आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आयएसएस- International Space Station) यशस्वी मोहीम पूर्ण करून कॅप्टन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अॅक्सिओम-४ मोहिमेच्या यशासोबतच भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेबाबतही चर्चा झाली. शुभांशु शुक्ला यांनी या भेटीदरम्यान आयएसएसवर केलेल्या अनेक प्रयोगांबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, अवकाश स्थानकांवर अन्न हा अजूनही मोठा प्रश्न आहे. कारण- जागा मर्यादित आहे आणि पृथ्वीवरून माल नेणं खूप महाग आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांच्या प्रयोगांमधून अन्नसुरक्षेच्या समस्यांना तोडगा काढण्याची क्षमता आहे. केवळ अंतराळवीरांसाठीच नाही, तर पृथ्वीवरील लोकांसाठीदेखील हे प्रयोग उपयोगी ठरतील. शुभांशु शुक्ला यांनी सांगितल्याप्रमाणे अवकाशात रोपे नेमकी कशी उगवतील आणि ते का महत्त्वाचे आहे याबाबत जाणून घेऊ…

शुभांशु शुक्ला झाले स्पेस फार्मर

अॅक्सिओम-४ मोहिमेच्या वेळी शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या टीमने अवकाशात अनेक प्रयोग केले. त्यातला सर्वांत महत्त्वाचा प्रयोग म्हणजे रोपे उगवण्याचा. या मोहिमेदरम्यान पेट्री डिशमध्ये मूग आणि मेथी यांची बियाणे पेरले आणि ते फ्रीजरमध्ये स्टोअर केले गेले. हा प्रयोग वनस्पतीचे अंकुरण आणि सुरुवातीची वाढ यांवर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी करण्यात आला होता. पृथ्वीवर परतल्यानंतर ही बियाणे पुढेही रोपे उगवण्याच्या दृष्टीने वापरली जातील. त्यांचे आनुवंशिक शास्त्र, सूक्ष्मजीव प्रणाली व पौष्टिक गुणधर्म यांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जाईल. या प्रयोगाबाबत सांगताना ते म्हणाले, “अवकाश स्थानकावर अन्न ही मोठी समस्या आहे. अन्न उगवण्यासाठी अनेक प्रयोग सुरू आहेत. आम्ही सूक्ष्म गुरुत्वात्कर्षणाच्या अनुषंगाने संशोधन केले आणि ते पृथ्वीवरील अन्नसुरक्षेच्या समस्याही सोडवू शकते.”

अवकाशात अन्न उगवणे म्हणजे नेमके काय?

अवकाशात अन्न उगवण्याचा प्रयत्न करणारे शुभांशु शुक्ला हे पहिले अंतराळवीर नाहीत. याआधीही आयएसएसवर थोड्या प्रमाणात अन्न उगवण्याचे प्रयत्न झाले आहेत. २०१४ मध्ये नासाने व्हेजी (veggie) नावाची वनस्पती उत्पादन प्रणाली सुरू केली. सोप्या भाषेत सांगायचे, तर ती अवकाशातील बाग आहे. हे एखाद्या साधारण कॅरी-ऑन बॅग एवढ्या आकाराचे असते आणि त्यात सहा रोपे उगवता येतात. व्हेजी प्रकल्पाचा उद्देश सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात झाडांची वाढ कशी होते याचा अभ्यास करणे, असा होता. तसेच अंतराळवीरांच्या आहारात ताजे अन्न समाविष्ट करणे आणि त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राखणे व आनंद वाढवणे हा आहे. आतापर्यंत व्हेजी प्रकल्पांतर्गत लेट्युसच्या तीन जाती, चायनीज कोबी, मोहरी, रेड रशियन केल व झिनिया फुले यशस्वीरीत्या उगवली आहेत. काही रोपे अंतराळवीरांनी खाल्ली असून, उरलेली पृथ्वीवर परत आणून त्याचा अभ्यासही करण्यात आला. त्यामध्ये अवकाशात उगवलेल्या अन्नावर हानिकारक जंतू वाढतात का याचीदेखील चिंता होती. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणतेही हानिकारक संसर्गजन्य जंतू आढळले नाहीत. त्याशिवाय हे अन्न त्यांच्यासाठी सुरक्षित आणि चविष्ट ठरले.

