मुंबई तसेच इतर शहरी भागात कबुतरांची संख्या बेफाम वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसाला श्वसनाचे विकार होत असल्याने कबुतरांना खाणे देण्यावरून वाद सुरू आहेत. तर दुसरीकडे तिकडे अमेरिकेत कबुतरांच्याच जातकुळीतला ‘डोडो’ नावाचा नामशेष झालेला पक्षी पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत.
डोडो कधी, कुठून नामशेष झाला?
कबुतराच्या जातीतला पण बदकासारखा आकाराने मोठा पक्षी सुमारे ४०० वर्षांपूर्वी नामशेष झाला. हा पक्षी मॉरिशसमध्ये आढळला होता. डोडो इ.स. १६०० च्या उत्तरार्धात नामशेष झाला. मानवाने १५९८ मध्ये मॉरिशस बेट शोधले. त्यानंतर शंभर वर्षांतच डोडो संपला. म्हणजे मॉरिशसचा शोध लागण्याआधीपासून तो तिथे होता. हा पक्षी ‘नामशेष होणे’ या संकल्पनेचे प्रतीक मानला जातो. इंग्रजीत ‘डेड अॅज अ डोडो’ हा वाक्प्रचार डोडो पक्षावरून प्रचलित आहे.
डोडो कसा दिसत होता?
डोडो पक्षाचे शास्त्रीय नाव राफस कुकुलाटस (Raphus cucullatus) आहे. हा कबुतर आणि पारव्यांच्या कुळाशी नातं सांगणारा होता. त्याची उंची साधारण १ मीटर तर वजन १० ते १८ किलो होते. चोच मोठी, शरीर जाडसर होते. त्याला लहानसे पंख होते, पण तो उडू शकत नसे. मॉरिशस बेटावरील जंगलात त्याचा अधिवास होता. हे पक्षी प्रामुख्याने फळं, बिया, सुकामेवा, मुळं खात.
डोडो नामशेष होण्याची कारणे काय?
मानवी शिकारीमुळे या पक्षांची संख्या कमी झाली. खलाशी त्यांना मांसासाठी मारत. माणसांनी वस्ती वाढवली तसे तिथे अन्य प्राणी देखील आले. माणसांनी आणलेली डुकरं, उंदीर आणि माकडे डोडोची अंडी खात आणि घरटी उद्ध्वस्त करत. मानवी वस्ती वाढल्यामुळे जंगलतोड होऊन परिणामी डोडोचे नैसर्गिक निवासस्थान नष्ट झाले.
डोडोबद्दल माहिती कशी मिळाली?
सुरुवातीच्या डच खलाशांनी व प्रवाशांनी त्यांच्या प्रवासवर्णनांत डोडोचे वर्णन केले होते. काही कलाकारांनी त्याची चित्रं काढली. त्यामुळे डोडोच्या रूपरेषेबाबत पहिली माहिती मिळाली.
१९व्या शतकात मॉरिशस मधील Mare aux Songes या दलदलीत डोडोची हाडे मोठ्या प्रमाणात सापडली. सांगाडे, कवटी, हाडांचे तुकडे यांवरून त्याची शारीरिक रचना पुन्हा उभी करण्यात आली. आज जगभरातील संग्रहालयांत डोडोचे अवशेष आहेत.
या पक्षाचे पुनरुज्जीवन कसे होणार?
टेक्सास स्थित कोलोस्सल बायोसायन्सेस ही कंपनी डोडोची नामशेष प्रजाती पुन्हा निर्माण काम करत आहे. याआधी या कंपनीने डायर वुल्फ (लांडग्याची एक नामशेष प्रजाती) आणि हत्तीच्या एका नामशेष प्रजातीच्या प्राण्यावर प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगांना ‘डी-एक्स्टिंक्शन’ (De Extinction) असे संबोधले जाते. वैज्ञानिकांनी डोडोच्या हाडं आणि पिसांमधून डीएनए (जनुके) वेगळी काढली आहेत. या जनुकांच्या अभ्यासातून डोडोचा कबुतरं-पारव्यांशी असलेला संबंध स्पष्ट झाला. आधुनिक CRISPR-Cas9 सारख्या तंत्रांचा वापर करून डोडोच्या जनुकांतील वैशिष्ट्ये कबुतरांच्या जनुकांमध्ये घालण्याचा प्रयत्न चालू आहे. डोडो नामशेष झाला असला तरी त्याचा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणजे निकोबार कबुतर हा पक्षी आजही जिवंत आहे. वैज्ञानिक या जिवंत कबुतरांच्या पेशींमध्ये डोडोचे डीएनए समाविष्ट करण्याचे प्रयत्न करत आहेत. या पेशींमध्ये डोडोचे विशिष्ट जीन्स टाकून डोडो-सदृश प्रजाती तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
वैज्ञानिक अडचणी कोणत्या?
पक्ष्यांच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया प्राण्यांच्या तुलनेत क्लिष्ट असते. कारण पक्षी अंड्यात विकसित होतात. पक्ष्यांना सस्तन प्राण्यांप्रमाणे क्लोन करता येत नाही. त्यामुळे या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर दोन पिढ्यांचे प्रजनन चक्र पार करावे लागते. याशिवाय नामशेष प्रजातींची पर्यावरणीय, संप्रेरकांशी संबंधित (हार्मोनल) आणि विकास प्रक्रियेतील गुंतागुंत पुन्हा निर्माण करणे अवघड आहे.
शिवाय डोडोचा पूर्ण डीएनए शाबूत नाही; तो तुकड्यांमध्येच मिळाला आहे. डोडोचे नैसर्गिक वातावरण (मॉरिशसचे अरण्य) आज बऱ्याच प्रमाणात बदललेले आहे. त्यामुळे जरी डोडो परत आणला तरी त्याचे नैसर्गिक जगणे कठीण होऊ शकते. काही शास्त्रज्ञ मानतात की नामशेष प्रजाती परत आणण्यापेक्षा आज जिवंत असलेल्या धोक्यातील प्राण्यांना वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे.
पण तरीही डोडो ‘जिवंत करण्याचा’ प्रयत्न हा मानवी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठा टप्पा ठरू शकतो. हे तंत्रज्ञान पक्षी संवर्धनासाठी उपयुक्त ठरू शकते. नामशेष होण्याचा धोका असलेल्या प्रजातींच्या जनुकांमध्ये बदल करून त्यांना आजार किंवा बदलत्या पर्यावरणाशी लढण्याची क्षमता दिली जाऊ शकते.