२०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष मानले जात आहे. या वर्षी अनेक देशांमधील सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, इराण, फ्रान्स, ब्रिटन आणि आता काही दिवसांमध्येच अमेरिकेचीही निवडणूक होणार आहे. ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाची सत्ता उलथवून टाकत मजूर पक्षाचे सरकार ‘चारसौपार’ जात सत्तेवर आले आहे. ब्रिटनमध्ये सत्तेवर असणारे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक पायउतार होऊन आता किएर स्टार्मर सत्तेवर आले आहेत. भारतीय वंशाचे अनेक खासदार ब्रिटनच्या संसदेमध्ये निवडून गेले आहेत. त्यातीलच एका महिला खासदाराने आता ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भगवदगीतेची शपथ घेतली आहे.

हेही वाचा : अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? अंतराळयानात नक्की काय बिघाड झाला?

भगवदगीतेची शपथ घेणाऱ्या भारतीय वंशाच्या खासदार

हुजूर पक्षाच्या खासदार शिवानी राजा यांनी गुरुवारी (११ जुलै) ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भगवदगीतेला साक्षी मानून सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. २९ वर्षीय शिवानी राजा यांनी शपथ घेतानाचा व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले आहे की, “लीसेस्टर पूर्व मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये शपथ घेणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” त्यांनी महामहिम राजा चार्ल्स यांच्याशी निष्ठेची शपथ गीतेवरून घेतल्याबद्दल अभिमानही व्यक्त केला. शिवानी राजा यांचा हा विजय फारच महत्त्वाचा मानला जात आहे. एकूणच हुजूर पक्षासाठीही हा विजय उल्लेखनीय आहे. कारण लीसेस्टर पूर्व मतदारसंघामध्ये गेल्या ३७ वर्षांपासून मजूर पक्षाचे वर्चस्व होते. ते मोडीत काढत या मतदारसंघावर आपला झेंडा रोवण्याचे काम शिवानी राजा यांनी केले आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे दिसून आले. यंदा भारतीय वंशाच्या एकूण २३ खासदारांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रवेश केला आहे. शिवानी राजा यांच्यासमवेतच खासदार बॉब ब्लॅकमन, कनिष्क नारायण आणि विरोधी पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनीही भगवदगीतेची शपथ घेतली आहे. कनिष्क नारायण हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म बिहारमध्ये झाला आहे. मात्र, शिवानी राजा कोण आहेत आणि त्यांनी लीसेस्टर पूर्व मतदारसंघामध्ये विजय कसा मिळवला, याविषयी माहिती घेऊयात.

शिवानी राजा यांचा जन्म १९९४ साली लीसेस्टरमध्ये झाला असून त्या मूळच्या गुजरातच्या आहेत. त्यांचे वडील केनियामधून १९७० साली ब्रिटनला स्थलांतरित झाले; तर त्यांच्या आई गुजरातमधील राजकोटमधून ब्रिटनला आल्या. हे कुटुंब लिस्टरशायर रुशे मीडमध्ये स्थायिक झाले. शिवानी राजा यांनी ब्रिटनच्या डी मॉन्टफोर्ट विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्या फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक सायन्समध्ये पदवीधर आहेत. त्यांनी इंग्लंडमधील अनेक मोठ्या कॉस्मेटिक्स ब्रँड्ससोबत काम केले असून या नोकऱ्यांमधून त्यांना चांगला व्यावसायिक अनुभव प्राप्त झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, शिवानी राजा त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातदेखील सक्रिय आहेत. बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रात त्यांचे चांगले वर्चस्व आहे. लीसेस्टर पूर्व मतदारसंघामध्ये गेल्या ३७ वर्षांपासून असलेले मजूर पक्षाचे वर्चस्व मोडीत काढण्यात यश प्राप्त झाल्यानंतर शिवानी राजा यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यांना १४,५२६ मते प्राप्त झाली. त्यांनी मजूर पक्षाच्या राजेश अग्रवाल यांना पराभूत केले. लंडनचे माजी उपमहापौर राजेश अग्रवाल यांना फक्त १०,१०० मते मिळाली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवानी राजा यांनी परिवर्तनाची गरज आहे, यावर भर देत ‘एक्स’वर म्हटले की, “ही वेळ परिवर्तनाची होती.”

हेही वाचा : जागतिक लोकसंख्या दिन २०२४: हे आहेत जगातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेले दहा देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदू-मुस्लीम तणाव आणि निवडणूक

प्रचार करत असताना राजा यांनी ब्रिटीश-भारतीय समुदायाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्या पारंपरिक गरबा डान्स कार्यक्रमामध्येही सहभागी झाल्याचे दिसून आले. तसेच त्या मंदिरातही वारंवार जायच्या. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना झाल्यानंतर लीसेस्टरमध्ये हिंदू आणि मुस्लीम समुदायांमध्येही वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, राजा यांनी या घटनेनंतर आपली मते व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या की, या घटनेनंतर लोक नाराज झाले होते. लोकांचा राजकारण्यांवरून विश्वास उडाला होता. दंगल झाल्यानंतर आधीच्या खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला नव्हता. त्यांनी कुणाशीही न बोलता सगळा दोष हिंदूंच्या माथ्यावर मारला होता. जेव्हा राजा यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकांना आशा वाटली. त्यांना थोडे हायसे वाटले. शिवानी राजा यांनी आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिलेल्या वचनानुसार त्यांना रस्ते, रुग्णालये सुधारणे, विविध समुदायांमधील एकात्मता वाढवणे, स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देणे आणि बेकायदा स्थलांतर रोखणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.