Satish Shah Death बॉलीवूड व टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेते ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’फेम अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश शाह मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी ‘न्यूज १८’ला सांगितले की, शाह यांनी यापूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) केले होते. त्यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे यश आणि धोके यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः जेव्हा शरीर प्रत्यारोपित अवयव नाकारते तेव्हा काय होते, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण अयशस्वी होण्याची कारणे काय? शरीरावर त्याचे काय परिणाम होतात? किडनी निकामी झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? त्याविषयी जाणून घेऊयात…
मूत्रपिंड प्रत्यारोपण
मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जेव्हा शरीरातील दोन्ही मूत्रपिंडे त्यांचे काम योग्यरीत्या करू शकत नाहीत, तेव्हा त्या व्यक्तीला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज भासते. अलीकडच्या काळात मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये रुग्णाच्या शरीरातील एक किंवा दोन्ही किडनी काढून टाकल्या जातात आणि त्याऐवजी दाताकडून किडनी दिली जाते. एखाद्या व्यक्तीची किडनी निकामी झाल्यास त्यांना डायलिसिस करावे लागते. परंतु, जेव्हा डायलिसिसचीदेखील मदत होत नाही, तेव्हा रुग्णांना प्रत्यारोपणाचा पर्याय निवडावा लागतो.
भारतात मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा खर्च सरासरी ५ लाख ते १५ लाख रुपये असतो. रुग्णालय, प्रत्यारोपणाचा प्रकार, रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि प्रत्यारोपणानंतरची काळजी यासारख्या अनेक घटकांवर हा खर्च अवलंबून असतो. वैद्यकीय उपचारांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्यारोपणाच्या यशाचा दर लक्षणीयरीत्या सुधारला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे, योग्य दाता मिळणे आणि प्रत्यारोपणानंतरची काळजी यामुळे रुग्ण आणि प्रत्यारोपित मूत्रपिंड (ज्याला ग्राफ्ट सर्व्हायव्हल म्हणतात) या दोन्हींच्या जगण्याच्या दरात गेल्या काही दशकांत सतत सुधारणा झाली आहे, असे ‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

प्रत्यारोपणानंतर एखादी व्यक्ती किती काळ जगू शकते, यावर अनेक घटक परिणाम करतात. मधुमेह किंवा हृदयविकार यांसारखे मोठे विकार नसलेले तरुण प्राप्तकर्ते अधिक चांगले जीवन जगतात. औषधे नियमित घेणे, नियमित तपासणी करणे आणि संसर्गावर नियंत्रण ठेवणेदेखील यात महत्त्वाचे ठरते. एकूणच, डायलिसिसवर असलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांचे आयुष्यमान अधिक असते, असेही ‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
मूत्रपिंड प्रत्यारोपण अयशस्वी होण्याची कारणे काय?
मूत्रपिंड प्रत्यारोपण अयशस्वी होण्याला ग्राफ्ट लॉस देखील म्हणतात. जेव्हा प्रत्यारोपित मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करणे थांबवते, तेव्हा ही स्थिती उद्भवते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे, संसर्ग, औषधांशी संबंधित समस्या किंवा अंतर्निहित आरोग्य स्थिती यासह अनेक घटक प्रत्यारोपित मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. ‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार खालील घटक मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकतात…
१. प्रत्यारोपित मूत्रपिंड शरीर का नाकारते?
कधीकधी प्राप्तकर्त्याची रोगप्रतिकारक शक्ती नवीन मूत्रपिंड स्वीकारत नाही आणि त्यावर हल्ला करते. हे सहसा प्रत्यारोपणानंतर पहिल्या काही महिन्यांत ते वर्षाच्या आत घडते. इंडियन जर्नल ऑफ नेफ्रोलॉजी मधील अभ्यासानुसार, यामुळे सुमारे १० ते १५ टक्के प्राप्तकर्ते प्रभावित होतात. परंतु, लवकर निदान झाल्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे दिल्यास यावर उपचार करता येतात.
क्रॉनिक रिजेक्शन : ही स्थिती अनेक वर्षांमध्ये विकसित होते. शरीराने दीर्घकाळ नकार दिल्यामुळे मूत्रपिंडाच्या ऊतींचे नुकसान होते, ज्यामुळे कार्यक्षमतेत घट होते. दीर्घकाळ ग्राफ्ट अयशस्वी होण्याचे हे सर्वांत सामान्य कारण आहे.
औषधांचे पालन न करणे : रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित ठेवणाऱ्या औषधांचे डोस चुकवल्यास नकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
२. रक्तवहिन्यांसंबंधीची गुंतागुंत (व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन)
रक्ताच्या गुठळ्या : प्रत्यारोपित मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या रक्तप्रवाह रोखू शकतात, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते. या परिस्थितीत मूत्रपिंड काढून टाकण्याची आवश्यकता भासू शकते.
