Skin Cancer Treatment News in Marathi : गेल्या दशकभरात कॅन्सरग्रस्त (कर्करोग) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जगभरातील अनेकांना या जीवघेण्या आजाराने जणू विळखाच घातला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये तरुण-तरुणींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने त्याला रोखण्यासाठी सध्या भारतासह जगभरातील अनेक देशांत नवनवीन संशोधन केले जात आहे. यादरम्यान दैनंदिन वापरातील एका गोळीमुळे त्वचेच्या कर्करोगाच्या धोका कमी होऊ शकतो, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. त्याविषयी…
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्युदराचा धोकाही वाढतो आहे. यापार्श्वभूमीवर संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ‘निकोटिनामाइड’ (व्हिटॅमिन बी-३) या गोळीने त्वचेचा कर्करोगाचा धोका कमी होतो, असे संशोधकांनी एका अहवालात म्हटले आहे.
अभ्यासातून नेमके काय समोर आले?
कर्करोगाच्या औषधांवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी आतापर्यंत ‘व्हिटॅमिन बी-३’ च्या संभाव्य फायद्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र, अलीकडेच अमेरिकेत त्यावर एक नवीन संशोधन करण्यात आले. या संशोधनात ३३ हजारहून अधिक माजी सैनिकांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासातून असे दिसून आले की, दररोज व्हिटॅमिन बी-३ ची गोळी घेतल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. तसेच, जे लोक आधीच त्वचेच्या कर्करोगाचा सामना करीत आहेत, त्यांच्यासाठी ही गोळी अत्यंत गुणकारी आहे. या संशोधनाची व्याप्ती आणि स्पष्टता पाहता, त्वचेच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आणखी वाचा : Breast Cancer: पुरुषांना का होतो ब्रेस्ट कॅन्सर? ‘ही’ ८ कारणं ठरतात सगळ्यात महत्त्वाची!
त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे कोणती
- सतत त्वचा सोलली जाणे हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
- शरीराच्या कोणत्याही भागात सतत आणि कोणत्याही कारणाशिवाय खाज सुटणे.
- त्वचेवरील नवीन डाग किंवा पुरळ येणे आणि जास्त दिवस ते तसेच राहणे.
- त्वचेच्या जखमा बराच काळ बऱ्या न होणे हेदेखील कर्करोगाचे लक्षण असू शकते.
- कान, मान किंवा खाजगी भागावर डाग किंवा लाल चट्टे तयार होणे.
- शरीरावरील जळलेल्या त्वचेवरही कर्करोग होण्याचा धोका असतो.
- जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेचा कर्करोगाचा धोका निर्माण होतो.
- कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीदेखील त्याचे कारण असू शकते.
- त्वचेचा कर्करोग अनुवांशिक कारणांमुळेदेखील होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
त्वचेचा कोणता कर्करोग सर्वात धोकायदायक?
त्वचेचा कर्करोग हा जगातील सर्वात सामान्य कर्करोगाचा प्रकार मानला जातो. त्यामध्ये बेसल सेल कार्सिनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा यासारखे दोन प्रकार आढळतात. त्यातील बेसल हा सर्वात धोकादायक आणि गंभीर प्रकार असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी लाखो लोकांना या कर्करोगाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या आजारांचा संबंध प्रामुख्याने सूर्याच्या यूव्ही किरणांपासून गोऱ्या त्वचेशी आणि वाढत्या वयाशी जोडला जातो. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सूर्यप्रकाशापासून संरक्षण, सावलीचा वापर आणि सनस्क्रीनचा वापर यावर भर दिला जातो, परंतु तरीही या आजाराचे प्रमाण वाढतच आहे.
