पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या तुरुंगवासात असलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मात्र, पाकिस्तानचा इतिहास पाहता लष्करप्रमुख हे कायमच वरचढ ठरले आहेत. पाकिस्तानसमोर आर्थिक स्थिती, वाढती महागाई, अंतर्गत सुरक्षा, बलुचिस्तानमधील अस्थिरता, राजकीय अस्थिरता अशी अनेक आव्हाने आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांचे लक्ष या प्रश्नांकडे जाऊ नये म्हणून मुनीर यांनी काही पावले उचलून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

इम्रान यांचे मुनीर यांच्यावर आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्याविरोधात वैयक्तिक सूड उगवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इम्रान यांनी ‘एक्स’वर टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान असताना जनरल मुनीर यांना ‘आयएसआय’च्या महासंचालक पदावरून हटविले होते. मुनीर यांनी माझी पत्नी बुशरा बिबी हिच्याशी यावर चर्चा करण्यासाठी मध्यस्थांमार्फत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बुशरा यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. अशा प्रकरणांत आपला कुठलाही संबंध नसतो, असे तिने मुनीर यांना स्पष्ट सांगितले. बुशरा यांना अन्यायी पद्धतीने १४ महिन्यांचा तुरुंगवास आणि तुरुंगात अमानवी वर्तणूक देण्यामागे मुनीर यांची सूडबुद्धी कारणीभूत आहे.’ इम्रान खान यांनी ९ मे २०२३ आणि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आयोगाद्वारे चौकशीची मागणी केली. लोकशाही समर्थकांच्या मृत्यूंची चौकशी करावी, अशी मागणी केली.

पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता

पाकिस्तानात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका झाल्या. त्या पूर्वी आणि निवडणुकांनंतरही तेथे राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. इम्रान खान यांना अविश्वास ठराव दाखल करून पदच्युत करण्यात आले. त्यांना नंतर अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर ९ मे २०२३ रोजी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ला (पीटीआय) उद्ध्वस्त करण्यासाठी नियोजित ‘लंडन प्लान’चा तो एक भाग असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. या नियोजनानुसार, इम्रान खान आणि इतर पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना बेकायदा पकडण्यात आले. लोकांनी निवडून दिलेल्याचा मान राखला गेला नाही. भ्रष्ट व्यक्ती शरीफ आणि झरदारी यांना देशावर लादण्यात आले, असे आरोप इम्रान यांनी केले आहेत. नंतर त्यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे निवडणूक चिन्हही काढून घेण्यात आले. नंतर झालेल्या निवडणुकीत या पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार उभे राहिले. निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा या पक्षाने केला आहे. गैरप्रकार होऊनही सर्वाधिक जागा खान यांच्या पक्षाच्या पाठिंब्याने उभ्या असलेल्या अपक्षांना मिळाल्या. अपक्षांना बहुमत मात्र मिळाले नाही. उर्वरित पक्षांनी युती करून सत्ता स्थापन केली. नवे सरकार आले आणि इम्रान खान तुरुंगात असले, तरी ‘पीटीआय’ने संघर्ष थांबविलेला नाही. पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुखांसमोर प्रथमच अशा प्रकारचे आव्हान आहे.

‘जिहादी जनरल’ मुनीर

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर धर्माच्या बाबतीत अतिशय कडवे आहेत. ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर खात्याचे अधिकारी रामनाथन कुमार हे मुनीर यांना पाकिस्तानचे पहिले ‘मुल्ला जनरल’ असे संबोधतात. इतर लष्करप्रमुखांपेक्षा मुनीर हे वेगळे असून, त्यांना युरोपीय शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर खात्याचे ते महासंचालक झाले. त्यानंतर पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेचे ते प्रमुख झाले. भारतामध्ये पुलवामा येथे हल्ल्यावेळी मुनीरच ‘आयएसआय’चे प्रमुख होते. इम्रान खान पंतप्रधान पदावर असताना मुनीर यांना इम्रान यांच्या पत्नीवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करायची होती. त्यावरून अवघे आठ महिने ‘आयएसआय’च्या प्रमुख पदावर राहिल्यानंतर त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली. २०२२ मध्ये निवृत्ती होण्याची तीन दिवस आधी त्यांच्या पदरात लष्करप्रमुख पदाची माळ पडली. तोपर्यंत इम्रान खान यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यात मुनीर यांचाही मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते.

अंतर्गत सत्तास्पर्धा

इम्रान खान यांनी असिम मुनीर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मात्र, पाकिस्तानचा इतिहास पाहता लष्करप्रमुख हे कायमच वरचढ ठरले आहेत. पाकिस्तानसमोर आर्थिक स्थिती, वाढती महागाई, अंतर्गत सुरक्षा, बलुचिस्तानमधील अस्थिरता, राजकीय अस्थिरता अशी अनेक आव्हाने आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांचे लक्ष या प्रश्नांकडे जाऊ नये म्हणून मुनीर यांनी काही पावले उचलून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मुनीर यांची कडवी धार्मिकता, इम्रान यांनी लोकप्रियतेच्या माध्यमातून चालविलेल्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी त्यांनी घेतलेला कडव्या धार्मिकतेचा आधार, त्यांची फील्ड मार्शल पदावर झालेली पदोन्नती अशा घटना नजीकच्या काळात घडल्या आहेत.

इम्रान खान यांचे तगडे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इम्रान खान यांना बहुसंख्य जनतेचा असलेला पाठिंबा लपून राहिलेला नाही. त्यामुळे तुरुंगात असूनही मुनीर यांच्यासमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. काही तज्ज्ञांनी आताची परिस्थिती १९७१मध्ये पाकिस्तानमध्ये असलेल्या राजकीय स्थितीशी केली आहे. त्या वेळी मुजिबूर रेहमान हे तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधून बहुमताने निवडून आले होते. मात्र, त्यांना सत्तेत सामावून घेतले नाही. नंतर भारताबरोबर झालेल्या युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. आताची पाकिस्तानमधील स्थिती फारशी वेगळी नसली, तरी तेव्हाचे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधील भौगोलिक अंतर, भाषिक दरी आणि निर्वासितांचे लोंढे असे चित्र सध्या तरी नाही. हा ठळकपणे पाकिस्तानचा अंतर्गत पातळीवर सुरू असलेला सत्तासंघर्ष दिसतो. त्यात तूर्तास तरी लष्करप्रमुख जनरल मुनीर यांचे पारडे वरचढ दिसत आहे.
prasad.kulkarni@expressindia.com