Machli Tigress of Ranthambore: रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाची ‘टायगर क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणार्या मछली या वाघिणीचा २०१६ साली वयाच्या १९ व्या वर्षी मृत्यू झाला. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील सुमारे ३५० चौरस मैलाच्या मुख्य क्षेत्रावर राज्य करणारी ही बंगालची वाघीण तिच्या धैर्य, चिकाटी आणि असामान्य संघर्षशक्तीमुळे पर्यटकांची आवडती झाली होती. सर्वसाधारण वाघाची मादी वयाच्या १५ वर्षांपर्यंत जगते. परंतु, मछली मात्र १९ वर्षांपर्यंत जगली. त्यामुळे वाघांच्या इतिहासात सर्वात जास्त जगणारी वाघीण म्हणून तिची नोंद आहे!
तिने १४ फूट लांबीच्या मगरीला ठार मारलं, स्वतःपेक्षा बलाढ्य नर वाघांविरुद्ध लढा देत स्वतःच्या प्रदेशाचं रक्षण केलं. एक डोळा व दात गमावल्यानंतरही आपल्या पिल्लांना वाढवलं. मछली आजच्या कोणत्याही जेनझीला मागे टाकू शकेल इतके तिचे फोटो आहेत. जागतिक पातळीवर ज्या वाघिणीची सर्वाधिक छायाचित्रे काढली गेली, ती म्हणजे मछली. तिचे असंख्य फोटो मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, ब्लॉग्स, कॅलेंडर्स आणि इतर अनेक ठिकाणी झळकले आहेत.
टॅक्सीडर्मीच्या (taxidermy) माध्यमातून जतन करण्याचा विचार
टेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन येथील मांसाहारी प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या संशोधक कॅली डबलडे यांनी नॅशनल जिओग्राफिकशी संवाद साधताना संगितले की, त्या लहानपणापासूनच वाघाच्या (big cats) प्रेमात होत्या आणि त्यांनी मछलीवर आधारित अनेक माहितीपट पाहिले होते. तिच्या मृत्यूनंतर राजस्थानाच्या वन खात्याने टॅक्सीडर्मीच्या (taxidermy) माध्यमातून तिचे जतन करण्याचा विचार केला. या संदर्भात बातमी वाचल्यावर कॅली यांना या वाघिणीचे महत्त्व लक्षात आले.
जतन झालेच नाही
मछलीला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक रणथंबोरला येत होते, त्यातून उद्यानाला जवळपास १० दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळत होता. त्यामुळे त्यांच्या या वाघिणीला गमावण्याची खंत वन अधिकाऱ्यांना वाटत होती. परंतु, शेवटी टॅक्सीडर्मीच्या माध्यमातून तिचे जतन झालेच नाही. या सगळ्या प्रसंगाची माहिती मिळवत असताना डबलडे यांना मछलीच्या लोकप्रियतेची जाणीव झाली. शिवाय, माणसांनी तिची घेतलेली काळजी आणि त्यामुळे तीचं आयुष्य हे पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी या सीमारेषांमध्ये कस अडकलं होतं हे समजून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.
फेब्रुवारी २०१७ साली Geoforum या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या कॅली डबलडे यांच्या संशोधनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नॅशनल जिओग्राफिकने त्यांच्याशी संवाद साधला होता. मछली इतर कोणत्याही वाघापेक्षा इतकी वेगळी का होती हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मछलीचं वेगळेपण नेमकं काय होतं? आणि लोक इतर वाघांपेक्षा तिच्याकडेच का अधिक आकर्षित होत होते? याचाच हा आढावा.
कोणत्याही वाघ असलेल्या राष्ट्रीय उद्यानासाठी मछली आदर्श होती. दिवसा ती निवांत पडून राहत होती. त्यामुळे ती कॅमेरा ‘फ्रेंडली’ ठरली होती. शिवाय ती जे काही करायची ते एखाद्या महितीपटासाठी पूरक असायचं. मुळात ती आधीपासूनच प्रसिद्ध असलेल्या एका वाघिणीची मुलगी होती. तिच्या आईचही नाव मछलीच होत. मोठी झाल्यावर तिनं स्वतःच्या आईलाच आव्हान दिलं. अशी घटना फार क्वचितच घडते. या संघर्षात ती जिंकली आणि ती रणथंबोरच्या तलावांची राणी झाली. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील तलावांचं क्षेत्र संपूर्ण उद्यानातील सर्वात महत्त्वाचं आणि समृद्ध वाघक्षेत्र मानलं जातं (संदर्भ: India’s Tigers May Be Rebounding, in Rare Success for Endangered Species).