चिंताजनक बाब म्हणजे, एकदा त्वचेचा कर्करोग झालेल्या रुग्णांना पुन्हा-पुन्हा या आजाराचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. यापार्श्वभूमीवर बाजारात स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन बी-३ च्या गोळ्या त्वचेच्या कर्करोगावर गुणकारी ठरत असल्याचा दावा केला जात आहे. संशोधकांच्या मते, ‘निकोटिनामाइड’ (व्हिटॅमिन बी-३) ही गोळी सूर्याच्या यूव्ही किरणांपासून झालेली त्वचेची हानी भरून काढते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीरातील असामान्य पेशी नष्ट करण्यात मदत करते.
संशोधन नेमके कसे करण्यात आले?
अमेरिकेत करण्यात आलेल्या नवीन संशोधनात, १२ हजारांहून अधिक रुग्णांना दररोज दोनवेळा ५०० मिलीग्राम ‘निकोटिनामाइड’ देण्यात आले. हा प्रयोग सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळ करण्यात आला. त्यानंतर या रुग्णांची तुलना निकोटिनामाइडचे सेवन न करणाऱ्या दुसऱ्या रुग्णांबरोबर करण्यात आली. अभ्यासात असे समोर आले की, निकोटिनामाइड घेणाऱ्या रुग्णांमध्ये नवीन त्वचेचा कर्करोगाचा धोका १४ टक्क्यांनी कमी आढळला. विशेष बाब म्हणजे, ज्यांना आधीच त्वचेचा कर्करोग झालेला होता, त्यांच्यासमोरील पुढील कर्करोगाचा धोका तब्बल ५४ टक्क्यांनी कमी झाला होता. हा परिणाम त्वचेच्या दोन्ही मुख्य कर्करोगांवर (बेसल सेल आणि स्क्वॅमस सेल) सकारात्मक दिसून आला; पण स्क्वॅमस सेल कार्सिनोमा बाबतीत तो विशेष प्रभावी होता.
हेही वाचा : लघवीतून युरिक अॅसिड कमी बाहेर पडतंय? सांधेदुखी, थकवा आणि सूजही आहे, रुजुता दिवेकर सांगताहेत सोपे उपाय!
व्हिटॅमिन बी-३ चे नियमित सेवन खरंच गुणकारी?
बेसल सेल हा कर्करोग अधिक आक्रमक असतो आणि त्यात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, संशोधनाचे परिणाम आशादायी असले तरी निकोटिनामाइड हे पारंपारिक प्रतिबंधक उपायांची जागा घेऊ शकत नाही. त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करायचा असेल तर सूर्याच्या यूव्ही किरणांपासून दूर राहावेच लागेल. त्यासाठी टोपी वापरणे, सावलीचा आसरा घेणे आणि सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन बी-३ च्या गोळ्यांचे सेवन हे कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांच्या तुलनेत अधिक परवडणारे आणि सुरक्षित परिणाम देणारे ठरू शकते. योग्य वेळी त्याचे सेवन करणे सुरू केल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका टळण्यास मदत होते, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.
आरोग्य तज्ज्ञांनी नेमका काय इशारा दिला?
दरम्यान, या नवीन संशोधनामुळे त्वचेच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. संशोधकांनी या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेकांना व्हिटॅमिन बी-३ चे नियमित सेवन करण्यास सल्ला दिला आहे. मात्र, या अभ्यासातील बहुतेक सहभागी गोरे पुरुष असल्याने हे निष्कर्ष सर्वसमावेशक लोकसंख्येसाठी कितपत लागू ठरतील, हे अजून स्पष्ट नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या संशोधनातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असे म्हणता येणार नाही. व्हिटॅमिन बी-३ च्या गोळ्या नियमित घेतल्याने त्याचे वांशिक गटांमध्ये वेगवेगळे परिणाम दिसू शकतात, त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ला घेतल्याशिवाय या गोळ्यांचे सेवन करू नये. या संशोधनाचा केंद्रबिंदू आधीच त्वचेचा कर्करोग झालेल्या रुग्णांवर होता, त्यामुळे ज्यांना हा आजार झालेला नाही, त्यांच्यासाठी व्हिटॅमिन बी-३ च्या गोळ्यांचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते, असा इशाराही आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.