“माझे वय ८२ होऊ द्या किंवा ९२ होऊ द्या; मी अजूनही कार्यरत आहे आणि आणखी जोमाने काम करणार”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार शरद पवार यांनी ६ जुलै रोजी दिल्ली येथे दिली. २ जुलै रोजी शरद पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या सभेत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरून राजकारण्यांच्या निवृत्तीबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. राजकारणी स्वतःहून निवृत्ती घेतात का? भारतात राजकारण्यांच्या निवृत्तीचे निश्चित वय आहे का? शरद पवार यांना समकालीन असलेले कोणकोणते राजकीय नेते अजूनही पक्षावर किंवा राजकारणावर पकड ठेवून आहेत? याची सविस्तर माहिती या लेखात घेतली आहे. भारतात एक नेते असे आहेत, जे ९९ वर्षांचे आहेत आणि केवळ प्रकृती खालावल्यामुळे नाईलाजाने घरी बसले आहेत. तर दुसरे एक नेते ९२ वर्षी रणरणत्या ऊन्हात प्रचारासाठी बाहेर फिरत आहेत.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात पवारांच्या वयाचा मुद्दा काढल्यामुळे राजकारण व राजकारण्यांचे वय हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “८२ झाले, ८३ झाले; तुम्ही कधी थांबणार आहात की नाही”, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता. तसेच तुमचे वय झाले असून, तुम्ही बाजूला व्हा आणि आम्हाला आशीर्वाद द्या, अशीही मागणी अजित पवार यांनी केली होती. शपथविधीनंतर अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे घोषित करून स्वतःला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केले. त्यांनी पुढे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचाही उल्लेख केला. लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांनी ७५ व्या वर्षी कशी निवृत्ती घेतली, याचे उदाहरण त्यांनी दिले. जुन्या नेतृत्वाने नव्या नेत्यांना संधी दिली, तरच नवे नेतृत्व तयार होईल, असेही अजित पवार म्हणाले.

ajit pawar
“मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; ‘या’ नेत्याने दिला इशारा
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
Akhilesh Yadav
रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

अजित पवार यांनी वयाचा उल्लेख करून टीका केल्यानंतर आपल्या वडिलांची बाजू मांडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या. त्यांनी म्हटले की, “अमिताभ यांचे वय ८२ आहे आणि अजूनही ते सक्रिय आहेत. काही लोकांना वाटते की, इतरांनी फक्त वय वाढल्यामुळे बाजूला होऊन आशीर्वाद द्यावेत. पण, त्यांनी आशीर्वाद का द्यावेत? रतन टाटा हे साहेबांपेक्षा (शरद पवार) तीन वर्षांनी मोठे आहेत आणि अजूनही देशातील सर्वांत मोठी कंपनी ते चालवत आहेत.” शरद पवार यांची बाजू मांडण्यासाठी केवळ सुप्रिया सुळेच पुढे आल्या नाहीत; तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादवदेखील समोर आले. लालूप्रसाद स्वतः ७५ वर्षांचे आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सांगितले की, राजकारणात निवृत्तीचे कोणतेही ठराविक वय नसते.

हे वाचा >> “वय आता ८२ झालं, ८३ झालं तरीही…” अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या निवृत्तीचाच मुद्दा केला उपस्थित

फक्त अजित पवार यांनी सांगितले म्हणून त्यांनी (शरद पवार) यांनी निवृत्त व्हावे का? वृद्ध कधीही राजकारणातून निवृत्त होत नाहीत? राजकारणात निवृत्तीचे वय निश्चित नाही, अशी प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते काही चुकीचे बोलले नाहीत. भारतातील राजकीय पुढाऱ्यांच्या यादीवर नजर मारली, तर ही बाब लक्षात येते. क्वचितच एखाद्या नेत्याने स्वतःहून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असेल. अनेकदा प्रकृतीच्या कारणास्तव नाइलाजाने पुढाऱ्यांना पाय मागे घ्यावे लागतात.