अवकाशात रोपे कशी उगवली जातात?

अवकाशात रोपे उगवण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो
१. हायड्रोपोनिक्स पद्धत – या पद्धतीमध्ये मातीशिवाय पोषक द्रव असलेल्या पाण्यात रोपे उगवतात.
२. एरोपोनिक्स – या पद्धतीत माती किंवा दुसरे कोणतेही माध्यम गरजेचे नसते.

काही वेळा मातीचा वापर करूनही रोपे उगवली जातात. नासाच्या व्हेजी प्रकल्पात रोपे मातीऐवजी खत मिसळलेल्या मातीसारख्या पदार्थाने आणि मातीला पर्याय असलेल्या एका बॅगमध्ये उगवली जातात. या बॅगेत रोपाच्या मुळापर्यंत पाणी, पोषण व हवा योग्य प्रमाणात पोहोचवली जाते. या वर्षी इस्रोनेही Crops Box तयार करून, अवकाश शेतीत पाऊल टाकले आहे. हा क्रॉप बॉक्स मिनी ग्रीनहाउससारखा असून, त्यात मातीचा पर्यायी घटक, पाणी, सूर्यप्रकाशासारखे दिवे व पृथ्वीसारखी हवा यांचा अंतर्भाव असतो.

अवकाशात शेती करण्याची कोणती आव्हाने आहेत? AI Generated Image

अवकाशात शेती करण्याची कोणती आव्हाने आहेत?

कितीही पद्धती असल्या तरीही अवकाशात रोपे उगवणे हे तितकेसे सोपे नाही.
सूक्ष्म गुरुत्वाकर्षण – पृथ्वीवर झाडाखाली झाडाची मुळे असतात आणि खोड वर वाढत जाते. मात्र, अवकाशात गुरुत्वाकर्षणच नसल्याने झाडे दिशा ठरवू शकत नाहीत. त्यामुळे वाढ आणि पोषण प्रभावित होते.

प्रकाश आणि जागेची कमतरता – पृथ्वीवर सूर्यप्रकाश सहज मिळतो. अवकाशात कृत्रिम प्रकाशाचा वापर करावा लागतो; मात्र ऊर्जेचा अपव्यय टाळावा लागतो. तसेच दिव्यांमुळे होणाऱ्या उष्णतेचे नियंत्रण करणे हेदेखील आव्हान ठरते. त्यामुळे एलईडी दिवे वापरावे लागतात.

मर्यादित जागा – आयएसएस खूपच लहान आहे. त्यामुळे तेथे रोपे उगवण्यासाठी मर्यादित जागा मिळते.

किरणोत्सर्ग आणि त्याचे परिणाम – अवकाशातील विकिरणे किंवा सूक्ष्मजीव यांमुळे झाडे दूषित होऊ शकतात. त्यांच्या जनुकांमध्ये घडलेले बदल हानिकारक ठरू शकतात.

अवकाश शेतीचे महत्त्व काय?

अवकाशात झाडे उगवण्याचा नेमका उपयोग काय ते का महत्त्वाचे आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर, भविष्यात दीर्घकाळ चालणाऱ्या अवकाश मोहिमा आणि मंगळावर वसाहतींसाठी झाडे उगवून अन्नाचा स्रोत मिळावा यासाठी अवकाशात झाडे उगवणे आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या मोहिमा शक्य होण्यासाठी अवकाश शेती महत्त्वाची आहे. तसेच अवकाशातील शेतीचे फायदेही बरेच आहेत.

१. झाडे कार्बन डाय-ऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात. तसेच पाणी शुद्ध करू शकतात. त्यामुळे अंतराळयान आणि वसाहतींचे डिझाइन बदलू शकते.

२. झाडांचा सहवास मिळाल्याने अंतराळवीरांचा ताण कमी होऊ शकतो आणि वातावरण प्रसन्न राहू शकते.

३. अवकाशातील कठीण वातावरणात शेती शिकल्याने पृथ्वीवरील प्रतिकूल हवामान आणि सुपीक जमिनीच्या अभावाशी लढायला मदत मिळू शकते.

४. एकंदरच अवकाशात सध्या तरी सलाड मिळणे सुरू होण्याला अवकाश असला तरी अवकाश शेतीत आपण मोठी झेप घेतली आहे हे नक्की.