पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या ऑपरेशनमध्ये नऊ मोठमोठे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेदेखील क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्यांचे प्रयत्न केले; मात्र पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवून लावले. या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.

आता दोन्ही देशांनी शस्त्रविरामाची घोषणा केली असली तरी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये फूट पडली आहे का, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शनिवारी शस्त्रविरामासाठी अमेरिकेचे आभार मानताच, पाकिस्तानी लष्कराने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधील सरकार आणि तेथील लष्कर ऐतिहासिकदृष्ट्या परस्परविरोधी राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने दीर्घकाळ लष्करी राजवट पाहिली आहे; परंतु आता फूट पडण्यासारखे नक्की काय घडले? पाकिस्तानमध्ये खरोखर कोणाचे सरकार आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

दोन्ही देशांनी शस्त्रविरामाची घोषणा केली असली तरी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये फूट पडली आहे का, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

नक्की काय घडलं?

शनिवारी (१० मे) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामाची घोषणा केली. अमेरिकेने या शस्त्रविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला; तर भारतीय अधिकाऱ्यांनी कोणताही तटस्थ देश यात सहभागी नसल्याचे सांगितले. दुसरीकडे शनिवारी शेहबाज शरीफ यांनी ‘ट्विटर’वर ट्रम्प यांचे आभार मानले. “आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व आणि प्रदेशातील शांततेसाठी त्यांच्या सक्रिय भूमिकेबद्दल आभार मानतो. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेच्या हितासाठी आम्ही स्वीकारलेल्या या निर्णयाबद्दल पाकिस्तान अमेरिकेचे कौतुक करतो,” असे शरीफ यांनी ‘एक्स’ वर लिहिले. त्यांनी पुढे म्हटले, “दक्षिण आशियातील शांततेसाठी आम्ही उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो. पाकिस्तानचा असा विश्वास आहे की, या प्रदेशात शांतता, समृद्धी व स्थिरतेच्या प्रवासात अडथळा आणणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही एक नवीन सुरुवात आहे.”

पाकिस्तानकडून कराराचे उल्लंघन

अमेरिकेकडून या शस्त्रविरामाची घोषणा झाल्याच्या आणि शेहबाज शरीफ यांच्या ट्विटच्या काही वेळानंतर पाकिस्तानी लष्कराने लगेचच शस्त्रविरामाचे उल्लंघन केले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी रात्री ‘एक्स’वर लिहिले, “श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. ही युद्धबंदी नाही.” गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, कच्छ जिल्ह्यात अनेक ड्रोन दिसले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी एका निवेदनात या घडामोडीला दुजोरा दिला. त्यांनी म्हटले, “गेल्या काही तासांपासून, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये आज झालेल्या सामंजस्य कराराचे वारंवार उल्लंघन होत आहे. सशस्त्र दल योग्य प्रत्युत्तर देत आहेत आणि आम्ही या उल्लंघनांची गंभीर दखल घेत आहोत. सशस्त्र दले परिस्थितीवर कडक नजर ठेवत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच नियंत्रण रेषेवरील सीमा उल्लंघनाच्या कोणत्याही घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे ‘द हिंदू’ने आपल्या वृत्तात सांगितले.

असे असले तरीही पाकिस्तानने शस्त्रविरामावर वचनबद्ध राहण्याचा आग्रह धरला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, “आज जाहीर झालेल्या पाकिस्तान आणि भारत यांच्यातील शस्त्रविरामाच्या निष्ठापूर्वक अंमलबजावणीसाठी पाकिस्तान वचनबद्ध आहे. काही भागांत भारताकडून उल्लंघन होत असूनदेखील आमचे सैन्य जबाबदारी आणि संयमाने परिस्थिती हाताळत आहेत. शस्त्रविरामाच्या अंमलबजावणीतील कोणत्याही समस्या योग्य पातळीवर आणि संवादाद्वारे सोडवल्या पाहिजेत, असे आमचे मत आहे. जमिनीवरील सैन्यानेही संयम बाळगला पाहिजे,” असे ते म्हणाले.

पाकिस्तानवर खरे राज्य कोणाचे?

हा प्रश्न आजही कायम आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत-पाकिस्तानमधील या संघर्षामुळे मुनीर यांना पाकिस्तानवर पूर्ण ताबा मिळवण्याचे संधी मिळते. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’मधील एका लेखात असे म्हटले आहे की, जनरल मुहम्मद झिया-उल-हक हे मुनीरचे आदर्श आहेत. झिया उल हक हे लष्करप्रमुख असताना त्यांनी पाकिस्तानी लष्कराला जिहादी चेहरा देण्याचा प्रयत्न केला होता. भारताशी युद्ध सुरू असताना त्याला धर्माची जोड मिळाली पाहिजे, असा प्रयत्न झिया यांच्याकडून करण्यात आला होता. मुनीर यांच्यावरही इस्लामिक वर्चस्वाचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या लेखात म्हटले आहे, “जनरल मुनीर हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे धोरणात्मक बाबींमध्ये फारसे मत नाही. लोकांना हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की, सर्वांत शक्तिशाली व्यक्ती इस्लामाबादमध्ये नाही, तर रावळपिंडीत बसते. परंतु, जनरल मुनीर हे सुकाणू म्हणून खूपच वाईट काम करीत आहेत,” असे लेखात म्हटले आहे.

