जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करीत आहेत. या वर्षात एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध टेक कंपन्या इंटेल, मायक्रोसॉफ्ट, पॅनासोनिक, गुगल व अमेझॉन या कंपन्यांनी कर्मचारीकपात सुरू केली आहे. त्यांनी या वर्षात केवळ सहा महिन्यांत ६२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. सेमीकंडक्टर उत्पादकांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंत प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांकडून आर्थिक अनिश्चितता, टेक कंपन्यांतील मंदी व वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत जुन्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची भरती यांसाठी हे बदल करण्यात येत असल्याची माहिती आहे.
तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही कपात सुरू आहे. इंटेलसारख्या प्रस्थापित हार्डवेअर उत्पादक कंपनीने २१,७०० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. ब्लॉकसारख्या फिनटेक कंपनीकडून १,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जात आहे. या नोकरकपातीचा फटका जागतिक स्तरावर बसताना दिसत आहे. नोकरकपात केलेल्या कंपन्यांमध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश आहे? याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ….
इंटेलकडून आजवरची सर्वात मोठी नोकर कपात
- इंटेलने २०२५ साठी तंत्रज्ञान उद्योगातील सर्वात मोठ्या कपातीची घोषणा केली आहे.
- त्यांच्या धोरणानुसार २१,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखण्यात आली आहे.
- ही संख्या त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे २० टक्के आहे.
- इंटेल ही मोठी सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी असून, ही कपात नवनियुक्त कार्यकारी अधिकारी लिप-बू टॅन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
- लिप-बू टॅन यांनी पॅट गेल्सिंगर यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.
- मुख्य म्हणजे इंटेल जुलैपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या इंटेल फाउंड्री विभागातील १५ ते २० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचीही योजना आखत आहे.
- याचा परिणाम विदेश ग्राहक, सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन व पॅकेज करणाऱ्या युनिटवर होण्याची शक्यता आहे.
- डिसेंबर २०२४ पर्यंत इंटेलची एकूण कर्मचारी संख्या १,०८,९०० इतकी होती.

पॅनासॉनिककडून १०,००० कर्मचाऱ्यांची कपात
जपानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पॅनासॉनिकने १०,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली आहे. ही संख्या त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत चार टक्के आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी युकी कुसुमी म्हणाले की, शतकानुशतके जुन्या कंपनीला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्यासाठी ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जपानमध्ये ५,००० आणि विदेशांत आणखी ५,००० नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेसह नव्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी टेलिव्हिजन आणि औद्योगिक उत्पादनांसारख्या क्षेत्रांमधील उत्पादन कमी करीत आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत म्हटले की, कंपनीच्या वाढीसाठी येणाऱ्या मोठ्या प्रमाणात खर्चाच्या रचनेत कपात करणे आवश्यक आहे.
मायक्रोसॉफ्टकडून ६,५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात
मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये मल्टी-फेज लेऑफ धोरण राबवले आहे. त्यांनी पहिल्यांदा मे महिन्यात ६,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली. त्याचा परिणाम त्यांच्या एकूण २,२८,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे तीन टक्के कर्मचाऱ्यांवर झाला. सिएटलमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. कंपनीने सॉफ्टवेअर अभियंते, उत्पादन व्यवस्थापक, तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक, विपणक व आणि कायदेशीर सल्लागार यांना नोकरीवरून काढले आहे. २०२३ मध्ये कंपनीकडून १०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर या वर्षी मे महिन्यात कंपनीने सर्वांत मोठी कपात केली. कंपनी प्रोग्रॅमर्स आणि उत्पादन व्यवस्थापकांचे प्रमाण वाढविण्यासाठी नॉन-कोडिंग कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचाही विचार करीत आहे.
