scorecardresearch

Premium

चिले, थायलंड ते राणीगंज! जगातील अशा बचावकार्य मोहिमा ज्या सिलक्यारा बोगद्यापेक्षाही होत्या आव्हानात्मक; जाणून घ्या…

उत्तराखंडमध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमेप्रमाणेच थायलंडमध्ये राबवण्यात आलेल्या बचावकार्याची जगभरात चर्चा झाली होती.

Uttarakhand tunnel rescue
सिलक्यारा बोगद्यातून मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. (Express photo by Chitral Khambhati)

साधारण दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. या मजुरांची सुटका करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या क्षेत्रातील तज्ज्ञ अहोरात्र मेहनत घेत होते. दरम्यान या बचावमोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. याच पार्श्वभूमीवर जगात घडलेल्या अशाच काही घटना पाहू या…

२०२३- अमेरिकन शास्त्रज्ञाला वाचवण्यासाठी विशेष मोहीम

उत्तराखंड राज्यातील सिलक्यारा बोगद्याप्रमाणेच जगात अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. २०२३ सालच्या सप्टेंबर महिन्यात दक्षिण टर्कीमधील एका गुहेत ४० वर्षीय शास्त्रज्ञ मार्क डिकी फसले होते. ते मूळचे अमेरिकेचे नागरिक आहेत. आपल्या शोधकार्यादरम्यान ते गुहेत अचानकपणे आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी खास मोहीम राबवण्यात आली होती.

women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?
chunabhatti hindu cemetery in worse condition
मुंबई: चुनाभट्टी स्मशानभूमीची दुरावस्था
indian government, fencing, indo-myanmar border, surveillance, chin national front, Mizoram, Manipur, Nagaland, Arunachal Pradesh
म्यानमारच्या सीमेवरले संभाव्य कुंपण कुणाला टोचणार?
Canada visa
कॅनडाच्या नव्या इमिग्रेशन कायद्यामुळे पंजाबमधील सौभाग्यकांक्षिणींचे स्वप्नभंग, नेमकं प्रकरण काय?

सर्वाधिक तिसऱ्या क्रमांच्या खोल गुहेत अडकले होते डिकी

त्यांच्या आतड्यांमधून अचानकपणे रक्तस्त्राव होत होता. त्यांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील २०० बचावकर्त्यांना पाचारण करण्यात आले होते. यामध्ये टर्की, क्रोएशिया, इटली तसेच अन्य देशांतील तज्ज्ञांचा समावेश होता. टर्कीमधील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाच्या खोल गुहेत डिकी अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी नऊ दिवस लागले होते.

गुहेत चिखल, पाणी असल्यामुळे बचावकार्यात अडथळा

अल जझिराने दिलेल्या वृत्तानुसार डिकी यांना बाहेर काढताना बचावकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. गुहेत अनेक ठिकाणी चिखल, पाणी होते. तसेच कमी तापमान असल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले होते. डिकी यांना बाहेर काढण्यासाठी एकूण ९० लोकांची मदत घ्यावी लागली होती.

२०१८ सालची थायलंडमधील बचावमोहीम

उत्तराखंडमध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमेप्रमाणेच थायलंडमध्ये राबवण्यात आलेल्या बचावकार्याची जगभरात चर्चा झाली होती. कारण सॉकर खेळ खेळणाऱ्या मुलांचा एक संघ थायलंडच्या एका गुहेत अडकला होता. २३ जून २०१८ रोजी मुलांचा हा संघ आपल्या प्रशिक्षकांसोबत थायलंडमधील ‘थाम लुआंग नांग नोन’ नावाच्या गुहेत गेला होता. ही गुहा उत्तर थायलंडमध्ये आहे. गुहेत गेल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस आल्यामुळे ही मुले आपल्या प्रशिक्षकासह गुहेत अडकली होती. त्यांना बाहेर येता येत नव्हते.

सात दिवसांनंतर अडकलेल्या मुलांचा शोध

या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी दोन ब्रिटीश डायव्हर्स प्रयत्न करत होते. सलग सात दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर या डायव्हर्सना गुहेत अडकून पडलेल्या १२ मुलांचा शोध लागला होता. या मुलांचा शोध लागल्यानंतरही त्यांना बाहेर काढणे मोठे आव्हानात्मक झाले होते. शेवटी अथक प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले होते.

