US Designates The Resistance Front as terrorist Organisation : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २५ भारतीयांसह एका विदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आता तीन महिन्यानंतर अमेरिकेनं या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी त्या संदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, टीआरएफ संघटना नेमकी आहे तरी काय? आणि तिचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी का जोडला जातोय? अमेरिकेनं या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित का केलं? या निर्णयाचं महत्त्व काय आहे? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

TRF संघटना नेमकी काय आहे?

‘द रेसिस्टन्स फ्रंट’ ही संघटना लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या शाखांपैकी एक मानली जाते. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवादाला स्थानिक स्वरूप देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. टीआरएफच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी गटांनी काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलं. तसेच त्यांना संघटनेत भरती करून भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडलं. या संघटनेतील अनेक दहशतवादी हे जम्मू-काश्मीरमधील असून त्यांना पाकिस्तानामध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे.

पाकिस्तान ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (FATF) ग्रे लिस्टमध्ये असताना त्यांनी लष्कर-ए-तोयबा व जैशे मोहम्मद यांसारख्या गटांना कार्यरत ठेवणं टाळलं आणि त्यांच्याऐवजी टीआरएफ या दहशतवादी संघटनेला पुढे आणलं, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कलम ३७० हटवल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये श्रीनगरमधील एका बाजारात ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू तर काही जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळी हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने घेतली होती. मात्र, सुरुवातीला सुरक्षा यंत्रणांनी हा हल्ला ‘दंगलीचा प्रकार’ म्हणून खोडून काढला होता.

आणखी वाचा : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अटक; प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं?

२०२० मध्ये पहिल्यांदा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर

श्रीनगरमध्ये दोन महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या जनजीवनात अडथळा निर्माण करणे हा या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश होता असं सांगितलं जातं. २०२० च्या मध्यापर्यंत टीआरएफने काश्मीरमध्ये अनेक लक्षवेधी हल्ले करून आपली उपस्थिती ठामपणे दाखवून दिली. काही काळातच या संघटनेचे संबंध पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ला पहिल्यांदा दहशतवादी संघटना म्हणून संबोधलं. अधिकाऱ्यांच्या मते, टीआरएफ ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची शाखा असली तरी ती इतर दहशतवादी संघटनांना हाताशी धरून काम करते.

जम्मू-काश्मीरमध्ये अनेक संघटना

गेल्या तीन वर्षांत ‘काश्मीर फाईट’, ‘काश्मीर टायगर्स’ यांसारख्या अनेक संघटनांची नावे समोर आलेली आहेत. या संघटनांमध्ये सक्रिय असलेले कार्यकर्ते हे एकच असून फक्त त्यांची नावे वेगवेगळी आहेत. हे सर्व छुप्या स्वरूपातील गट आहेत. ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या संघटनेला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याचा निर्णय भारतासाठी मुत्सद्देगिरीतील एक मोठे यश मानले जात आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मैदानात या निर्णयाचा किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही, असं मत काश्मीरमधील वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.

सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी काय म्हणाले?

“द रेसिस्टन्स फ्रंट संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेचा हा निर्णय भारतासाठी मुत्सद्देगिरीचा विजय आहे आणि यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे; पण जेवढं दहशतवादाचं वास्तव आहे, त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. आपल्याकडे पूर्वीची अनेक उदाहरणं आहेत — लष्कर-ए-तोयबा, जैशे मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन यांनादेखील दहशतवादी संघटना घोषित केलं गेलं होतं; पण त्यांनी आपले हल्ले थांबवले नाहीत,” असं जम्मू-काश्मीर पोलिसांच्या दहशतवादविरोधी यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

America on TRF terrorist Organization
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला

“टीआरएफ ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा किंवा जैशे मोहम्मद या संघटनांसारखी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत नाही. ती फक्त जम्मू-काश्मीरपुरती मर्यादित आहे. काही दिवसांनी तुम्हाला हेच लोक नव्या नावाने पुन्हा कार्यरत होताना दिसू शकतात. हे लोक केवळ संघटनांची नावे बदलतात; पण त्यांचा हेतू दहशतवादी हल्ले करण्याचाच राहतो”, असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. “टीआरएफसारख्या संघटनांचा ‘दहशतवाद’ हाच मुख्य उद्देश असतो, ते कोणत्या नावाने काम करतात हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं नसतं. ही एक भूमिगत संघटना आहे आणि त्यांच्या मालमत्ता किंवा रचना याबाबत फारशी माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक आघात करणे कठीण आहे,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा : ‘City Killer’ अशनी पृथ्वीवर धडकणार का? खगोलशास्त्रज्ञांनी याविषयी कोणता धोका वर्तवला?

अमेरिकेच्या निर्णयामुळे पाकिस्तानवरील दबाव वाढणार?

अमेरिकेने टीआरएफ या संघटनेला दहशतवादी ठरवल्यानं पाकिस्तानला मागे हटण्याचा इशारा मिळू शकतो, असा विश्वासही भारतीय सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. “अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेची अप्रत्यक्ष मदत केल्यानंतर आणि अलीकडेच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजन केल्यानंतर पाकिस्तानला कदाचित वाटले असेल की, दहशतवादाला खतपाणी घालण्याचे त्यांना कोणतेही प्रतिकूल परिणाम भोगावे लागणार नाहीत. मात्र, आता अमेरिकेनं थेट टीआरएफला दहशतवादी घोषित केल्यानं पाकिस्तानची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. जर अमेरिकेनं या संघटनेविरोधात कारवाईचा बडगा उगारला तर पाकिस्तान सरकारवरील दबाव वाढेल आणि त्यांना या संघटनेच्या दहशतवाद्यांना आश्रय देता येणार नाही, असंही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीआरएफला दहशतवादी संघटना ठरवल्यामुळे काय होणार?

अमेरिकेने टीआरएफ ही संघटना फॉरेन टेरर ऑउटफिट असल्याची घोषणा केल्यानंतर आता या संघटनेची आर्थिक नाकेबंदी केली जाईल. या संघटनेवर आर्थिक व प्रवासी निर्बंध लागू केले जातील. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटलं आहे की, यामुळे दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये जागतिक भागीदारांबरोबर वॉशिंग्टनचे सहकार्य आणखी मजबूत होईल. दरम्यान, वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’ वर पोस्ट करीत अमेरिकेचे आभार मानले आणि दहशतवादाविरोधातील भारताची ठाम भूमिका पुन्हा मांडली. “भारत-अमेरिका दहशतवादाविरोधी सहकार्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. TRF ला दहशतवादी संघटना घोषित केल्याबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे आभार. TRF ही लष्कर-ए-तोयबाची संघटना असून तिने २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, दहशतवादाला माफी नाही!” असं दूतावासानं म्हटलं.