ऐंशी ओलांडलेले भारतीय राजकारणी

मल्लिकार्जुन खर्गे

८३ वर्षीय शरद पवार ५६ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. भारतातील अनेक राजकीय पक्षांत असे अनेक पुढारी आहेत की, जे वर्षानुवर्षे सक्रिय राजकारणात योगदान देत आहेत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ८० वयाचे आहेत. एक वर्षापूर्वीच त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून, पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अजूनही ते सक्षम आहेत. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली; ज्यामध्ये खर्गे यांनी बाजी मारली. पण, त्या तुलनेने तरुण नेते शशी थरूर यांचा पराभव झाला होता.

अमरिंदर सिंग

काँग्रेसचे माजी नेते अमरिंदर सिंग यांचेही वय ८१ झाले असून, ते अजूनही सक्रिय आहेत. मुख्यमंत्रीपदावरून बाजूला केल्यामुळे नाराज झालेल्या अमरिंदर सिंग यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये स्वतःचा पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी स्वतःचा पक्ष भाजपामध्ये विलीन केला.

फारूख अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते फारूख अब्दुल्ला यांचे वय ८५ आहे. दिल्लीच्या राजकारणात फारूख अब्दुल्ला यांची चांगली लोकप्रियता आहे. जम्मू आणि काश्मीरमधून त्यांना निवडणुकीत कधीही पराभवाचे तोंड पहावे लागले नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये, अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, ते आता नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे पुन्हा अध्यक्ष होऊ शकत नाहीत. ३४ वर्षांपासून ते या पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचे जाहीर केले. फारूख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि चार वेळा श्रीनगरचे खासदार राहिले आहेत. सध्या ते संसदेचे सदस्य असून नवी दिल्ली येथे येऊन प्रत्येक अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतात, तसेच श्रीनगर येथे पक्षाच्या बैठकांनाही हजर राहतात.

हे ही वाचा >> “शरद पवार यांचं वय ८३ आहे हे सांगून काही लोक….”, देवेंद्र फडणवीस यांची टीका

व्हीएस अच्युतानंदन

केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन हे ९९ वर्षांचे आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक असलेले अच्युतानंदन ८५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी १९३८ साली आधी काँग्रेस पक्ष आणि त्यानंतर १९४० साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. १९६४ मध्ये ३२ सदस्यांनी एकत्र येऊन मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती, त्यापैकी एक अच्युतानंदन होते. अच्युतानंदन हे व्हीएस या नावाने लोकप्रिय आहेत. त्यांनी २००६ ते २०११ या काळात केरळचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. त्यावेळी त्यांचे वय ८२ वर्ष सात महिने एवढे होते. केरळ आणि देशातील सर्वात वृद्ध मुख्यमंत्री म्हणून अच्युतानंदन यांची ओळख झालेली आहे. २०१६ साली वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती.

२०१९ साली अच्युतानंदन यांना हृदय विकाराचा किरकोळ झटका आल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत ते पक्षासाठी गर्दी जमवणारे नेते म्हणून लोकप्रिय होते. ९६ वर्षांचे असतानादेखील ते पक्षासाठी जाहीर सभा घ्यायचे, मिरवणुकीत सहभागी व्हायचे.

एचडी देवेगौडा

भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हे महाराष्ट्राच्या बाजूच्या राज्यात असलेले आणखी एक नेते, ज्यांना वयाचे बंधन नाही. मे २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या प्रचारासाठी वयाच्या ९० व्या वर्षीही देवेगौडा जाहीर सभा आणि मिरवणूकत सहभागी झालेले पाहायला मिळाले. निवडणुकीच्या काही महिने आधीच देवेगौडा रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र पक्षाच्या प्रचारासाठी ते राज्यभर दौरा करत होते. त्यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी यांना ऊनाचा त्रास होऊ लागल्यामुळे ते भर प्रचाराच्या दरम्यान रुग्णालयात दाखल झाले होते, मात्र ९० वर्षीय वडील प्रचारातून मागे हटले नाहीत. कर्नाटकमध्ये देवेगौडा ‘२४ तास राजकारणी’ या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत.

