scorecardresearch

विश्लेषण : सारस पक्षी त्याचे अस्तित्व टिकवेल?

वाघाच्या संरक्षणासाठी वन खाते जेवढे सज्ज असते, तेवढे ते अनुसूची एकमधील इतर वन्यप्राणी किंवा पक्ष्याच्या बाबतीत दिसत नाही.

विश्लेषण : सारस पक्षी त्याचे अस्तित्व टिकवेल?

राखी चव्हाण

वाघाच्या संरक्षणासाठी वन खाते जेवढे सज्ज असते, तेवढे ते अनुसूची एकमधील इतर वन्यप्राणी किंवा पक्ष्याच्या बाबतीत दिसत नाही. सारस पक्ष्याचे जवळपास नामशेष होणे हे त्याचेच उदाहरण आहे. महाराष्ट्रात गोंदिया, भंडारा अशा जिल्ह्यांनी आणि तेही स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांमुळे सारसांचे राज्यातील अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मात्र, प्रशासनापुढे तेदेखील हतबल आहेत. वन खात्याला या पक्ष्याविषयी नसलेले गांभीर्य आणि आता न्यायालयाच्या दणक्यानंतर कर्तव्य म्हणून थोडीफार सुरू असलेली हालचाल सारसांचे अस्तित्व टिकवून ठेवू शकेल का, हा प्रश्नच आहे. 

भारतात सारसांची संख्या किती?

भारतीय उपखंड, दक्षिण-पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियात २५ ते ३७ हजारांच्या संख्येत सारस पक्षी आढळतात. भारतीय उपखंडात ते उत्तर आणि मध्य भारत तसेच तेराई नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळतात. भारतात आता त्यांची संख्या १५ ते २० हजारांच्या  घरात असून त्यापैकी बहुतांश उत्तर भारतात आहेत. तर सर्वात कमी- अवघे  ३४ सारस – महाराष्ट्रात आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश आणि आसामच्या भातशेतीत त्यांचा अधिवास होता.

सारस पक्ष्याला धोका कशाचा?

शेतावर फवारण्यात येणारी कीटकनाशके सारसांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरतात. त्यापाठोपाठ उच्चदाब वीजवाहिन्यांसह गावागावात वीजपुरवठा करण्यासाठी उभारलेले विजेच्या तारांचे जाळे त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरले आहे. अवैध शिकारीचा मुद्दा तर आहेच, पण अंडी आणि पिलांच्या बेकायदा व्यापाराचेही सावट आहे. जंगलावर माणसाने अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्यामुळे वन्यजीव आता जंगलाबाहेर येत आहेत. त्याच वेळी सारसांच्या अधिवासावरदेखील वाळू माफियांचे अतिक्रमण झाल्याने त्यांचा अधिवास हिरावला जात आहे.

महाराष्ट्रातील सारसांची धुरा कोणत्या जिल्ह्यांवर?

महाराष्ट्रात चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या तीन जिल्ह्यांत हा पक्षी दिसून येई, पण तो आता दोन जिल्ह्यांपुरताच मर्यादित झाला आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात २००४ साली चार सारस शिल्लक होते. सारस संवर्धक आणि विशेषत: ‘सेवा’ या संस्थेने शेतकरी व गावकऱ्यांचे सहकार्य घेऊन केलेल्या प्रयत्नांमुळे २०२० मध्ये ही संख्या ४२ पर्यंत पोहोचली. आता पुन्हा झपाटय़ाने ते कमी होत असून २०२२ मध्ये केवळ ३४ सारस शिल्लक आहेत. वन खाते आणि जिल्हा प्रशासन अजूनही याबाबत गंभीर नाही. मात्र, महाराष्ट्रातील त्यांच्या अस्तित्त्वाची धुरा ‘सेवा’ या संस्थेने सांभाळली आहे.

सारस पक्ष्याच्या उड्डाणाचे वैशिष्टय़ काय?

जगातील सर्वात उंच उडणारा आणि वजनदार पक्षी म्हणून सारस पक्ष्याची ओळख आहे. गिधाडापेक्षाही तो मोठा असून १५२ ते १५६ सेंटीमीटर त्याची उंची आहे. तर पंखांची लांबी सुमारे २४० सेंटीमीटर आहे. त्याचे वजन सात ते आठ किलोच्या आसपास असते. एवढा वजनदार पक्षी आकाशात उडू शकतो, याचेच अनेकांना आश्चर्य वाटते. मात्र वजन, उंची आणि मोठय़ा पंखांमुळे अनेकदा तो वीजतारांना बळी पडतो. मानेपासून डोके लाल रंगाचे तर शरीर नीळसर राखाडी रंगाचे असलेला हा पक्षी जमिनीवर असताना जेवढा देखणा दिसतो, तेवढाच आकाशात उडतानादेखील दिसतो.

न्यायालयाने याचिका का दाखल करून घेतली?

आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर)च्या यादीत सारस पक्ष्याची संकटग्रस्त म्हणून नोंद आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक तो कृती आराखडा तयार नाही. त्यामुळे वर्षभरापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. यामुळे वन खात्यासोबत जिल्हा प्रशासनालाही न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर या दोन्ही यंत्रणा थोडय़ाफार हलल्या आहेत; पण सारसाच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीबाबत अजूनही गांभीर्य दिसून येत नाही.

राज्याच्या वन खात्याला जाग कधी येणार?

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत सारस संवर्धनासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या. यात जिल्हा प्रशासन आणि वन खात्याचे अधिकारी आहेत; पण सारस संवर्धनात महत्त्वाची भूमिका असणारे शेतकरी, गावकरी यात नाही. त्यामुळे संवर्धन आराखडा परिपूर्ण नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. वाघांच्या संवर्धनासाठी गंभीर असणारे वन खाते सारसाच्या संवर्धनाबाबत मात्र गंभीर नाही.

सारसाच्या वैयक्तिक आयुष्याचे गुपित काय?

सारस पक्षी एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य व्यतीत करतो. विणीच्या हंगामात सारस पक्ष्यांचा मेळावा भरतो. यात ३० ते ४० पेक्षाही अधिक सारस एकत्रित येतात. जोडीदाराच्या शोधासाठी सारस नृत्य करतो आणि जोडीदाराच्या निवडीनंतर ते अत्यंत मोहक प्रणयनृत्य करतात. त्यामुळे या पक्ष्याला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर काही दिवसातच त्याचा जोडीदारही जीव सोडतो. 

सारस पक्ष्याचे घरटे कसे असते?

सारस त्याचे घरटे एखाद्या पाणथळ जागेवर किंवा भरपूर पाणी साचलेल्या शेतात करतो. त्याच्या घरटय़ाचा पसारा साधारणत: दहा फुटांपर्यंत असतो. सभोवतालचे गवत वापरून शेतात किंवा पाणथळ जागी ते घरटे तयार करतात. या पक्ष्याची जोडी वर्षांतून एकदाच आणि तेदेखील पावसाळय़ात घरटी बांधते. शेतातील किंवा पाणथळ जागा सुरक्षित वाटली नाही तर या पक्ष्यांची जोडी घरटे बांधतच नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या