90-foot tall bronze statue of Lord Hanuman: अलीकडेच अमेरिकेच्या टेक्सासमध्ये महाबली हनुमानाच्या ९० फूट उंचीच्या कांस्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या भव्य मूर्तीचे नामकरण स्टॅच्यू ऑफ युनियन असे करण्यात आले आहे. कुठूनही बघितले तरी नजरेस पडणारी ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ ही मूर्ती अमेरिकेतील तिसरी सर्वात उंच मूर्ती ठरली आहे. या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यादिवशी आयोजकांनी सांगितले की, हे शिल्प अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वर्तुळातील मैलाचा दगड आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भव्य मूर्तीविषयी आणि तिच्या भारतीय संस्कृतीशी असलेल्या संबंधाविषयी जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील धनगर कोण आहेत? जंगलात ‘चराऊ कॉरिडॉर’ची मागणी का केली जात आहे?
स्टॅच्यू ऑफ युनियन
‘स्टॅच्यू ऑफ युनियन,’ ही मूर्ती टेक्सासमधील शुगर लँड येथील श्री अष्टलक्ष्मी मंदिरात आहे. या मूर्तीच्या नावावर असलेल्या संकेतस्थळावर या मूर्तीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीत म्हटले आहे की, ही मूर्ती आध्यात्मिक आनंद देणारी, मनाला शांती देणारी आणि आत्म्याला मार्गदर्शक ठरणारी आहे. या भव्य मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ हे नाव का देण्यात आले याविषयी खुलासा करताना या संकेत स्थळावर म्हटले आहे की, ‘द स्टॅच्यू ऑफ युनियन ही उत्तर अमेरिकेतील भगवान हनुमानाची सर्वात उंच मूर्ती आहे. भगवान हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निःस्वार्थ सेवेचे मूर्त स्वरूप आहेत. भगवान हनुमानाने श्रीराम आणि माता सीतेला एकत्र आणले, म्हणून या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ युनियन हे नाव देण्यात आले आहे.
अमेरिकेतील प्रचंड उंच मूर्ती
ही अमेरिकेतील प्रचंड उंच मूर्ती आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (१५१ फूट) आणि फ्लोरिडामधील पेगासस आणि ड्रॅगन (११० फूट) नंतर या मूर्तीचा उंचीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. त्यापूर्वी अवर लेडी ऑफ द रॉकीज हा पुतळा अमेरिकेतील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचा पुतळा होता, जो ८८.६ फूट आहे. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, हा पुतळा पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि वैदिक विद्वान चिन्ना जेयर स्वामीजी यांच्या संकल्पनेवर आधारित आहे. उत्तर अमेरिकेसाठी एक आध्यात्मिक केंद्र म्हणून त्यांनी या प्रकल्पाची कल्पना केली आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे.
प्राणप्रतिष्ठा
१५ ते १८ ऑगस्ट दरम्यान आयोजित भव्य तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात हेलिकॉप्टरने पुतळ्यावर पुष्पवृष्टी, पवित्र जल शिंपडणेाच बरोबर भगवान हनुमानाच्या गळ्यात ७२ फूट लांबीची पुष्पमाला घालण्यात आली. हजारो भाविकांनी श्रीराम आणि हनुमानाच्या नावाचा जयघोष केला. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मूर्तीचा अनावरण सोहळा आणि विधी चिन्ना जेयर स्वामीजी तसेच अनेक वैदिक पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडला.
हनुमान आणि बुद्ध
भारतीय पौराणिक कथाकार आणि लेखक देवदत्त पट्टनायक यांनी सुचवले की, दोन्ही हात उंचावलेली हनुमानाची मूर्ती, थाई बुद्धाच्या “लढू नका” या संकेताने प्रेरित आहे. X वर, पट्टनाईक यांनी या मूर्तीचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, धन्यवाद मित्रानो काही ब्रेकिंग भारत बुलीजने प्रमोट केलेल्या अशुभ-राग दर्शवणाऱ्या हनुमानाच्या प्रतिमेऐवजी दुसरी प्रतिमा घेतल्याबद्दल!. देवदत्त पट्टनायक यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, थाई बुद्धाची प्रतिमा ही लढू नका अशी नाही. तर नेरन्याजारा नदीच्या पुराशी संबंधित आहे. समुद्राला शांत करण्यासाठी बुद्धाने अभयमुद्रा धारण केली आहे. तुम्ही तुमच्या अजेंड्याला साजेसा अर्थ लावत आहात. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आमच्या पौराणिक कथाकारांना अभयमुद्रा आणि युद्ध करू नका यांच्यातील फरक समजत नाही का?, सांस्कृतिक संदर्भानुसार कोणीही म्हणू शकेल मूर्तीच्या हाताची रचना ‘हाय फाईव्ह’ करण्यासारखी आहे.
मूर्ती आणि भारत
‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार भगवान हनुमानाची ९० फूट उंचीची मूर्ती जी पूर्वी अमेरिकेती मधील सर्वात उंच होती. जून २०२० साली डेलावेअरमध्ये स्थापित करण्यात येणार होती. ४५ टन वजनाची ही मूर्ती हैदराबादहून न्यूयॉर्कला समुद्रमार्गे पाठवण्यात आली . हिंदू टेम्पल ऑफ डेलावर असोसिएशनचे अध्यक्ष पतिबंदा शर्मा यांनी एएनआयला सांगितले की, “ही मूर्ती वारंगल, तेलंगणा येथून डेलावरला पाठवण्यात आली आहे.”