Shah Rukh Khan’s National Award Sparks Controversy: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जवान या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये जल्लोष साजरा झाला, मात्र या निर्णयावर शंका उपस्थित करत अनेकांनी मनोज बाजपेयीचा अभिनय अधिक प्रभावी असल्याचं सांगितलं. स्वतः मनोज बाजपेयी यांनीही या पार्श्वभूमीवर मौन सोडत पुरस्कारांचा दर्जा आणि त्यामागील प्रक्रियेवर थेट बोट ठेवत, प्रश्नचिन्हच उपस्थित केलं आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारापासून मनोज बाजपेयींच्या वक्तव्यापर्यंत नेमकं काय घडलं, याचीच चर्चा रंगू लागली आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृतींना दिला जाणारा मानाचा सन्मान. १९५४ साली हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. भारत सरकारने हा सोहळा देशभरात निर्मिती झालेल्या चित्रपटांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यासाठी आणि भारतीय कला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केला. १९७३ ते २०२० पर्यंत त्यांचे आयोजन भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने केले, तर २०२१ पासून हे काम नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (NFDC) सोपवण्यात आले आहे. दरवर्षी सरकारने नियुक्त केलेले तज्ज्ञ या पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करतात. नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केले जाते, जिथे पुरस्कारप्राप्त चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले जातात. या सन्मान सोहळ्यात संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृतींना सन्मानित केले जाते, तसेच प्रत्येक भारतीय भाषा आणि प्रांतातील सर्वोत्तम चित्रपटांनाही गौरवण्यात येते.

पुरस्कारांसाठी नियमावली

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे फीचर फिल्म्स आणि नॉन-फीचर फिल्म्स अशा दोन मुख्य विभागांत दिले जातात. या पुरस्कारांसाठी परीक्षकांची निवड एनएफडीसी करते. पुरस्कारासाठी चित्रपट पात्र ठरण्यासाठी ठरावीक नियम आहेत. दरवर्षी देशभरातील १०० हून अधिक चित्रपट या दोन्ही विभागांत (फीचर आणि नॉन-फीचर) सहभागी होतात आणि पात्र ठरतात.

नॅशनल फिल्म अवॉर्ड रेग्युलेशन्स

दरवर्षी नॅशनल फिल्म अवॉर्ड रेग्युलेशन्स नावाच्या नियमावलीत या स्पर्धेचे नियम जाहीर केले जातात. पात्रतेच्या नियमांमध्ये अनेक अटी आहेत. त्यातील एक महत्त्वाची अट म्हणजे चित्रपट निर्माते, विशेषतः दिग्दर्शक, भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. चित्रपटाची निर्मिती भारतात झालेली असावी. परदेशी भागीदारीत तयार झालेल्या सह-निर्मितीच्या बाबतीत चित्रपट पात्र ठरण्यासाठी सहा अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

(Source: Instagram/@sabyasachiofficial)

परीक्षकांकडे विचारार्थ जाण्यासाठी चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रमाणपत्र मिळालेलं असणं आवश्यक असतं. एखादा चित्रपट फीचर फिल्म आहे की, नॉन-फीचर फिल्म, याचा निर्णय फीचर फिल्म परीक्षक मंडळ घेतं. पात्रतेच्या यादीत अशा नियमांचाही समावेश असतो, ज्यांत स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोणते चित्रपट स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत.

शाहरुख खानचा पुरस्कार वादग्रस्त का ठरतोय?

शाहरुख खानला जवान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर मनोज बाजपेयीला त्याच्या पाहिल्याच चित्रपटासाठी ‘सत्या’साठी हा सन्मान मिळाला होता. त्यानंतर पिंजर (२००३) आणि अलिगढ (२०१६) या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जवान या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्तम अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची घोषणा होताच त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. सोशल मीडियावर अभिनंदनाच्या संदेशांचा अक्षरशः वर्षाव झाला.

मात्र, काही रसिक प्रेक्षकांना हे आवडलं नाही. त्यांचं म्हणणं होत की, मनोज बाजपेयी यांनी सिर्फ ‘एक बंदा काफी है’ मध्ये अधिक प्रभावी अभिनय केला होता आणि त्यांनाच हा पुरस्कार मिळायला हवा होता.

मनोज बाजपेयी नेमकं काय म्हणाले?

त्यानंतर, मनोज बाजपेयी यांनी शाहरुख खानला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि दोघांच्या अभिनयाची तुलना यावर भाष्य केलं आहे. त्यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, “ही चर्चा निरुपयोगी आहे, कारण आता सगळं संपलं आहे. सिर्फ एक बंदा काफी है बाबत बोलायचं झालं तर हो, हा माझ्या फिल्मोग्राफीमधील एक अत्यंत खास चित्रपट आहे आणि जो राम सुद्धा तसाच आहे. हे दोन्ही चित्रपट माझ्या कारकिर्दीत नेहमी वरच्या स्थानावर राहतील. पण मी या गोष्टींवर चर्चा करत नाही कारण ही हरलेल्या लोकांची चर्चा आहे. तो भूतकाळ आहे, तो सोडून दिला पाहिजे.”

पुरस्काराचा दर्जा खालावतोय?

राष्ट्रीय पुरस्कार हळूहळू आपली महत्त्वाची ओळख गमावत आहेत आणि व्यापारी चित्रपटसृष्टीकडे झुकत आहेत, याबद्दल मनोज बाजपेयी याने आपलं मत परखडपणे मांडलं. ते सांगतात, “ही गोष्ट फक्त राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल नाही. हे सगळ्या त्या पुरस्कारांबद्दल आहे, ज्यांना कधी काळी खूप मान दिला जात होता. परंतु, हे पुरस्कार आता कसे दिले जातात, याबद्दल खरंच विचार करायला हवा. कारण हा माझ्या सन्मानाचा प्रश्न नाही. मी जेव्हा एखादा चित्रपट निवडतो, तेव्हा मी माझ्या सन्मानाची खूप काळजीपूर्वक जपणूक करतो आणि अभिनेता म्हणून माझ्या जबाबदाऱ्याही गंभीरपणे पार पाडतो. पण, या पुरस्कारांबद्दल ते देणाऱ्या प्रत्येक संस्थेने स्वतः विचार करायला हवा. ही माझी जबाबदारी नाही. कुणी स्वतःचा मान गमावत असेल तर त्याने त्याबद्दल विचार करायला हवा.” मनोज बाजपेयी यांनी मान्य केलं की, विविध भाषांमधील आणि प्रकारांतील चित्रपट व अभिनयामुळे त्यांना पुरस्कार सोहळ्यांच्या संकल्पनेवरच विश्वास नाही. ते म्हणाले, “माझ्यासाठी पुरस्कार सोहळ्याची कल्पनाच चुकीची आहे.”

पुरस्कार घरसजावटीचाच एक भाग

मनोज यांनी हेही स्पष्ट केलं की, ते फक्त आयोजकांचा आदर राखण्यासाठी पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतात, पण एखादा पुरस्कार मिळाला म्हणून त्याला फारसं महत्त्व देत नाहीत. ते म्हणाले, “हा फक्त घरातील सजावटीचा एक भाग आहे. तुम्ही दररोज त्याच्यासमोर उभं राहून ‘वा, मला हा मिळाला’ असं म्हणणार नाही.”

हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार ठरला आहे. तर मनोज बाजपेयी यांनी आपल्या पहिल्याच चित्रपट सत्यासाठी हा सन्मान पटकावला होता. त्यानंतर २००३ मध्ये पिंजर आणि २०१६ मध्ये अलिगढ या चित्रपटांसाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.