दत्ता जाधव
अर्जेटिनाची राजधानी ब्युएनोस आइरेस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सूर्यफूल बिया आणि तेलविषयक जागतिक परिषदेत खाद्यतेलाचा जगातील प्रमुख ग्राहक म्हणून भारतातील खाद्यतेलाच्या बाजारावर सविस्तर चर्चा झाली. त्यावर दृष्टिक्षेप..
सूर्यफूल खाद्यतेलाची आयात थांबेल?
२०३० पर्यंत खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाच्या दिशेने आजवर कोणतेही दमदार पाऊल पडलेले दिसत नाही. देशात दरवर्षी १५० लाख टन खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी ६५ टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. देशात सूर्यफूल तेलाच्या वापराला प्राधान्य दिले जाते. मात्र, देशात सूर्यफूल तेलाचे उत्पादन खूपच कमी होते. त्यामुळे सूर्यफूल तेलाची आयात दर वर्षी वाढतच आहे. २०२१-२२ (नोव्हेंबर-ऑक्टोबर) या काळात रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात विस्कळीत झाली होती. त्यामुळे भारताने अर्जेटिना, रशियातून दोन दशलक्ष टन सूर्यफूल तेलाची जादा दराने आयात केली. २०१३-१४ मध्ये जागतिक सूर्यफूल तेल उत्पादन १५.५ दशलक्ष टन होते, तर एकूण जागतिक निर्यात ७.८ दशलक्ष टन होती. २०२२-२३ मध्ये जागतिक सूर्यफूल उत्पादन २०.६ दशलक्ष टनांवर गेले असून, निर्यात ११.३ दशलक्ष टनांवर गेली आहे.
देशातील खाद्यतेल बाजाराची उलाढाल?
२०२२- २०२३ या आर्थिक वर्षांत एकूण तेल आयातीत पामतेलाचा वाटा ५८ टक्के, सोयाबीन तेलाचा २५ टक्के, सूर्यफूल तेलाचा १७ टक्के आहे. देशात सरासरी २९ दशलक्ष हेक्टरवर तेलबियांचे उत्पादन घेतले जाते. मोसमी पाऊस आणि हवामान बदलाचा तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम होत असतो. २०२२-२३ मध्ये सुमारे ३० दशलक्ष टन तेलबियांचे उत्पादन झाले होते. त्यात ११ दशलक्ष टन कॉटन सीड (सरकी), ०.५ दशलक्ष टन खोबऱ्याचा समावेश होता. देशातील एकूण खाद्यतेल बाजाराची आर्थिक उलाढाल ३५ अब्ज डॉलरवर (२.७५ लाख कोटी) गेली आहे. या उद्योगात हजारो लोकांना काम मिळाले आहे. तर १५० दशलक्ष एकूण शेतकऱ्यांच्या संख्येपैकी सुमारे १३ टक्के म्हणजे २० दशलक्ष शेतकरी थेट तेलबियांच्या उत्पादनाशी संबंधित आहेत.
देशात खाद्यतेलाची मागणी किती?
मागील वर्षांत (एप्रिल २२ ते फेब्रुवारी २३) देशात ब्रॅण्डेड खाद्यतेलाच्या बाजारात वेगाने वाढ झाली आहे. मोहरीच्या तेलाच्या मागणीत ११ टक्क्यांनी, पामतेलाच्या पाच टक्क्यांनी, सोयाबीन तेलामध्ये सहा टक्क्यांनी, सूर्यफूल तेलात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य तेलाच्या मागणीत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जागतिक तेलबिया उत्पादनाची स्थिती?
२०२१-२२ मध्ये जगात तेलबियांचे उत्पादन ५८०.३ दशलक्ष टन इतके होते. २०२२-२३ मध्ये एकूण जागतिक तेलबियांचे उत्पादन ६०३.५ दशलक्ष टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २०२१-२२ मध्ये भारतातील तेलबियांचे उत्पादन ४०.८२ दशलक्ष टन झाले होते, जे एकूण जागतिक उत्पादनाच्या सात टक्के होते. २०२१-२२ मधील एकूण तेलबिया उत्पादन ५८०.२४ दशलक्ष टन झाले होते.
जागतिक खाद्यतेल उत्पादन किती?
जगात एकूण १७ प्रकारच्या तेलाचे उत्पादन होते. २०२१-२२ मध्ये २४३.८० दशलक्ष टन उत्पादन झाले होते. २०२२-२३ मध्ये २५१.१७ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. देशाचा विचार करता देशात ११.८० दशलक्ष टन एकूण तेल उत्पादन झाले. ते जागतिक तेल उत्पादनाच्या १० टक्के आहे.
जागतिक बायो-डिझेल उत्पादन किती ?
२०२२ मध्ये जगात एकूण ५१.३१ दशलक्ष टन बायो डिझेलचे उत्पादन झाले आहे. २०२१ मध्ये जागतिक बायो डिझेलचे उत्पादन ४८.२८ दशलक्ष टन झाले होते. २०२३ मध्ये एकूण जागतिक बायो डिझेल उत्पादन ५५.८५ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. भारतातील बायो डिझेल निर्मिती किफायतशीर नसल्यामुळे अद्याप तिला व्यावसायिक स्वरूप आलेले नाही.
देशाची भविष्यातील गरज किती?
देशात एका वर्षांला (नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२) सुमारे १५० लाख टन खाद्यतेलाचा उपयोग केला जातो. त्यात ३३.४ टक्के पामतेल, २३.६ टक्के सोयाबीन तेल, मोहरी तेल १५.६ टक्के, सूर्यफूल तेल ८.२ टक्के, सरकी तेल ५.३ टक्के, भुईमूग तेल ४.७ टक्के, अन्य तेलाचा ९.१ टक्के तेलाचा समावेश असतो. देशात २०२१-२२ मध्ये १.५ दशलक्ष सोयाबीन तेलाचे उत्पादन करण्यात आले.
२०२२-२३ या वर्षांत २३.८ दशलक्ष टन तेलाची गरज भासेल, असा अंदाज आहे. २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांत पुढील पाच वर्षांत सूर्यफूल तेलाच्या मागणीत तीन टक्क्यांनी वाढीचा अंदाज आहे. २०२७-२८ पर्यंत २८.० ते २९.० दशलक्ष टनापर्यंत देशाची गरज वाढण्याची शक्यता आहे. देशातील तूप, बटरचा वापरही वापरही वाढत चालला आहे.