आसिफ बागवान
रील्स, व्हिडीओंना अधिक लोकप्रियता मिळत असतानाही शब्दसंवाद हाच गाभा ठेवून समाजमाध्यम जगतात मोठी उंची गाठणाऱ्या ट्विटरशी थेट स्पर्धा करणारे नवीन समाजमाध्यम गुरुवारपासून रुजू झाले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यम ॲपची निर्मिती करणाऱ्या ‘मेटा’च्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावरील पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा असेल. त्यामुळेच हे ॲप ट्विटरसमोर थेट आव्हान उभे करेल, असे बोलले जात आहे. त्यात कितपत तथ्य आहे, याबद्दलचे हे विश्लेषण.
‘थ्रेड्स’ काय आहे?
‘थ्रेड्स’ हे समाजसंवाद ॲप आहे. यावर वापरकर्ते कोणत्याही विषयावर आपली मते आणि विचार मांडू शकतील, एखाद्या मुद्द्यावर गटचर्चाही करू शकतील. ट्विटरप्रमाणेच या ॲपवर प्रत्येक पोस्टखाली ‘लाइक, शेअर, रिपोस्ट’ अशी बटणे दिसतील. ॲपचा इंटरफेस ट्विटरसारखाच आहे. मात्र, हे ॲप वापरकर्त्यांना प्रत्येक पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा देते. ट्विटरवर सध्या २८० इतकी शब्दमर्यादा आहे. तसेच वापरकर्ते पोस्टसोबत पाच मिनिटे लांबीची चित्रफीत जोडू शकतील. सध्या या ॲपवर वैयक्तिक संदेश पाठवण्याची सुविधा नसली तरी, लवकरच ॲप अपडेट करण्यात येईल, असे ‘मेटा’ कंपनीचे विशेष कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी म्हटले आहे.
‘थ्रेड्स’ला कसा प्रतिसाद?
मार्क झकरबर्ग यांनी चार जुलै रोजी ‘थ्रेड्स’च्या आगमनाची घोषणा केली तेव्हापासून या ॲपबाबत उत्कंठा होती. ॲपल आणि गूगलच्या ॲप स्टोअरवर हे ॲप अनावरणपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांना थेट या ॲपचे सदस्यत्व देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी सव्वादोन कोटी जणांनी हे ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या फॉलोअर्ससह ‘थ्रेड्स’वर येता येणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याआधीही प्रचलित ॲपची नक्कल?
याआधीही ‘मेटा’ने अन्य कंपन्यांच्या प्रचलित ॲपची नक्कल करून ॲप विकसित केले आहेत. इन्स्टाग्रामवरील ‘स्टोरी’ हे त्याचेच एक उदाहरण. स्नॅपचॅट या ॲपवरील अशाच सुविधेची नक्कल करून मेटाने इन्स्टा स्टोरीज सुरू केले. फेसबुकवर दिसणारे रिल्स ही तर थेट टिकटॉकची नक्कल होती. आता ‘थ्रेड्स’च्या रूपात ट्विटरची नक्कल करून ‘मेटा’ने या क्षेत्रात स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
ट्विटरच्या नाराज वापरकर्त्यांवर डोळा?
गेली १७ वर्षे समाजमाध्यम जगतातील प्रभावी व्यासपीठ असलेल्या ट्विटरवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या मार्च २०२३ मध्ये ४५ कोटींच्या घरात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यात बदल करण्याचा जो धडाका लावला आहे, त्यातून अनेक वापरकर्ते ट्विटरला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी मासिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरवरील दररोजच्या ट्विटच्या संख्येवर आलेल्या मर्यादाही वापरकर्त्यांच्या नाराजीचे कारण बनले आहेत. या नाराज वापरकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा थ्रेड्सचा हेतू आहे.
‘थ्रेड्स’च्या पथ्यावर काय?
इन्स्टाग्राम आणि फेसबुक या अतिशय लोकप्रिय ॲपची जोड हा ‘थ्रेड्स’चा सर्वात मोठा फायदा आहे. या दोन्ही ॲपवरील वापरकर्त्यांना या ना त्या प्रकारे ‘थ्रेड्स’वर आणून वापरकर्त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयोग ‘मेटा’ करू शकेल. इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांमध्ये तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हा वर्ग ट्विटरपेक्षा थ्रेड्सला अधिक पसंती देण्याची शक्यता आहे.
…पण लोकप्रियता टिकणार?
‘थ्रेड्स’ने झोकात सुरुवात केली आहे. मात्र, ही लोकप्रियता किती काळ टिकेल, याबद्दल तज्ज्ञांना शंका आहे. त्यामागचे प्रमुख कारण ‘मेटा’ची धरसोड वृत्ती आहे. याआधीही मेटाने अनेक ॲप्स सुरू करून बंद केले आहेत. विशेषत: मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांचे पूर्ण लक्ष्य सध्या त्यांच्या ‘मेटायुनिव्हर्स’ या प्रकल्पावर केंद्रित आहे. अशा वेळी ‘थ्रेड्स’ला किती आर्थिक पाठबळ मिळेल, हे पाहावे लागेल. थ्रेड्सची एकूण मांडणी अतिशय साधी असून ती आकर्षक करण्याचे आव्हानही ‘मेटा’समोर आहे. शिवाय या ॲपबद्दल आतापासूनच ‘प्रायव्हसी’ उल्लंघनाच्या तक्रारी येत आहेत. याच कारणाने युरोपीय महासंघाशी संलग्न २७ देशांत हे ॲप सुरू होऊ शकलेले नाही. वापरकर्त्यांच्या माहितीचा वापर हा सध्या कळीचा मुद्दा असून याच मुद्द्यावर अन्य देशही ‘थ्रेड्स’ला अटकाव घालू शकतात. अशा स्थितीत या ॲपचा निभाव कसा लागेल, हा प्रश्न आहे.