मछलीने पर्यटकांच्या डोळ्यांसमोरच स्वतःपेक्षा दुप्पट आकाराच्या पूर्ण वाढ झालेल्या मगरीवर हल्ला करून तिला ठार मारलं होतं आणि हा प्रसंग तिच्या धैर्याचा जिवंत पुरावा ठरला. विशेष म्हणजे तिच्या या धाडसाचा video देखील viral झाला होता. ती स्वतःपेक्षा कितीतरी मोठ्या नर वाघांविरुद्ध आपल्या पिल्लांचं रक्षण करत असे. प्रत्येक वेळी ती जिंकतच होती. नर वाघांमध्ये सिंहांप्रमाणे पिल्लांना मारण्याची प्रवृत्ती असते, कारण पिल्लं मृत झाली की, मादी पुन्हा प्रजननासाठी तयार होते. पण, मछलीने प्रत्येक वेळी आपली सर्व पिल्लं वाचवली आणि हे सगळं कॅमेरासमोर घडत होतं. जणू ती स्वतः एक जिवंत माहितीपट होती.
मछली जसजशी वयस्कर होत गेली, तसंतसं लोकांचं तिच्याशी नातं कसं बदललं?
मछलीने जेव्हा आपले दात गमावले, तेव्हा ती एका विचित्र स्थितीत अडकली. वृद्ध, पण वन्य आणि स्वतंत्र वाघीण. तिचं वय वाढत होत… तरीही ती लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होती. त्याआधी मछली प्रसिद्धी माहितीपटांमधून लोकप्रिय ठरली. भारत सरकारने तर रणथंबोरसाठी निधी मिळावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचाच वापर केला. वृद्धापकाळामुळे तिची परिस्थिति बिकट होती. जगभरातील तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी आवाज उठवला काहीतरी करा, वन खात्याने उपाय करावा, असा दबाव आणला गेला. वन्य प्राण्याच्या आयुष्यात वृद्धापकाळात भुकेमुळे मृत्यू होतो. परंतु, तीच्यावरच्या प्रेमापोटी आंतराष्ट्रीय स्तरावरून राजस्थान वन खात्यावर तिला अन्न पुरवण्याचा दबाव आला. अशी स्थिती याआधी कधीच निर्माण झालेली नव्हती. या अतिप्रसिद्ध वाघिणीची काळजी वन खात्याला घ्यावी लागणार होती.
या प्रसंगाबाबत अनेक मतप्रवाह होते. काहींच मतं असं होत की, मछलीला पकडून प्राणीसंग्रहालयात ठेवावं, जेणेकरून तिचं खाणं-पिणं, तिची व्यवस्थित देखभाल होईल. तर इतर काहींचं मत होतं की, असं करणं म्हणजे तिच्या गौरवाला आणि वन्यत्वाला धक्का देणं होईल. शेवटी वन खात्याने एक मध्यममार्ग निवडला. मछलीला रणथंबोरच्या तिच्याच नैसर्गिक अधिवासात ठेवलं, पण तिला तेथेच अन्न पुरवून तिची देखभाल केली. तिच्यासाठी शेळ्या किंवा इतर छोटे प्राणी खांबाला बांधून ठेवले जात होते. पर्यटकांना हे पाहण्याची परवानगी होती. अधिकारी तिच्यावर सतत लक्ष ठेवत होते, ती नीट खात आहे याची खात्री करतं होते. दात नसतानाही मछली त्या प्राण्यांना स्वतःच्या जबड्याच्या ताकदीने ठार मारू शकत होती. ती इतक्या जोरात जबडा आवळत असे की, श्वास बंद होवून प्राणी बेशुद्ध पडत होते.
मछलीचा शेवट झाला, तेव्हा नेमकं काय घडलं?
मछलीने अगदी तिच्या स्वभावाला साजेशा पद्धतीने, अतिशय शांत आणि सन्मानपूर्वक जगाचा निरोप घेतला. एके दिवशी ती जंगलाच्या आतल्या भागात गेली, निवांतपणे आडवी पडली आणि पुन्हा कधी उठलीच नाही. जेव्हा ती सापडली, तेव्हा तो क्षण अत्यंत भावनिक होता. तिच्यावर पारंपरिक हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या शरीरावर पांढरा कपडा अंथरला गेला आणि फुलांच्या माळांनी तिचं संपूर्ण शरीर सजवलं गेलं. तिच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेले सर्व वनरक्षक आदरपूर्वक उभे राहिले होते.
भारतामध्ये बिबट्या आणि वाघांसारख्या वन्य प्राण्यांची कातडी काळ्या बाजारात विकली जावू नये म्हणून त्यांचं दहन केलं जातं. मछलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तेव्हाचा तो क्षण भारताच्या वन्यजीव इतिहासातील एक अतिशय विलक्षण आणि स्मरणीय क्षण मानला जातो.
