अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात कतारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना कतारच्या शासक कुटुंबाकडून आलिशान असे बोईंग ७४७-८ विमान भेट म्हणून मिळणार असल्याची सध्या चर्चा होत आहे. यावर टीकाकारांनी असा युक्तिवाद केला आहे की, हा करार अमेरिकेच्या संविधानाच्या परराष्ट्र वेतन कलमाचे उल्लंघन करू शकतो. साधारण ४०० दशलक्ष डॉलर्स एवढ्या किमतीचे हे विमान अमेरिकेला प्रस्तावित केलेल्या सर्वात महागड्या भेटवस्तूंपैकी एक आहे.

कतारकडून भेट की धोरणात्मक भागीदारी?

काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, कतार सरकारच्या मालकीचे हे विमान एअरफोर्स वन म्हणून तात्पुरत्या वापरासाठी अमेरिकन संरक्षण विभागाला देण्यात आले आहे. याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. कतारचे प्रवक्ते अली अल अन्सारी यांनी सांगितले की, “एअर फोर्स वन म्हणून तात्पुरत्या वापरासाठी विमानाचे संभाव्य हस्तांतरण सध्या कतारचे संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण विभाग यांच्या विचाराधीन आहे. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.”

ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये प्रवास केलेल्या दुसऱ्या कतारी ७४७-८ या मॉडेलसारखेच हेही विमान आहे. त्यावेळी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, हा दौरा ट्रम्प यांना एअरफोर्स वन विमानांच्या नवीन व्हर्जनला कसे सुसज्ज केले जाईल हे आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी करण्यात आला होता.
एबीसी न्यूजने प्रथम याबाबत माहिती प्रसारित केली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये याबाबत सांगण्यात आले होते. “संरक्षण विभागाला ४० वर्षे जुन्या एअर फोर्स वनच्या जागी तात्पुरते ४७४ विमान मोफत भेट म्हणून मिळत आहे. हा करार सार्वजनिक आणि पारदर्शकरित्या केला जाईल, जेणेकरून यावरून वादविवाद उद्भवणार नाहीत; यासाठी आम्ही अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.”

नैतिकतेचा मुद्दा
ट्रम्प आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित व्यवस्थेचा बचाव करदात्यांच्या खर्चात बचत करण्याचा उपाय म्हणून केला आहे. सरकारी नीतिमत्तेतील तज्ज्ञांनी या योजनेवर तीव्र टीका केली आहे.
अनेकांचा असा युक्तिवाद आहे की, ज्यांच्याशी अध्यक्षांच्या कुटुंबाचे व्यावसायिक हितसंबंध आहेत, त्यांच्याकडून अशा मौल्यवान वस्तू स्वीकारणे हे नैतिक उल्लंघन आहे.
एपी (असोसिएटेड प्रेस)ने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉच्या प्राध्यापक कॅथलीन क्लार्क यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, “धोरणात्मक उद्दिष्टांसाठी नव्हे तर वैयक्तिक संपत्ती जमवण्यासाठी संघीय सरकारच्या अधिकाराचा गैरफायदा घेत असल्याचे यावरून दिसून येते.”
अमेरिकन संविधानाच्या इमोल्युमेंट्स कलममध्ये संघीय अधिकाऱ्यांना काँग्रेसच्या स्पष्ट मंजुरीशिवाय परदेशी सरकारांकडून भेटवस्तू, देयके किंवा पदव्या स्वीकारण्यास मनाई आहे.

वॉशिंग्टनमधील सिटीझन्स फॉर रिस्पॉन्सिबिलिटी अँड एथिक्स (CREW) चे प्रवक्ते जॉर्डन लिबोविट्झ यांनी म्हटले की, “आम्ही कधीही ४०० दशलक्ष डॉलर्सच्या विमानाच्या पातळीवर काहीही पाहिले नाही. हे आम्ही यापूर्वी कधीही पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप जास्त आहे.”
पश्चिम आशियाच्या व्यापक दौऱ्याचा भाग म्हणून राष्ट्रपती कतारला भेट देणार आहेत. यामध्ये सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचादेखील समावेश आहे. त्यांच्या भेटीदरम्यान हे विमान औपचारिकपणे स्वीकारले जाणार नाही.