३. संसर्ग (इन्फेक्शन)
विषाणूजन्य संसर्ग : साइटोमेगॅलोव्हायरस (CMV), बीके विषाणू (BK virus) किंवा एबस्टीन-बार विषाणू (Epstein-Barr virus) यांसारखे विषाणू मूत्रपिंडाचे थेट नुकसान करू शकतात किंवा रोगप्रतिकारक प्रतिसादावर परिणाम करू शकतात. त्यामुळे ग्राफ्टला हानी पोहोचते. विशेषतः बीके विषाणू हा प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड खराब होण्याचे सामान्य कारण आहे.
जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य संसर्ग : रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे हे होऊ शकते. त्यामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमकुवत होते आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.
४. मूळ मूत्रपिंड विकाराची पुनरावृत्ती
काही मूत्रपिंड विकार ज्यामुळे मूळ मूत्रपिंड निकामी झाले होते, जसे की ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोस्केलेरोसिस (एफएसजीएस) किंवा ल्युपस नेफ्रायटिससारखी परिस्थिती पुन्हा उदभवू शकते. त्यामुळे ग्राफ्टचे नुकसान होते किंवा ते निकामी होते. एफएसजीएसमध्ये पुनरावृत्तीचा दर जास्त असतो.
५. औषधांचा शरीरावरील दुष्परिणाम
रोगप्रतिकारक औषधांचे दुष्परिणाम : कॅल्सीन्यूरिन इनहिबिटर (उदा. टॅक्रोलिमस किंवा सायक्लोस्पोरिन)सारखी औषधे नकार टाळण्यासाठी आवश्यक आहेत; परंतु कालांतराने ती मूत्रपिंडासाठी विषारी ठरू शकतात. त्यामुळे कॅल्सीन्यूरिन इनहिबिटरमुळे नेफ्रोटॉक्सिसिटी म्हणून ओळखले जाणारे नुकसान होते.
६. शस्त्रक्रिया किंवा तांत्रिक गुंतागुंत
मूत्रगळती किंवा अडथळे : मूत्रवाहिनी (मूत्रपिंडाला मूत्राशयाशी जोडणारी नळी)शी संबंधित समस्यांमुळे मूत्रगळती किंवा मूत्रप्रवाहात अडथळा येऊ शकतो. त्यावर वेळेत उपचार न केल्यास मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.
७. दात्याशी संबंधित घटक
दात्याच्या मूत्रपिंडाची निकृष्ट गुणवत्ता : ज्येष्ठ दात्यांकडून किंवा पूर्वीपासून असलेल्या विकारांसह मिळालेल्या मूत्रपिंडांचे दीर्घायुष्य कमी असू शकते. दात्याच्या मूत्रपिंडातून आलेले संसर्ग किंवा कर्करोगही ग्राफ्टला धोका पोहोचवू शकतात.
८. प्राप्तकर्त्याचे आरोग्य
शरीरातील इतर विकार: मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यांसारख्या स्थितींमुळे प्रत्यारोपित मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. त्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.
जीवनशैली घटक : खराब आहार, धूम्रपान किंवा पाठपुराव्याचा अभाव ग्राफ्टच्या (मूत्रपिंड प्राप्तकर्त्याच्या) जगण्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे धोके
मूत्रपिंड प्रत्यारोपण सामान्यतः यशस्वी होत असले तरी त्याचे धोके समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. या शस्त्रक्रियेच्या धोक्यांमध्ये रक्तस्राव, संसर्ग, नवीन मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या, मूत्रगळती किंवा अडथळा यांचा समावेश होतो. हे धोके सहसा शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर लगेच दिसून येतात. सर्वांत मोठा सततचा धोका म्हणजे नकार. १५ ते २० टक्के प्राप्तकर्त्यांचे शरीर नवीन अवयव नाकारते; मात्र चांगल्या औषधांमुळे याचाही दर आता कमी झाला आहे.
इतर धोक्यांमध्ये मूत्रपिंड दात्याशी संबंधित समस्या समाविष्ट आहेत, जसे की संसर्ग किंवा कर्करोग संक्रमित होणे. ज्येष्ठ व्यक्ती, गंभीर हृदयविकार, सक्रिय कर्करोग किंवा औषधांचे पालन न केलेल्या रुग्णांना याचा जास्त धोका असतो. हे धोके टाळण्यासाठी प्राप्तकर्त्यांना वारंवार तपासणी, निरोगी जीवनशैली आणि आजारी लोकांशी संपर्क टाळणे आवश्यक आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण अनेकांना दीर्घायुष्य प्रदान करते; परंतु त्यासाठी काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
