भक्ती बिसुरे

अतिप्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत, असा सल्ला नेहमीच दिला जातो. अलीकडे ‘डाएट’च्या नवनव्या प्रकारांमध्येही ‘नो प्रोसेस्ड फूड’ ही अट आहारतज्ज्ञांकडून घातली जाते. आहारातील केवळ मीठ या एका घटकाचा अतिरेक कमी केला तरी वर्षांकाठी लाखो लोकांचे प्राण वाचवणे शक्य होईल, असा अहवाल नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला. प्रक्रिया केलेले, पाकीट किंवा बाटल्यांमधून विकले जाणारे पदार्थ का घातक आहेत? ते का टाळायला हवेत, याविषयी..

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

प्रक्रिया केलेले अन्न का टाळावे?

‘वायर्ड’ या संकेतस्थळाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. १९७५ ते २००९ या काळात ब्राझिलमधील वजनदार माणसांच्या प्रमाणात सुमारे तिप्पट वाढ झाली. या वाढीचे कारण शोधण्यासाठी ‘सुपर मार्केटमधून ग्राहक काय खरेदी करतात?’ याचे सर्वेक्षण करण्यात आले. ग्राहक मीठ, साखर, मेद अशा गोष्टी फारशा खरेदी करत नाहीत, असे त्यात दिसले. तरीही लठ्ठपणा येण्याचे कारण काय? शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सुपर मार्केटमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या पदार्थाच्या यादीत ब्रेड, प्रक्रिया केलेले मांसाचे प्रकार, चिप्स, फळांच्या रसांचे कॅन्स किंवा टेट्रापॅक, गोड पदार्थ, इन्स्टंट नूडल्स, रेडी टू इट पदार्थ यांचे प्रमाण प्रचंड असल्याचे दिसून आले. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांनी या माहितीचे विश्लेषण केले असता प्रक्रिया केलेले पदार्थ हेच वजनवाढ आणि त्यामागोमाग येणाऱ्या आजारांमागचे कारण असल्याचे नोंदवण्यात आले.

प्रक्रिया केलेले अन्न म्हणजे काय?

भारतात शेकडो वर्षांपासून अन्न पदार्थावर विविध प्रक्रिया केल्या जात आहेत. मुरवणे, खारवणे, वाळवणे, आंबवणे, तळणे, शिजवणे, विरजणे या सर्व प्रक्रियाच आहेत. कच्च्या अन्नपदार्थावर, धान्यांवर विविध प्रक्रिया करूनच घरी रोज ताजा स्वयंपाक केला जातो, मग घरचे जेवणही प्रक्रिया केलेले अन्न या वर्गात मोडते का? ‘प्रोसेस्ड फूड’ची व्याख्या आहारतज्ज्ञ अत्यंत काटेकोरपणे करतात. विक्री आणि साठवणुकीच्या हेतूने जे अन्न पदार्थ विविध यांत्रिक आणि रासायनिक क्रियांमधून जातात ते ‘प्रोसेस्ड फूड’ या प्रकारात मोडत असल्याचे आहारतज्ज्ञ स्पष्ट करतात. आरोग्यासाठी हानीकारक असलेले बहुसंख्य पदार्थ हे बंद पाकिटे, बाटल्या किंवा खोक्यांमधून विकले जातात. यांपैकी बहुतांश प्रक्रिया या पदार्थाचा साठवणकाळ वाढवण्यासाठी केल्या जातात. त्यामुळे हे पदार्थ काही वर्षांपर्यंत विशिष्ट तापमानात उत्तम परिस्थितीत राहतात आणि त्यांची विक्री करणे सोपे होते. या प्रकारच्या अन्नपदार्थावर पोषण तक्ता, वापरण्यायोग्य कालावधी, साठवणूक आणि वापराबाबत सूचना अशा गोष्टींचा उल्लेख असतो. घरगुती स्वरूपातील प्रक्रिया आणि व्यावसायिक उद्देशाने केलेल्या प्रक्रिया या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

प्रक्रिया केलेल्या आहाराचे परिणाम?

प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थाच्या सेवनातून मोठय़ा प्रमाणात साखर, मीठ, तेल (मेद), कृत्रिम स्वाद असे घटक शरीरात जातात. सामान्यपणे हे पदार्थ भूक चाळवणारे असतात, परिणामी त्यांच्या सेवनावर नियंत्रण राहत नाही. चिप्स, पेये, मांसाचे पदार्थ हे इतर पदार्थाच्या तुलनेत जास्त खाल्ले जातात. गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे बसल्या जागी काम करताना किंवा टीव्हीसमोर बसून हे पदार्थ खाल्ले जातात. पदार्थ खाण्याचे प्रमाण आणि त्यातील कॅलरिज जिरविण्यासाठी आवश्यक व्यायाम, हालचाली यांचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा (ओबेसिटी) असे परिणाम दिसतात. लहान मुलेही याला अपवाद नाहीत. लठ्ठपणा बरोबरच हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, चयापचयाच्या समस्या निर्माण होणे हे प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या अतिरेकी सेवनाचे परिणाम आहेत.

आहारतज्ज्ञांचे म्हणणे काय?

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे हा शहरांत राहणाऱ्यांसमोरील मोठा चिंतेचा विषय आहे. सहज उपलब्ध असणाऱ्या ‘जंकफूड’चे विविध प्रकार कामानिमित्त बाहेर राहणाऱ्यांना तसेच प्रवास करणाऱ्यांना मोहात पाडतात. त्यांना पर्याय शोधण्याचे आवाहन आहारतज्ज्ञ करत आहेत. आहारात घरी केलेले, ताजे पदार्थ, फळे, भाज्या, पालेभाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, कोशिंबिरी यांचा पुरेसा समावेश करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही तयार खाद्यपदार्थावर किंवा सॅलेड, कापलेली फळे यांवर वरून अधिकचे मीठ किंवा साखर घालू नये. जाहिरात करून विकल्या जाणाऱ्या पदार्थावर संपूर्ण बहिष्कार घालणे, हा प्रक्रिया केलेले अन्न टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे, ते सांगतात.