बचावकार्यात १० हजार लोक

दरम्यान, या बचावमोहिमेत एकूण १० हजार लोक काम करत होते, तर तब्बल ९० डायव्हर्सने या मुलांना बाहेर काढले होते. हे डायव्हर्स वेगवेगळ्या देशातील होते. गुहेत अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात यश आलेले असले तरी या मोहिमेत नौदलाचे डायव्हर समन गुनान यांचा मृत्यू झाला होता.

२०१०- चिले देशातील खाण कामगारांची सुटका

चिले देशात २०१० सालच्या ऑगस्ट महिन्यात अटकामा वाळवंटातील एका खाणीत तब्बल ३३ मजूर अडकले होते. कॉपर, सोने तसेच इतर खनिजांसाठी खोदकाम करण्यासाठी ते गेले होते. मात्र, खाणीचा काही भाग मध्येच कोसळल्यामुळे हे मजूर खाणीत १०० फूट खोल अडकले होते. बाहेर येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे हे मजूर नंतर आपत्कालीन शेल्टरमध्ये गेले होते. मात्र, या ठिकाणी मर्यादित अन्न आणि पाणी होते.

या मजुरांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी उत्तराखंडप्रमाणेच बचावमोहीम राबवण्यात आली होती. अडकलेले मजूर हे १९ ते ६३ वर्षे वयोगटातील होते. तब्बल १७ दिवस खोदकाम केल्यानंतर या लोकांचा ठावठिकाणा समजला होता. या लोकांशी संपर्क झाल्यानंतर आम्ही सगळे सुखरुप आहोत, असा संदेश या लोकांनी बाहेर दिला होता. या लोकांशी एकदा संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर त्यांना बाहेरून पाणी, अन्न आणि औषध दिले जात होते. ऑगस्ट महिन्यात ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर साधारण ६९ दिवस हे मजूर सॅन जोस नावाच्या खाणीत अडकून पडले होते.

२००६- बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची सुटका

भारतात २००६ सालाच्या जुलै महिन्यात प्रिन्स कुमार कश्यप नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. ही घटना हरियाणा राज्यातील लहधेरी या गावात घडली होती. या पाच वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी तेव्हा शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. प्रिन्स नावाचा हा मुलगा आपल्या मित्राला सोबत घेऊन उंदराचा पाठलाग करत होता. पाठलाग करत असलेला उंदीर बोअरवेलवर ठेवलेल्या पोत्यात जाऊन लपला होता. याच पोत्यावर उडी मारल्यानंतर पाच वर्षांचा छोटा प्रिन्स थेट बोअरवेलमध्ये जाऊन पडला होता. त्याला सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी भारताचे लष्कर मैदानात उतरले होते. या बोअरवेलमध्ये एक छोटा बल्ब लावण्यात आला होता. तसेच खाली पडलेल्या मुलाला जेवण म्हणून पारले-जी बिस्किट्स देण्यात आले होते. तब्बल ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर या मुलाला बाहेर काढण्यात यश आले होते.

१९८९- राणीगंज खाण कामगारांसाठी बचावमोहीम

१९८९ साली राणीगंज येथील कोलीयरी नावाच्या कोळसा खाणीत तब्बल ६५ खाण कामगार अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यासाठी तेव्हा अभियंता असलेले जसवंत गिल यांनी मोलाची कामगिरी केली होती. या खाणीत साधारण २०० मजूर काम करत होते. १३ नोव्हेंबर १९८९ रोजी या खाणीत अचानकपणे पाणी वाढले. त्यानंतर गडबडीत १६१ मजुरांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, अजूनही साधारण ६५ मजूर खाणीत अडकलेलेच होते. या दुर्घटनेत एकूण सहा मजुरांचा मृत्यू झाला होता.

या मजुरांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या टीम स्थापन करण्यात आल्या होत्या. यातीलच एका टीमचे नेतृत्व हे जसवंत गिल करत होते. एक क्षणही न थांबता सतत दोन दिवस काम करून अडकलेल्या ६५ कामगारांना बाहेर काढण्यात आले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttarakhand silkyara tunnel rescue operation known worlds daring rescue missions prd

First published on: 30-11-2023 at 17:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×