Shefali Jariwala Death: वयाच्या ४२ व्या वर्षी शेफाली जरीवालाचे अनपेक्षित निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला. ‘कांटा लगा’फेम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल हिचा २७ जूनला राहत्या घरी अचानक मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री तिचा पती अभिनेता पराग त्यागी याने तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल केले, मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. शेफालीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप तपासातून निष्पन्न झाले नसले तरी सुरुवातीच्या अहवालांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय वर्तविला जात आहे. उपवासादरम्यान रिकाम्या पोटी औषधे घेतल्याने हा झटका आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तिच्या मृत्यूचे ठोस कारण समोर आले नसले तरी रिकाम्या पोटी औषधे घेण्याच्या धोक्यांबद्दल तसंच अँटी-एजिंग किंवा कॉस्मेटिक उपचारांबद्दल सध्या चर्चा होत आहे.
रिकाम्या पोटी औषधे घेतल्यास काय होते?
अन्नाशिवाय औषधे घेतल्याने गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा ते अधिक संवेदनशील असतं. याचा अर्थ काही औषधे प्रामुख्याने दाहकविरोधी औषधे, स्टिरॉइड्स आणि काही सप्लिमेंट्स यामुळे जळजळ किंवा गंभीर परिणाम होऊ शकतात.
मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयातील इंटरनल मेडिसिनमधील सल्लागार डॉ. ऋतुजा उगलमुगले यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, अन्नाशिवाय औषध घेतल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. “कमी रक्तदाब, चक्कर येणे, बेशुद्ध होणे किंवा अगदी हृदयविकार असे परिणाम होऊ शकतात. हे प्रामुख्याने अँटी-हायपरटेन्सिव्ह किंवा हृदयरोगासारख्या औषधांच्या बाबतीत घडू शकते. रिकाम्या पोटी औषधे घेतल्याचे परिणाम हे फक्त अस्वस्थता किंवा मळमळ इथपर्यंत मर्यादित नसते. काही प्रकरणांमध्ये रिकाम्या पोटी औषधांचे सेवन केल्यास त्यांचे शोषण जलदगतीने होते. यामुळे रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो, हात-पाय थरथरू लागतात, शुद्ध हरपते किंवा हृदयाची अनियमितता उद्भवू शकते. एकाच वेळी अनेक औषधे घेतल्यासही ही लक्षणे आणखी वाढण्याची शक्यता असते, ही स्थिती पॉलीफार्मसी म्हणून ओळखली जाते.
दिल्लीतील सीके बिर्ला रुग्णालयातील प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला यांनी नमूद केले की, “जेव्हा अनेक औषधे किंवा इंजेक्शन्स एकत्र केली जातात आणि तेही पोटात अन्न नसताना तेव्हा शरीर अचानक थकून जाते. त्याचे परिणाम गंभीर आणि धोकादायक असू शकतात. शेफाली जरीवालाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या दिवशी ती घरात कोसळली त्या दिवशी तिने उपवास केला होता. तिने दुपारच्या वेळी अँटी-एजिंग इंजेक्शन घेतले होते आणि त्यानंतर संध्याकाळी तिची नेहमीची औषधे घेतली होती. महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व औषधे तिने रिकाम्या पोटी घेतली होती.
याप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “तिचा रक्तदाब खूपच कमी झाला आणि ती थरथरू लागली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.”
सप्लिमेंट्स आणि अँटी एजिंग इंजेक्शनचे धोके
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली काही काळापासून वैद्यकीय देखरेखीखाली अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेत होती. या उपचारांमध्ये ग्लुटाथिओन (ग्लुटाथिओन त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन कमी करते आणि त्वचेचा रंग उजळतो), कोलेजन बूस्टर (कोलेजन हे एक प्रथिन आहे, जे त्वचेची लवचिकता, हाडांची मजबुती आणि सांध्यांच्या कार्यासाठी आवश्यक असते) किंवा व्हिटॅमिन आधारित अँटी-ऑक्सिडंट्ससारखे घटक असतात. हे इंजेक्शन्स इंट्राव्हेन्स किंवा इंट्रामस्क्युलर पद्धतीने दिले जातात.