जनरल झिया यांनी १९७७ च्या लष्करी उठावात पाकिस्तानचा ताबा घेतला आणि झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी देण्याचे आदेश दिले. ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील एका लेखात म्हटले आहे, “मुनीर यांनी आता शस्त्रविरामावर सहमती दिली आहे. मात्र, आता सर्वांत आव्हानात्मक काम म्हणजे शस्त्रविराम किती काळ टिकेल आणि हे दोन्ही सैन्य व पाकिस्तानमधील स्थापनेवर अवलंबून असेल, ज्याचे नेतृत्व जनरल मुनीर आणि त्यांचे एनएसए-कम-आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मलिक करीत आहेत”. लाहोर येथील राजकीय आणि लष्करी विश्लेषक एजाज हुसेन यांनी, “या परिस्थितीमुळे पाकिस्तानी लष्कराला पुन्हा जनतेचा पाठिंबा मिळविण्याची संधी मिळते. लष्कर देशातील मध्यमवर्गीयांमध्ये पाठिंबा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते”,असे ‘बीबीसी’ला सांगितले.

इम्रान खान यांच्या तुरुंगवासामुळे जनतेत लष्कराविरोधात भावना निर्माण झाल्या आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

इस्लामाबाद येथील विश्लेषक व जेन्स डिफेन्स वीकलीचे माजी प्रतिनिधी उमर फारूक यांनी ‘बीबीसी’ला सांगितले, “आपल्याकडे एक खोलवर विभागलेला राजकीय समाज आहे, देशाचा सर्वांत लोकप्रिय नेता आज तुरुंगात आहे. इम्रान खान यांच्या तुरुंगवासामुळे जनतेत लष्कराविरोधात भावना निर्माण झाल्या आहेत.” त्यांनी पुढे म्हटले, “आजची परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानातील नागरिक २०१६ किंवा २०१९ च्या तुलनेत लष्कराला पाठिंबा देण्यास खूपच कमी उत्सुक आहे. परंतु, भारतविरोधी भावना असणाऱ्या मध्य पंजाबमध्ये जनमत बदलले, तर कारवाई करण्यासाठी लष्करावर नागरिक दबाव वाढल्याचे दिसून येईल आणि त्यामुळे लष्कर पुन्हा लोकप्रिय होईल.”

पहलगाम हल्ल्यापूर्वी अनेक जण मुनीर यांना भारत आणि पाकिस्तानमधील तणावासाठी जबाबदार धरत होते. मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानची नाजूक नस म्हटले होते. मुनीर यांनी आपल्या भाषणात म्हटले होते, “आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मीर पाकिस्तानची नाजुक नस होती, असेल आणि आम्ही ते विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षात सोडणार नाही,” असेही म्हटले. त्यांनी मुहम्मद अली जिन्नांच्या द्विराष्ट्रीय सिद्धांताचाही प्रचार केला. ते म्हणाले, “आपले धर्म वेगळे आहेत, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. आपण दोन राष्ट्रे आहोत; आपण एक राष्ट्र नाही”. त्यानंतर पहलगाम हल्ला झाला. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भाषणामुळे दहशतवाद्यांना पहलगाम हल्ला करण्यास प्रेरित केले होते का, याचा तपास करीत आहेत.

२०१९ च्या पुलवामा हल्ल्यादरम्यान मुनीर हे पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय)चे प्रमुखदेखील होते. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंध बिघडल्यानंतर आयएसआय प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला. त्यानंतर इम्रान खान यांनी मुनीर त्यांच्या अटकेमागे असल्याचा आरोप केला होता. शस्त्रविरामाच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी मुनीर आणि शरीफ या दोघांशीही संपर्क साधला होता. दोघांशी बोलताना भविष्यातील संघर्ष टाळण्याकरिता भारताबरोबर चर्चा सुरू करण्याचेदेखील आवाहन केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने मे २०२३ मध्ये करण्यात आलेल्या इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी नागरिकांवर लष्करी न्यायालयांमध्ये खटला चालविण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे मुनीर यांची ताकद आणखी वाढली. मे २०२३ मध्ये लाखोंच्या संख्येत पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) सदस्य माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. नागरिकांवर लष्करी न्यायालयांमध्ये खटला चालविण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय पाकिस्तानातील लोकशाहीला आणखी एक धक्का होता. आता मुनीर यांची पुढील भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.