Shocking discovery of mosquito आईसलँड हे आजवर जगातील अशा ठिकाणांपैकी एक होते की, जिथे डास अस्तित्त्वात नाहीत. पण कदाचित म्हणूनच आईसलँडमध्ये आता प्रथमच तीन डास सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीयांना कदाचित फारसे काही वाटणार नाही, कारण डासांसोबतच आयुष्य आपल्या अनेक पिढ्यांनी स्वीकारलेले आहे. पण म्हणूनच आईसलँडमध्ये सापडलेले तीन डास ही इशारा घंटाच मानली जात असून त्यावर तातडीने संशोधनाला सुरुवात झाली आहे. आजवर डासांना इथे नैसर्गिकरित्या अटकाव होता पण आता त्यांचे अस्तित्व नेमकी कोणती बदललेली परिस्थिती सांगते आहे, त्याचाच हा आढावा.

एका बागेमध्ये तीन डास आढळले, त्यात दोन मादी व एक नर होता. आता येणाऱ्या काळात इथले डास वाढणार का आणि त्यामुळे हैराण व्हावे लागेल का, या विचाराने आईसलँडवासीयांची झोप उडाली आहे. एखाद्या राष्ट्रीय आपत्तीप्रमाणे या घटनेकडे पाहिले जात आहे.

डासांचे आगमन असे अचानक का? आणि त्यामागे हवामान बदलाचा संकेत दडला आहे का?

डास नेमके कशामुळे वाढतात?

  • डास हे थंड रक्ताचे जीव आहेत. म्हणजेच त्यांचं शरीराचं तापमान बाहेरील हवेनुसार बदलतं. यामुळे त्यांची गतिशीलता, वाढ, प्रमाण आणि बरेचसे जीवनचक्र तापमानावर अवलंबून असतं.
  • उबदार हवामान डासांसाठी अनुकूल असतं. कारण तापमान वाढल्यावर त्यांच्या क्रिया वाढतात आणि वाढीचा कालावधी कमी होतो, म्हणजेच कमीत कमी वेळेत ते अधिक मोठे होतात. (आपल्याकडे पावसाळ्यानंतर ऑक्टोबर हीट अर्थात ऊन आणि उकाडा वाढला की, डासांचे प्रमाणही वाढते.)
  • डासांची अंडी उकाड्यात वेगात वाढतात, त्यांच्या पुढच्या पिढीचा जन्मही वेगात होतो आणि कमीत कमी कालावधीत ते प्रौढही होतात. ही संपूर्ण प्रक्रियाच गतीमान होते.
  • उष्णतेमुळे मादी डासांनी रक्त शोषण्याचा (म्हणजेच आपल्याला चावा घेण्याचा) हंगाम लांबतो व त्यामुळेच संक्रमणाची शक्यता वाढू शकते.
  • हवामानातील आर्द्रतेचा स्तरही महत्त्वाचा असतो: गरम आणि आर्द्र वातावरण डासांच्या जीवनासाठी अनुकूल ठरतं. (आपल्याकडचा ऑक्टोबर नुकताच पाऊस पडून गेलेला, त्यामुळे आर्द्रता अधिक आणि उकाडाही वाढलेला असतो)
  • या अर्थाने, हवामानबदलामुळे त्या भौगोलिक भागात जिथे पूर्वी डास राहू शकत नव्हते, तेथे आता ते टिकू शकतात असे वैज्ञानिकांना वाटते.
mosquito
तापमानवाढीमुळेच डास आले

आईसलँडमध्ये काय बदल झालाय?

आता बघूया, डासांच्या आगमनासाठी आईसलँडमध्ये असे कोणते बदल घडले आहेत :

  • आईसलँडचे तापमान उत्तरेकडील तापमानापेक्षा चारपट वेगाने वाढते आहे. त्यामुळे या भागात थंडी कमी होत चालली आहे.
  • उदाहरणार्थ, यंदा २०२५ मध्ये विविध भागांमध्ये सतत १० दिवसाहून अधिककाळ उष्णतेचे विक्रम मोडीत निघाले आहेत, आधी असे क्वचितच होत असे.
  • तापमान अधिक असणाऱ्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे.
  • या बदलांमुळे डासांसाठी ‘स्वागतार्ह वातावरण’च तयार होत आहे — थंडी कमी, हवामान सौम्य आणि वातावरणात वाढलेली आर्द्रता हे सगळं एकत्र म्हणजे डासांसाठी नंदनवनच ठरावं, अशी स्थिती.

कसे आले असतील डास?

  • डास आईसलँडमध्ये कसे आले असतील याबाबत निश्चित माहिती अद्यार हाती आलेली नाही, पण खालील शक्यता मात्र संशोधकांनी नोंदविल्या आहेत.
  • हवामान अनुकूल झाल्यामुळे (उष्मा वाढल्याने) डास वेगात फैलावू शकतात.
  • मानवी हालचालींमुळे किंवा वाहतुकीमुळे डास किंवा त्यांची अंडी आईसलँडपर्यंत पोहोचली.
  • स्थलांतर करत असलेले डास या नवीन ठिकाणी पोहोचले आणि इथल्या वातावरणात स्थिरावले. अर्थात ते स्थिरावण्यासाठी हवामान, पाणीसाठा, आणि वाढीला अनुकूल परिस्थिती असणे महत्त्वाचे.

आरोग्यदृष्ट्या डासांच्या आगमनाचे धोके काय?

या तीन डासांमुळे लगेचच मोठा धोका नसला, तरी त्यांची संख्या वाढल्यास मात्र पुढील शक्यता निर्माण होतात.

  • ही स्थिती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण ते जीवाणू किंवा विषाणूवाहक ठरू शकतात.
  • हवामान बदलामुळे संक्रमणाचा हंगाम लांबतो, डासांची क्रियाशीलता वाढते.
  • म्हणूनच, योग्यवेळीच त्याची दखल घेणे, आईसलँडसाठी महत्त्वाचे आहे.

काय केले जाऊ शकते?

  • स्थानिक प्रशासन व आरोग्य व्यवस्थेने हवामानातील बदल आणि डासांच्या संसर्गाच्या दृष्टीने तयार राहायला हवे.
  • घराबाहेर पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. कारण साचलेल्या पाण्यात डासांची अंडी वाढतात.
  • तापमान व आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्यास डासविरोधी उपाययोजना (उदा. मच्छरदाणी, किंवा डासांचा चावा रोखणारी मलमे) वेळेवर उपाय करणे गरजेचे.
  • सार्वजनिक आरोग्यविषयक विशेष शैक्षणिक मोहीम राबविणे: नागरिकांना डास व त्यांच्या प्रसाराविषयक माहिती असणे गरजेचे.

भविष्यातील धोकेही लक्षात घ्या

मूळात डासविरहित असलेल्या देशात डासांची नोंद हा खरेतर तापमानवाढीचा मोठा इशाराच आहे. येथील हवामान बदल आणि वाढते तापमान जीवसृष्टीच्या धोकादायक परिवर्तनासाठी दार उघडतात, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे या घटनेकडे फक्त ‘आश्चर्यकारक घटना’ म्हणून पाहू नये तर त्यात आरोग्य, पर्यावरण व मानवाशी संबंधित भविष्यातील धोकेही लक्षात घ्यावेत.