शेफालीची जवळची मैत्रीण अभिनेत्री पूजा घई हिने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “शेफालीने तिच्या मृत्यूच्या दिवशी व्हिटॅमिन सी आयव्ही ड्रिप घेतले होते. हे अगदी सामान्य आयव्ही आहे. आपण सर्व जण व्हिटॅमिन सी घेतो. काही जण तर गोळी स्वरूपात घेतात तर काही जण ड्रिप घेतात. त्या दिवशी तिने ड्रिप घेतला होता.” असे उपचार साधारणपणे निरोगी किंवा सौंदर्य वाढवणारे म्हणून विकले जात असले तरी याबाबत डॉक्टर कायम सावध करतात की ते नेहमीच जोखीममुक्त ठरतीलच असे नाही. पुरेसे हायड्रेशन किंवा अन्नाशिवाय व्हिटॅमिन सीसारख्या औषधांमुळेदेखील हृदय आणि रक्तवाहिन्यांवर दबाव येऊ शकतो.
ठळक मुद्दे:
- ‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन
- बिग बॉस फेम शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता
- काही वर्षांपूर्वी शेफालीनेही प्लास्टिक सर्जरी केली होती
- तरुण दिसण्यासाठी सतत अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेत होती
- शेफाली दोन औषधं घेत होती, त्यापैकी एक व्हिटॅमिन सी आणि दुसरे ग्लुटाथिओन
आर्टेमिस रुग्णालयातील डॉ. राहुल मल्होत्रा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “हाय डोस व्हिटॅमिन सी (३० ग्रॅम किंवा त्याहून अधिक इंजेक्शन) रक्तदाब कमी करू शकते. हे सहसा निरूपद्रवी असते, मात्र जर रुग्ण उपवास करत असेल किंवा हायड्रेटेड नसेल तर रक्तदाब गंभीररित्या कमी होऊ शकतो. त्यामुळे बेशुद्ध पडणे, चक्कर येणे किंवा त्याहूनही गंभीर परिणाम होऊ शकतात.”

अन्न नैसर्गिक बफर म्हणून काम करते. बरीच औषधे जेवणासोबत घेतल्याने ते रक्तप्रवाहात किती लवकर प्रवेश करतात यावर नियंत्रण राहते”, असेही डॉ. उगलमुगले यांनी सांगितले.
काय लक्षात ठेवायला हवं?
- कोणतीही औषधे घेताना कायम वैद्यकीय सल्ल्यांचे पालन करा. कोणतीही औषधे, सप्लिमेंट्स किंवा कॉस्मेटिक उपचार सुरू करण्यापूर्वी (प्रामुख्याने व्हिटॅमिन सी किंवा ग्लूटाथिओन सारखे इंजेक्शन्स) डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- रिकाम्या पोटी औषधे कधीही घेऊ नका. अन्नाशिवाय औषधे घेतल्यास त्याचे रक्तप्रवाहात होणारे शोषण किंवा परिणाम याचा अंदाज नसतो. नेहमी औषधांवरील लेबल्स वाचा आणि हलका नाश्ता किंवा जेवण आवश्यक आहे का ते तपासा.
- सप्लिमेंट्सबाबत सावधगिरी बाळगा. पूरक आहार आणि कॉस्मेटिक इंजेक्शन्सचा गंभीर परिणाम होऊ शकतो. दीर्घकालीन किंवा देखरेखीशिवाय अशा औषधांचा वापर धोकादायक असू शकतो, त्यामुळे याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- आरोग्याच्या धोक्यांबाबत जाणून घ्या. हृदयरोग, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी उपवास, औषधे किंवा कॉस्मेटिक उपचारांबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे