अमेरिकेत सध्या एका भारतीय अभियंत्याची चर्चा सुरू आहे. त्याने टेक इंडस्ट्रीत खळबळ उडवली आहे. या अभियंत्याचे नाव आहे सोहम पारेख. तो एकाच वेळी तब्बल पाच कंपन्यांमध्ये काम करून, दरमहा अडीच लाख रुपये कमवायचा. त्याचा रिज्युम अगदी परिपूर्ण होता. प्रत्येक मुलाखतीत तो उत्तीर्ण झाला आणि सिलिकॉन व्हॅलीच्या काही नामांकित स्टार्टअप्समध्ये तो कामाला होता. परंतु, तो कंपनीच्या मालकांना न सांगता, एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये पूर्णवेळ नोकरी करत होता.

या भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याची सध्या अमेरिकेसह जगभरात चर्चा होत आहे. त्याच्यावर कंपनीच्या संस्थापकांनी फसवणूक आणि रिमोट वर्क कल्चरच्या त्रुटींचा फायदा घेतल्याचा आरोप केला आहे. या खुलाशामुळे सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे. अनेकांनी टेक उद्योगात अशा कृतींच्या परिणामांवर चिंता व्यक्त केली आहे. कोण आहे सोहम पारेख? तो एकाच वेळी पाच कंपन्यांमध्ये कसा काम करायचा? हा प्रकार कसा उघड झाला? त्याविषयी जाणून घेऊ…

सोहम पारेख कोण आहे?

  • सोहम पारेख हा एक भारतीय सॉफ्टवेअर अभियंता आहे. त्याच्यावर एकाच वेळी अनेक स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये काम केल्याचा आरोप आहे. या प्रकाराला मूनलायटिंग म्हणूनही ओळखले जाते.
  • पारेख याने मुंबई विद्यापीठातून २०२० मध्ये कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्याने २०२२ मध्ये जॉर्जिया टेकमधून संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
  • या पदव्यांमुळेच त्याला स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये काम मिळण्यास मदत झाली.
  • मात्र, आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच्या रिज्युमवरील काही दाव्यांच्या सत्यतेवर शंका वर्तवली जात आहे.
  • ‘प्लेग्राउंड एआय’चे सह-संस्थापक आणि मिक्स पॅनेलचे माजी कार्यकारी अधिकारी सुहेल दोशी यांच्या मते, पारेख याने वाय कॉम्बिनेटर स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये काम केले आणि एकाच वेळी तीन किंवा चार स्टार्टअप्समध्ये काम करण्यात त्याला यश आले.

दोशी यांनीच सगळ्यात सुरुवातीला हे प्रकरण उघड केले. त्यांनी पारेखच्या रिज्युमचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आणि त्यातील बरेचसे दावे खोटे असल्याचा आरोप केला. रिज्युमवर पारेख याने आपण अनेक टेक स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये काम केल्याचे सांगितले आहे. त्यात डायनामो एआय येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता (कंत्राट) (जानेवारी २०२४ पासून), यूनियन एआय येथे वरिष्ठ फुलस्टॅक अभियंता (जानेवारी २०२३-जानेवारी २०२४), सिंथेसिया येथे वरिष्ठ फुलस्टॅक अभियंता (डिसेंबर २०२१-डिसेंबर २०२२), अॅलन एआय येथे संस्थापक सॉफ्टवेअर अभियंता (जानेवारी २०२१-डिसेंबर २०२१), गिटहब येथे ओपन सोर्स फेलो (मे २०२०-ऑगस्ट २०२०) यांसारख्या भूमिकांचा समावेश आहे.

