Tata Group Bombay House Controversy : मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या टाटा समूहाच्या ‘बॉम्बे हाऊस’ मुख्यालयातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. टाटा सन्समधील सुमारे ६६% भागधारक असलेल्या टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या मतभेदामुळे उद्योगजगतासह समभागधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. टाटा समूहाची भविष्यातील वाटचाल कशी असेल आणि या वादावर नेमका कसा तोडगा काढला जाईल, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, देशातील आघाडीच्या समूहात नेमका कशामुळे वाद निर्माण झाला? त्यामागचे काय कारण सांगितले जात आहे? याविषयी जाणून घेऊ…
टाटा समूहात नेमका कशामुळे वाद?
संचालक मंडळावरील नियुक्त्या आणि प्रशासकीय मुद्द्यावरून टाटा समूहात वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या वादामुळे समूहात दोन वेगवेगळे गट पडले असून टाटांचा खरा वारसा आपणच चालवत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि विश्वस्त डेरियस खंबाटा यांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचीदेखील उपस्थिती होती. या बैठकीत टाटा समूहाला कोणत्याही मार्गाने का होईना स्थिरता आणण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या गंभीर वादामुळे समूहातील कामकाजावर परिणाम होऊ नये याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
टाटा समूहात दोन गट कसे पडले?
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टमधील नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या विरोधात मेहली मिस्त्री यांच्या गटाने मोर्चा उघडला आहे. हा गट संचालक मंडळावरील नियुक्त्यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आहे. रतन टाटा यांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री, सिटी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित झावेरी, जहांगीर रुग्णालयाचे अध्यक्ष एच. सी. जहांगीर आणि ज्येष्ठ वकील डेरियस खंबाटा या गटाचे नेतृत्व करत आहेत. टाटा ट्रस्टचे कामकाज अपारदर्शक आणि केंद्रीकृत स्वरूपाचे झाले असून त्यात उत्तरदायित्वाच्या आधुनिक निकषांनुसार बदल करण्याची आवश्यकता असल्याचे या गटाचे म्हणणे आहे.
टाटा समूहाच्या संचालक मंडळावर कोण?
नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन हे टाटा समूहाच्या संचालक मंडळावर आहेत. माजी संरक्षण सचिव विजय सिंह हेदेखील या संचालक मंडळावर होते. परंतु, मेहली मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केल्यामुळे नुकताच विजय सिंह यांनी राजीनामा दिला आहे. नोएल टाटा यांनी सुचवलेल्या तीन उमेदवारांच्या नावांनाही मेहली मिस्त्री गटाने विरोध केल्याचे सांगितले जात आहे. नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, विजय सिंह आणि मेहली मिस्त्री हे सर्व टाटा ट्रस्टच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. ही समिती ट्रस्टच्या एकूण कार्यप्रणाली आणि देखरेखीची जबाबदारी सांभाळते.
मेहली मिस्त्री हे कोण आहेत?
मेहली मिस्त्री हे दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत बंधू आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर ते टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मेहली मिस्त्री गटाने विजय सिंह यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केल्यानेच टाटा समूहात वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. विशेष बाब म्हणजे- विजय सिंह हे नोएल टाटा गटाचे विश्वासू सहकारी मानले जातात. २०१८ मध्ये स्वत: रतन टाटा यांनी या पदावर त्यांची नियुक्ती केली होती. मात्र, आता त्यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध झाल्याने समूहात दोन गट पडल्याची माहिती आहे.
अंतर्गत वादामुळे टाटा समूहाचे नुकसान?
टाटा ट्रस्टमधील अंतर्गत संघर्षामुळे गेल्या वर्षभरात समूहातील कंपन्यांचे बाजार भांडवल अंदाजे ९३ अब्ज डॉलर्सने (सुमारे ७.७ लाख कोटी रुपये) कमी झाल्याची माहिती आहे, त्यामुळे समूहातील समभागधारक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसने विचारलेल्या प्रश्नांना टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. टाटा ट्रस्ट सध्या या संघर्षाबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही, असे समूहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या लिस्टिंगचा प्रश्नदेखील वादग्रस्त ठरत असल्याची माहिती आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दिलेल्या नियामक मुदतीला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा : Breast Cancer : तरुणींमध्ये झपाट्याने वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; काय आहेत कारणं? तज्ज्ञ काय सांगतात?
रतन टाटांच्या जाण्याने समूहात पोकळी
देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या १०० हून अधिक कंपन्या आहेत आणि टाटाचा व्यवसाय जवळपास प्रत्येक क्षेत्रात विस्तारलेला आहे. टाटांनी चहा, मीठ, पाणी, सोने, कारपासून ते विमानांपर्यंत सर्वत्र टाटा समूहाची व्याप्ती केलेली आहे. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला. जगातील सर्वात लहान कार नॅनो तयार केल्याने रतन टाटा जगभरात प्रसिद्ध झाले. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. देशातील जवळपास प्रत्येकाच्या आवडत्या उद्योजकांपैकी ते एक होते. त्यांच्या जाण्याने टाटा समूहात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसून येते. सध्या समूहातील सुरू असलेल्या या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार मध्यस्थी करीत असल्याची माहीती आहे. या वादामुळे समूहावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही सरकारने व्यक्त केली आहे, त्यामुळे हा वाद मिटणार की आणखी उफाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.