चिन्मय पाटणकर

अमेरिका, युरोपसह अन्य देशांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या, इंग्रजी ही मातृभाषा नसलेल्या, उमेदवारांना इंग्रजी भाषक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश, नोकरीमध्ये संधी मिळण्यासाठी इंग्रजी भाषेची चाचणी द्यावी लागते. इंग्रजीची क्षमता तपासण्यासाठी ज्या वेगवेगळय़ा परीक्षा घेतल्या जातात, त्यात ‘टोफेल’चाही समावेश होतो. दरवर्षी देशातील लाखो विद्यार्थी  ही चाचणी देतात. मात्र तिच्या स्वरूपामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते येत्या सत्रापासून, म्हणजे २६ जुलैपासून लागू होणार आहेत. ते समजून घेणे आवश्यक ठरते.

‘टोफेल’ चाचणी काय आहे?

साठच्या दशकात ‘अमेरिकन कौन्सिल ऑन द टेस्टिंग ऑफ इंग्लिश’ या संस्थेमार्फत इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व तपासण्यासाठी घेतली जाणारी चाचणी म्हणजेच ‘टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅज फॉरेन लॅग्वेज’ (टोफेल) या चाचणीमध्ये उमेदवाराचे इंग्रजी लेखन, वाचन, श्रवण आणि बोलणे ही सर्व भाषिक कौशल्ये तपासली जातात. टोफेलप्रमाणेच अन्य काही परीक्षांद्वारे इंग्रजी भाषिक कौशल्ये तपासली जातात. त्यात द इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम (आयईएलटीएस), पिअरसन टेस्ट ऑफ इंग्लिश (पीटीई) अशा काही परीक्षांचा समावेश आहे. दरवर्षी साधारणपणे २० लाखांच्या घरात विद्यार्थी टोफेल ही चाचणी देतात. अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या जगभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने ही चाचणी घेतली जात असली, तरी अन्य अनेक देशांनीही या चाचणीला तेवढेच महत्त्व दिले आहे.

‘टोफेल’ का महत्त्वाची मानली जाते?

अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपातील ९८ टक्के शिक्षणसंस्थांमधील प्रवेशासाठी ‘टोफेल’ ही चाचणी देणे आवश्यक असते. इंग्रजी मातृभाषा नसलेल्या उमेदवारांना इंग्रजी भाषक देशांमध्ये शिक्षण, नोकरीमध्ये सामावून घेताना त्यांची इंग्रजी भाषेची क्षमता तपासण्यासाठी ही चाचणी आधारभूत मानली जाते. १६० देशांमधील दहा हजारांहून अधिक संस्थांमधील प्रवेशासाठी टोफेल ही परीक्षा स्वीकारली जाते. त्यामुळे ती महत्त्वाची ठरते.

परीक्षेत होणारे बदल काय?

‘एज्युकेशनल टेस्टिंग सव्‍‌र्हिसेस’तर्फे ही चाचणी घेण्यात येते. या चाचणीच्या रचनेत येत्या सत्रापासून बदल करण्यात आले आहेत. ‘इंडिपेंडंट रायटिंग’ हा प्रश्न आता ‘रायटिंग फॉर अ‍ॅन अ‍ॅकॅडमिक डिस्कशन’ या स्वरूपात असेल. वाचन आणि आकलनावर आधारित प्रश्न कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता चाचणीचा एकूण कालावधीही कमी होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन तासांची असणारी ही चाचणी आता दोन तासांपेक्षा कमी वेळेची होणार आहे. हे बदल आगामी सत्रापासून म्हणजेच २६ जुलैपासून लागू होतील. विशेष म्हणजे, या पूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाही ३० एप्रिलपर्यंत परीक्षेची तारीख बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत परीक्षेचे अभ्यास साहित्य संकेतस्थळावर मोफत, तसेच सशुल्क उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 नोंदणी प्रक्रियेतील बदल काय?

‘टोफेल’ या चाचणीची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. चाचणी दिल्यानंतर निकालाची तारीख तत्काळ कळू शकणार आहे. तसेच गुणांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती उमेदवाराला वेळोवेळी दिली जाईल. टोफेल चाचणी देणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे मदत कक्ष कार्यान्वित केला जाणार आहे. त्यानुसार आठवडय़ाचे सातही दिवस रोज १२ तास या प्रमाणे हा कक्ष कार्यरत असेल. तसेच आता परीक्षेचे शुल्क रुपयांमध्ये भरता येणार आहे. शिक्षण आणि शिक्षण तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे चाचणी अधिक कालसुसंगत आणि दर्जेदार होईल, असे एज्युकेशनल टेस्टिंग सव्‍‌र्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सेवक यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे बदल फायदेशीर कसे?

चाचणीच्या पॅटर्नमध्ये बदल झालेला नाही. काठिण्यपातळीमध्येही बदल करण्यात आलेला नाही. मात्र अनावश्यक प्रश्नांची संख्या कमी केल्याने चाचणीचा जवळपास एक तासाचा वेळ कमी झाला. त्यामुळे चाचणी अधिक सुटसुटीत आणि सोयीस्कर झाली आहे. गेल्या काही वर्षांत टोफेलच्या तुलनेत ‘द इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट’ ही चाचणी देणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे, असे निरीक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक दिलीप ओक यांनी नोंदवले आहे.