमधील मध्यममार्गी समजल्या जाणाऱ्या ‘लिबरल डेमोक्रॅटिक पक्षा’ने (एलडीपी) नेतृत्वबदल करून, सनाई तकाइची यांना पंतप्रधानपद दिले. या पदावरील त्या पहिल्याच महिला, पण त्यांचे राजकारण परंपरावादी…
सनाई तकाइची कोण आहेत?
जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या सनाई तकाइची या उदारमतवादी आणि मध्यममार्गी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एलडीपी’ पक्षातील अतिउजव्या विचारांच्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे केवळ पक्षातीलच नव्हे तर जपानी राजकारणातील कट्टर-उजवा चेहरा म्हणून पाहिले जाते. कठोर राष्ट्रवादी आणि पारंपरिक लैंगिक भेदभावाच्या भूमिकेचा पुरस्कार करणाऱ्या नेत्या अशी त्यांची ओळख आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच त्यांनाही परदेशी स्थलांतरित आणि ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबद्दल अढी आहे. राजकीयदृष्ट्या तकाइची माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांनी २००६ ते २००७ या काळात आबे यांच्या पहिल्या कार्यकाळात तसेच २०१२ ते २०२० या काळात विविध मंत्रीपदांवर काम केले होते.
शांततावादालाही विरोध?
जपानसारख्या साधारण समावेशक सामाजिक आणि राजकीय भूमिका घेणाऱ्या देशामध्ये सनाई तकाइची यांनी आपली अतिउजवी विचारसरणी कधीही लपवून ठेवली नाही. यासुकुनी हे दुसऱ्या महायुद्धात अ-वर्गाचे युद्ध गुन्हेगार म्हणून दोषी ठरवलेल्या सैनिकांचे स्मारक आहे. तिथे नियमित भेट देणाऱ्या मुख्य प्रवाहातील मोजक्या नेत्यांमध्ये तकाइची यांचा समावेश होतो.
महायुद्धात जपानी सैनिकांनी अत्याचार केले होते, हेही त्यांना मान्य नाही. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर या त्यांच्या आदर्श आहेत. जपानची पोलादी महिला होण्याची महत्त्वाकांक्षाही त्यांनी जाहीर केली आहे. चीन, उत्तर कोरिया व रशिया यांच्या संदर्भात आपली कठोर भूमिकाही त्यांनी लपवून ठेवलेली नाही. जपानचे शांततावादी संरक्षण धोरण लवकर बदलण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे.
‘एलडीपी’मध्ये नेतृत्वबदल का?
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ‘एलडीपी’च्या नेतृत्वाखालील आघाडीने सर्वोच्च कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहामधील बहुमत गमावले. त्यांना ४६५पैकी केवळ २१५ जागा जिंकता आल्या. आधीच्या निवडणुकीत त्यांच्याकडे २७९ जागांचे संख्याबळ होते. वरिष्ठ सभागृहातही ‘एलडीपी’प्रणीत आघाडीने बहुमत गमावले आणि १२५ सदस्यांच्या सभागृहात घसरण होऊन त्यांना केवळ ४७ जागांवर विजय मिळाला.
यापूर्वी २०२२च्या निवडणुकीत त्यांनी ७६ जागा जिंकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधान शिगेरु इशिबा यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सर्वोच्च कायदेमंडळाने ४ ऑक्टोबरला सनाई तकाइची यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यांनी २१ ऑक्टोबरला पदाची सूत्रे हाती घेतली.
‘एलडीपी’चा पराभव का?
जपानी नागरिकांना राजकारणात फारसा रस नाही, कोणताही पक्ष सत्तेत असला तरी फारसा बदल होत नाही, असे साधारण त्यांचे मत असते. त्यामुळे वर्षानुवर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘एलडीपी’ला आतापर्यंत पराभूत करण्यासाठी फारशी अनुकूलता जपानी मतदारांनी दाखवली नव्हती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप, त्यामध्ये अडकलेले ‘एलडीपी’चे लोकप्रतिनिधी यामुळे जनतेचा या पक्षावरील विश्वास उडाला होता. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला.
द्वेषमूलक राजकारण का वाढले?
जपानमध्ये गेल्या काही वर्षांत, विशेषत: ऑनलाइन व्यासपीठांवर द्वेष पसरवणारी प्रक्षोभक भाषणे आणि स्थलांतरितांविरुद्ध टोकाच्या भूमिकांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. या कट्टरतावादाला ‘सॅनसेइतो’सारखे पक्ष खतपाणी घालून त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशा पक्षांना राजकीय लाभ होऊ नये, यासाठी ‘एलडीपी’च्या नेत्यांनी पक्षातीलच अतिउजव्या चेहऱ्याला पसंती दिल्याचे मानले जाते.
‘सॅनसेइतो’चे राजकारण कसे?
जपानी नागरिकांची घटणारी कमाई, वाढती महागाई आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता, अशा वातावरणात सॅनसेइतो हा पक्ष जनतेला स्थलांतरितांची भीती दाखवण्यासारखा सोपा उपाय करून त्यांच्या चिंता आणि नैराश्याचा राजकीय फायदा लाटत आहे. अति-राष्ट्रवाद, छद्मा विज्ञान आणि सतत कटकारस्थानांचे सिद्धांत मांडणे ही या पक्षाची मुख्य धोरणे. या पक्षाने कोव्हिड-१९संबंधी चुकीची माहिती पसरवण्यात हातभार लावला होता.
समलिंगी विवाह आणि एलजीबीटीक्यू समुदायाच्या अधिकारांबद्दल तिरस्कार हीदेखील सॅनसेइतोच्या राजकारणाची वैशिष्ट्ये. पण, अशा पक्षाची लोकप्रियता आणि प्रसार थोपवण्यासाठी ‘एलडीपी’ने सनाई तकाइची यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवली आहेत. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. सध्या तरी ‘एलडीपी’कडे वेळ मारून नेण्यासाठी दुसरा उपाय नाही असे दिसते.
nima.patil@expressindia.com