त्याचे अँटीमेटल, फ्लीट एआय व मोजॅकसारख्या कंपन्यांमध्येही काम केले असल्याची माहिती आहे. अँटीमेटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू पार्कहर्स्ट आणि वार्प येथील उत्पादन प्रमुख मिशेल लिमसारख्या संस्थापकांनी त्याला नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी त्याचे वर्णन प्रतिभावान अभियंता म्हणून केले आहे. पारेख यांच्याबरोबर काम केल्याचा दावा करणाऱ्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले आहे, “जेव्हा तो काम करतो, तेव्हा मी त्याला एक काम हाती घेताना आणि एक तासात ते पूर्ण करताना पाहिले आहे. तेच काम पूर्ण करण्यासाठी इतर अभियंत्यांना कमीत कमी तीन तासांचा कालावधी लागतो.” परंतु त्याने त्याच्या प्रतिभेचा वापर एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी केला असून, नियोक्त्यांना फसवले आहे.

सोहमने स्टार्टअप्स कंपन्यांना कसे फसवले?

सोहम पारेखची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि मुलाखतींमध्ये छाप पडणारी उत्कृष्ट क्षमता आदींमुळे त्याला प्रसिद्ध स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय पदे मिळाली. परंतु, ‘प्लेग्राउंड एआय’चे संस्थापक सुहेल दोशी यांनी हा प्रकार उघड केला. दोशी यांनी ‘एक्स’वर लिहिताना म्हटले, “सोहम पारेख नावाचा भारतातील एक माणूस आहे, जो एकाच वेळी तीन ते चार स्टार्टअप्समध्ये काम करीत आहे. तो वायसी कंपन्यांना आणि इतरांना फसवत आहे. सावध राहा.” त्यानंतर इतर संस्थापकांनीही आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. लिंडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्लो क्रिव्हेलो म्हणाले की, त्यांनी नुकतेच पारेखला कामावर ठेवले होते; परंतु फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर एका आठवड्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आले.

फ्लीट एआयचे सह-संस्थापक निकोलाई ओपोरोव्ह यांनीही पुढे येऊन सांगितले की, पारेख गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करrत आहे. “तो एकाच वेळी चारपेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये काम करत आहे,” असा दावा त्यांनी केला. अँटीमेटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू पार्कहर्स्ट यांनी पारेखचे वर्णन खरोखर हुशार, असे केले. परंतु, त्याने आपल्या कौशल्याचा वापर फसवणुकीसाठी केला असल्याचा आरोपही केला. वॉर्पमधील मिशेल लिम यांनी, “आम्ही पुढच्या आठवड्यात त्याला कामाच्या चाचणीसाठी बोलवले होते. आता हे ट्विट पाहिले आणि कामाची चाचणी रद्द केली. माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद!,” असे आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. पारेख याने अद्याप सार्वजनिकरीत्या याबद्दल कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

सोहमच्या कृतींनी स्टार्टअप जगतात खळबळ

सोहम पारेखच्या कृतींनी स्टार्टअप जगात खळबळ उडवून दिली आहे. परंतु अनेकांना असे वाटते की, त्याचे प्रकरण हे केवळ एक उदाहरण आहे आणि या प्रकारे अनेक लोक एकाच वेळी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. गुंतवणूकदार डीडी दास यांनी म्हटले की, आज हजारो लोक असेच काम करत असतील. दास यांनी अशा लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या अनेक युक्त्या सांगितल्या आहेत. त्यात ऑनलाइन सक्रिय दिसण्यासाठी माऊस-जिगलिंग टूल्स वापरणे, ‘फोकस टाइम’ म्हणून बनावट कॅलेंडर स्लॉट्स ब्लॉक करणे, त्यांच्या कामाचे काही भाग आउटसोर्स करणे आणि मीटिंगदरम्यान त्यांचे कॅमेरे बंद ठेवणे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी रेडिटवरील एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. त्यात एका वापरकर्त्याने दावा केला होता की, तो एकाच वेळी पाच नोकऱ्या करून वर्षाला ८,००,००० डॉलर्स कमवत आहे. सोहम पारेख घोटाळ्याकडे आता टेक जगतातील एक धोक्याची घंटा म्हणून पाहिले जात आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवताना काय काळजी घ्यावी, घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांचे व्यवस्थापन कसे करायचे, या प्रकारची फसवणूक झाल्यास त्याचा छडा कसा लावायचा आणि हे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षा उपाय कसे तयार करायचे याचा पुनर्विचार करावा लागणार आहे.