ट्रम्प यांचे व्यावसायिक हितसंबंध

टीकाकारांनी आखाती प्रदेशात ट्रम्प यांच्या दीर्घकालीन आणि विस्तारित व्यवसाय उपक्रमांकडेही लक्ष वेधले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि एरिक ट्रम्प यांच्या व्यवस्थापनाखालील ट्रम्प ऑर्गनायझेशनने त्या प्रदेशात अनेक भागीदारी केल्या आहेत.

ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या प्रशासनाची कतारवरील भूमिका लक्षणीयरीत्या बदलली. सुरुवातीला शेजारील आखाती राष्ट्रांनी दोहाच्या नाकेबंदीला पाठिंबा देत ट्रम्पने नंतर देशाचे कौतुक केले आणि सुधारित संबंध प्रदर्शित केले. या विकसित होत असलेल्या संबंधांमुळे परराष्ट्र धोरणाचे निर्णय आर्थिक अडचणींमुळे किंवा वैयक्तिक फायद्यामुळे प्रभावित होत आहेत का याबद्दल अतिरिक्त प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इतिहास काय सांगतो?

कायदेशीर आक्षेप टाळण्यासाठी व्हाईट हाऊसच्या वकिलांच्या कार्यालयाने आणि न्याय विभागाने अंतर्गत कायदेशीर पुनरावलोकन केल्याचे वृत्त समोर आले आहे. एबीसी न्यूजच्या माहितीप्रमाणे, त्यांच्या विश्लेषणातून असा निष्कर्ष निघाला की, अमेरिकेचे संरक्षण विभाग कायदेशीररित्या विमान भेट म्हणून स्वीकारू शकते आणि नंतर ते राष्ट्रपती ग्रंथालयांची देखरेख करणाऱ्या खासगी संस्थेकडे हस्तांतरित करू शकते.
यावेळी ट्रम्प प्रशासनाने रेगनच्या उदाहरणाकडे लक्ष वेधले आहे. रोनाल्ड रेगनचे निवृत्त एअर फोर्स वन शेवटी त्यांच्या राष्ट्रपती ग्रंथालयात प्रदर्शित केले गेले होते.
मात्र, टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की, पद सोडल्यानंतर रेगन यांनी कधीही वैयक्तिक वापरासाठी विमान वापरले नाही आणि ते कधीही परदेशी सरकारकडून भेट नव्हते.

सीएनएनचे वैद्यकीय विश्लेषक जोनाथन रायनर यांनी एक्सवर पोस्ट केले की, “एअर फोर्स वन हे हवाई दलाचे विमान आहे, ते एक लष्करी विमान आहे.”
माजी सरकारी अधिकाऱ्यांनी असा इशाराही दिला आहे की, परदेशी बनावटीचे विमान तसंच राष्ट्रपतींच्या वापरासाठी सुधारित केलेले विमान सुरक्षितता आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने धोका निर्माण करू शकते.
या प्रकरणाची माहिती मिळालेल्या एका माजी अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, प्रतिकारक उपाययोजना आणि सुरक्षित संप्रेषण प्रणाली लवकर जोडता आल्या तरी विमानात सध्याच्या एअर फोर्स वन ताफ्यात अंतर्भूत असलेल्या अनेक क्षमतांचा अभाव असेल. यामध्ये न्यूक्लियर आणि ईएमपी शिल्डिंग आणि हवाई इंधन भरण्याची वैशिष्ट्ये आहेत.

बोईंग ७४७-८ विमानांच्या नवीन ऑर्डर केलेल्या व्हीसी-२५बी विमानांच्या वितरणात विलंब झाल्याबद्दल ट्रम्प यांनी बराच काळ असमाधान व्यक्त केले आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात झालेल्या करारानंतर २०२४ मध्ये विमानाचे वितरण होणार होते. मात्र, अमेरिकन एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांच्या अलीकडच्या काँग्रेसच्या साक्षीनुसार या विमानांचे वितरण आता किमान २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

कतारचे विमान स्वीकारले गेले तर ट्रम्प त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अधिकृत VC-25B तयार होईपर्यंत या विमानाचा वापर करतील अशी अपेक्षा आहे. जानेवारी २०२९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे विमान त्यांच्या भावी राष्ट्रपती ग्रंथालयाचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेला दान केले जाईल. CREW मधील लिबोविट्झ यांनी असे म्हटले आहे की, “राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या भेटवस्तूंची एकूण संख्यादेखील या पातळीच्या जवळपासही पोहोचत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.