निधन पावलेले आणि शेवटपर्यंत सक्रिय राहिलेले नेते

निधन झालेल्यांपैकी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल, द्रमुक पक्षाचे करुणानिधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनीही अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रियता दाखविली होती.

प्रकाश सिंग बादल

प्रकाश सिंग बादल यांचे एप्रिल २०२३ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. निधनाच्या एक वर्ष आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत लांबी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. पाचवेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या बादल यांचा ‘आप’ पक्षाच्या गुरमित सिंग खुदीया यांनी पराभव केला. विधानसभा निवडणूक लढविणारे सर्वाधिक वयाचे नेते म्हणून प्रकाश सिंग बादल यांचे नाव घेतले जाईल. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही प्रकाश सिंग बादल घरी न बसता राज्यभर दौरा करत होते. सहा दशकाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना केवळ दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला.

आणखी वाचा >> अजित पवारांना ७५ वर्षांचे छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर कसे चालतात ?

एम. करुणानिधी

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते करुणानिधी हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक होते. ऑगस्ट २०१८ साली वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तोपर्यंत त्यांनी पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यंमत्रीपद भूषविले. निधन होईपर्यंत तब्बल ४९ वर्ष त्यांनी द्रमुक पक्षाचे नेतृत्व केले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी राजकारणात सहभाग घेतला. ६१ वर्षांच्या कारकिर्दीत ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते म्हणून शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनीही दिर्घकाळ राजकारण केले. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. शेवटपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे एक मोठा जनाधार होता. निधनाच्या एक वर्ष आधी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण केले होते. २०१२ साली दसरा मेळाव्याच्या एक महिना आधी त्यांचे निधन झाले असले तरी या मेळाव्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ संदेश चित्रीत करून ठेवला होता. हा व्हिडिओ संदेश ऐकण्यासाठी त्यावर्षी शिवाजी पार्कवर असंख्य शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

मुलायम सिंह यादव

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे १० ऑक्टोबर २०२२ साली वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. उत्तर प्रदेश राज्यातील शक्तीशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती. २०१९ साली त्यांचा मैनपूरी लोकसभा मतदारसंघातून विजय झाला होता. निवडणूक लढवत असताना ही त्यांची शेवटची निवडणूक असेल, असे त्यांनी जाहीर केले होते.

भाजपामधील अलिखित निवृत्ती नियम

‘पार्टी विथ डिफरन्स’ या तत्त्वाने भाजपा पक्ष कार्यरत असतो, असे त्यांचे नेते नेहमी सांगत असतात. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने वयाच्या पंच्याहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना सरकार आणि संघटनेतून निवृत्त करण्याचा अलिखित नियम केला असल्याचे काही उदाहरणांमधून दिसले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्वतः याबद्दल सांगितले होते. पंच्याहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये प्रशासकीय पदे स्वीकारू नये, असे आवाहन त्यांनी केले होते.

वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना सक्रिय राजकारणातून बाजूला व्हावे लागले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, जसवंत सिंह आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. ऑगस्ट २०१६ मध्ये, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ७४ वर्ष पूर्ण होताच, त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

बीएस येडियुरप्पा यांनी जुलै २०२१ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. वयोमानामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते, तसेच यावर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देण्यात आली नाही. तरीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ लोकसभा निवडणुकीत ७३ वर्षांचे होणार आहेत. त्यांचे स्वतःचे वय ७५ वर्ष झाल्यानंतर ते काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे. एक गोष्ट मात्र नक्की की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफाट लोकप्रियता असून त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. शेवटी भारताच्या राजकारणात पुढाऱ्यांसाठी वय हा फक्त आकडा आहे.