मेटाकडून पाच टक्के कर्मचाऱ्यांची कपात
मेटाने त्यांच्या पाच टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढण्यात येत असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीने ३,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. फेब्रुवारीमध्ये ही कपात सुरू झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका फेसबुक, होरायझन व्हर्च्युअल रिअॅलिटी प्लॅटफॉर्म आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन्सवर देखरेख करणाऱ्या टीमना बसला आहे. एप्रिलमध्ये मेटाने अतिरिक्त कपातदेखील केली. मेटाने त्यांच्या रिअॅलिटी लॅब्स विभागातील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
एचपीकडून २,००० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
एचपीने त्यांच्या ‘फ्युचर नाऊ’ या उपक्रमाचा भाग म्हणून २,००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे कामकाज सुलभ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनी ही कपात करीत असल्याची माहिती आहे. संगणक आणि प्रिंटिंग मार्केटमध्ये एचपीला सतत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कंपनी अधिक फायदेशीर व्यवसाय मार्ग आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करीत आहे.
गुगलची प्रमुख विभागांमध्ये टाळेबंदी
गुगलने २०२५ मध्ये अनेक वेळा नोकरकपातीची घोषणा केली आहे. अनेक विभागांमधून शेकडो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. गुगलने विक्री विभागातील जागतिक व्यवसाय युनिटमधील २०० कामगारांना काढून टाकले आहे. तसेच अँड्रॉइड, पिक्सेल फोन व क्रोम ब्राउझर यांचा समावेश असलेल्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हायसेस विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे. अधिक सहकार्य वाढविणे आणि ग्राहकांना जलद व प्रभावीपणे सेवा देण्याची आमची क्षमता वाढविणे यांसाठी गुगलकडून अनेक फेरबदल करण्यात येत आहेत. ही नोकरकपातदेखील त्याचाच एक भाग आहे.
ॲमेझॉनकडून अनेक विभागांमधील कर्मचाऱ्यांची कपात
ॲमेझॉनने अनेक विभागांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यांनी अलीकडेच डिव्हायसेस आणि सेवा विभागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यात अलेक्सा व्हॉइस असिस्टंट, ईको स्मार्ट स्पीकर्स, रिंग व्हिडिओ डोअरबेल व झुक्स रोबोटॅक्सिस या विभागांचा समावेश आहे. ही कपात ॲमेझॉनच्या व्यापक खर्च-कपात धोरणाचा एक भाग आहे. २०२२ पासून आतापर्यंत ॲमेझॉनने तब्बल २७,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
ब्ल्यू ओरिजिनकडून १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात
जेफ बेझोस यांची अंतराळ कंपनी ब्ल्यू ओरिजिनने त्यांच्या कामगारांच्या सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्याचा परिणाम १,००० हून अधिक कर्मचाऱ्यांवर झाला आहे. त्यातून व्यावसायिक अंतराळ उद्योगात लक्षणीय घट दिसून येते. मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड लिंप म्हणाले की, कंपनीची प्राथमिकता ग्राहकांसाठी उत्पादनासह प्रक्षेपण गती वाढवणे आहे. अंतराळ उद्योगात झालेल्या बदलांमुळे ही कपात करण्यात आली आहे. त्यात अभियांत्रिकी, संशोधन, विकास व व्यवस्थापन पदांवर लक्ष केंद्रित करून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली.
स्टारबक्सकडून १,१०० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची कपात
मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन निकोल यांच्या नेतृत्वाखालील पुनर्रचनेच्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्टारबक्सने १,१०० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या कपातीत विशेषतः कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले गेले आहे; परंतु त्याचा परिणाम स्टारबक्स स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला नाही. निकोल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या कपातीमुळे स्टारबक्सला अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास, जबाबदारी वाढविण्यास, गुंतागुंत कमी करण्यास मदत होईल. मागील वर्षी विक्रीत घट झाल्यानंतर कंपनीने कर्मचारीकपातीला सुरुवात केली होती.
पोर्शची ३,९०० नोकर कमी करण्याची योजना
जर्मन लक्झरी ऑटोमेकर पोर्शने कार्यक्षमता सुधारणेचा भाग म्हणून येत्या काही वर्षांत ३,९०० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनी २,००० कर्मचाऱ्यांच्या निश्चित मुदतीचे काँट्रॅक्ट संपल्यानंतर त्यांना कमी करणार आहे आणि उर्वरित १,९०० कर्मचाऱ्यांची कपात २०२९ पर्यंत करणार आहे. अधिकाऱ्यांनी संभाव्य बदलांवर चर्चा करताना सांगितले की, हे बदल येणाऱ्या काळात पोर्शला आणखी कार्यक्षम करतील.