भक्ती बिसुरे
एक ते सात एप्रिल हा आठवडा भारतात दरवर्षी अंधत्व प्रतिबंधक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. जन्मजात अंधत्व, उपचार करता येण्याजोगे अंधत्व, प्रतिबंध करता येण्याजोगे अंधत्व असे अंधत्वाचे प्रमुख प्रकार भारतात दिसून येतात. जन्मजात अंधत्व का येते, उशिराने अंधत्व येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, त्यांवर उपाय आहेत की नाही असे अंधत्वाशी संबंधित पैलू समजून घेणे आणि ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने साजरा केला जाणारा अंधत्व प्रतिबंधक सप्ताह सध्या सुरू आहे. त्यानिमित्ताने हे विश्लेषण.
अंधत्व आणि त्याचे प्रकार?
आपल्या आजूबाजूला सहसा प्रमुख तीन प्रकारचे अंधत्व दिसून येते. जन्मजात अंधत्व, उपचार करता येण्याजोगे अंधत्व, प्रतिबंधात्मक अंधत्व हे ते प्रकार आहेत. बालकांमध्ये जन्मजात येणाऱ्या अंधत्वाचे निदान लवकर झाले असता १० टक्के रुग्णांमध्ये ते बरे करता येते. उर्वरित सुमारे ८० टक्के अंधत्वाच्या रुग्णांचे अंधत्व हे योग्य निदान आणि उपचारांनी टाळता येणे शक्य आहे. भारतात सध्या दिसणारे आणि उशिराने येणारे अंधत्व यांमागे कॅटरॅक्ट, अनियंत्रित मधुमेह, काचबिंदू आणि मोतीबिंदू अशी कारणे दिसतात.
अंधत्वाची कारणे कोणती?
अंधत्व हा केवळ वैद्यकीय नाही तर सामाजिक समस्येचा भाग आहे. माहिती आणि सोयीसुविधांचा अभाव, अंधश्रद्धा, शहरी भागात बदललेली जीवनशैली, वाढता स्क्रीनटाईम अशा अनेक कारणांमुळे आज अंधत्वाला निमंत्रण मिळत आहे. वयाच्या पन्नाशी ते साठीच्या दरम्यान मोतीबिंदू हा भारतात सर्वसाधारणपणे आढळणारा नेत्रविकार आहे. मोतीबिंदूकडे केलेले दुर्लक्ष हे रुग्णाला अंधत्वाकडे घेऊन जाते. मात्र, मोतीबिंदूमुळे आलेले अंधत्व पूर्ण बरे करणे शक्य असते. अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रामुळे सहसा कोणत्याही वयात मोतीबिंदूमुळे गेलेली दृष्टी परत येते.
विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?
काचबिंदू या आजारामध्ये मात्र तातडीने निदान आणि उपचार यांमुळेच अंधत्व टाळणे किंवा त्याला विलंब करणे शक्य असते. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या गंभीर अपघातात डोळ्यांना किंवा डोळ्यांच्या हालचाली सुनियोजित राखणारी यंत्रणा दुखापतीने विस्कळित झाल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते. याला वैद्यकीय परिभाषेत ‘पॉलिट्रॉमा’ असे म्हणतात. पॉलिट्रॉमा सदृश परिस्थितीत इतर तातडीच्या उपचारांबरोबरच नेत्ररोगतज्ज्ञांकडून तपासणी होणेही आवश्यक ठरते, याकडे डॉक्टर लक्ष वेधतात. अलीकडे मोबाइल, संगणक यांच्या वाढत्या वापरामुळे स्क्रीनटाईम हेही अंधत्वाला निमंत्रण देणारे एक प्रमुख कारण ठरत आहे.
कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको?
डोळ्यांच्या आरोग्याशी तसेच दिसण्याशी संबंधित कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे, नेत्ररोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास विलंब करणे त्या रुग्णाला अंधत्वाच्या दिशेने घेऊन जाणारे ठरते. पुणे येथील ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मधुसुदन झंवर सांगतात,की आता पूर्वीप्रमाणे डोळे येणे हा प्रकार फारसा दिसत नाही. आता डोळे कोरडे पडणे म्हणजेच ड्राय आय सिंड्रोमचे प्रमाण लक्षणीय आहे. स्मार्ट गॅजेट्सचा वाढता वापर हे याचे प्रमुख कारण आहे. डोळे लाल होणे, डोळे चुरचुरणे, सतत डोळे चोळावेसे वाटणे हे ड्राय आय सिंड्रोमचे लक्षण आहे. अशा लक्षणांवर नेत्ररोगतज्ज्ञाचा सल्ला न घेता औषध दुकानातून विकत घेतलेले ड्रॉप वापरणे हे गुंतागुंत वाढवणारे ठरते. काचबिंदू हा मोतीबिंदूच आहे, असे समजून केलेल्या दुर्लक्षातून होणारा विलंब हाही अंधत्वाला निमंत्रण देतो, असे डॉ. झंवर सांगतात.
नेत्रविकार टाळण्यासाठी काय करावे?
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या मुळे सांगतात,की वयाच्या चाळिशीनंतर प्रत्येकाने चष्म्याच्या दुकानातून नव्हे, तर नेत्ररोगतज्ज्ञाकडून डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. मोतीबिंदू, काचबिंदू यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेहाच्या रुग्णांनी आपला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपचारांमध्ये सातत्य ठेवावे. कामानिमित्त संगणक, मोबाइलचा वापर अनिवार्य असलेल्या व्यक्तींनी दर २० मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती द्यावी. हिरवी झाडे किंवा तत्सम गोष्टींकडे पाहून डोळ्यांना आराम मिळतो. नवजात बालकांमधील अंधत्व टाळण्यासाठी गर्भवती महिलांमध्ये जन्माच्या वेळी उद्भवलेली गुंतागुंत, जंतुसंसर्ग, बाळाच्या डोळ्यांची अपूर्ण वाढ, जन्मजात मोतीबिंदू किंवा काचबिंदू, दिवस पूर्ण भरण्यापूर्वी झालेली प्रसूती अशी कारणे असतात. त्यामुळे जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये बाळांच्या डोळ्यांची तपासणी केल्यास संभाव्य अंधत्व टाळणे शक्य आहे.
विश्लेषण : उंच पाळण्यातून मुंबई दर्शन! कसा असेल ‘मुंबई आय’ प्रकल्प?
बाळांचे लसीकरण वेळापत्रक सांभाळणे, मुलांना पोषक आहार देणे यांमुळे जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे येणारे संभाव्य अंधत्व किंवा दृष्टिदोष टाळणे शक्य आहे. लहान मुलांच्या आहारात पालक, गाजर, अंडी, लोणी यांचा अंतर्भाव केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या मुळे यांनी दिली.
bhakti.bisure@expressindia.com