रसिका मुळय़े
विद्यार्थ्यांना आकर्षून घेण्यासाठी शिक्षण संस्थांनी विविध नामाभिधाने रचून पदव्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे होणारे गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पदव्यांवर नियमन आणले. या आयोगाने नेमलेल्या समितीने नुकतीच नव्या पदव्यांचीही शिफारस केली आहे.
पदव्यांमध्ये बदल का?
नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने नव्या पदव्यांची शिफारस करण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमात तीन वर्षांच्या कालावधीसह चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचाही पर्याय देण्यात आला आहे. त्याला स्वतंत्र ओळख देणे आवश्यक होते. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र नामाभिधान सुचवण्यात आले आहे. अभ्यासक्रम कोणत्याही टप्प्यावर सोडण्याची किंवा कोणत्याही टप्प्यावर प्रवेश घेण्याची धोरणात मुभा देण्यात आली आहे (मल्टिपल एन्ट्री – एक्झिट). त्या अनुषंगाने श्रेयांकानुसार अभ्यासक्रमाचे विविध टप्पे निश्चित करणे आणि त्याला विशिष्ट ओळख मिळवून देणे आवश्यक होते. त्यानुसार आता पदवीपर्यंत प्रमाणपत्र, पदविका, पदवी असे टप्पे करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या श्रेयांकानुसार त्यांना प्रमाणपत्र ते पदवी अशी मान्यता मिळणार आहे. राष्ट्रीय विद्यापीठांच्या पदव्यांशी साधम्र्य असलेल्या पदव्यांची शिफारस करण्यात आली आहे. बहुविद्याशाखीय शिक्षणाच्या दृष्टीनेही पदव्यांचा विचार करण्यात आला आहे.
विभागणी मोडीत कशी निघणार?
नव्या शैक्षणिक धोरणात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची तरतूद आहे. तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या बरोबरीने चार वर्षांचा अभ्यासक्रमही सुरू राहणार आहे. त्यासाठी बीएस अशी स्वतंत्र ओळख देण्यात आली आहे. ही नवी बीएस पदवी कोणत्याही विशिष्ट विद्याशाखेशी बांधलेली नाही. कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र, मानव्यविज्ञान, व्यवस्थापन अशा कोणत्याही शाखेतील चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी बीएस ही पदवी देता येईल. याच स्वरूपात पदव्युत्तर पदवीसाठी एमएस ही पदवी देता येईल. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एक किंवा दोन वर्षांचा असेल. एखाद्या विशिष्ट विषयातील पदवीही बीए. बी.कॉम. बी.एस्सी, बीएस या स्वरूपात देता येईल. म्हणजेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या पदवीसाठी बी.व्होक हे नामाभिधान प्रचलित आहे किंवा पशुवैद्यक अभ्यासक्रमाच्या पदवीसाठी बीव्हीएससी हे नामाभिधान आहे. हे चार वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी बीएस हे नामाभिधान वापरता येईल. त्यानुसार बीएस इन व्होकेशनल सायन्स किंवा बीएस इन व्हेटर्नरी सायन्स अशी पदवीही देता येईल. अभ्यासक्रम तीन वर्षांचा असल्यास बीए. बी.कॉम. बीएस्सी यांपैकी पदवीही देता येईल. उदाहरणार्थ, सांख्यिकी विषयातील तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी बीस्टॅट हे नामाभिधान प्रचलित आहे. त्याचबरोबर आता बीए किंवा बीएससी इन स्टॅटिस्टिक्स अशी पदवी देता येईल.
नव्या पदव्या कोणत्या?
जुन्या स्वरूपातील बीए, बी.कॉम. बीएस्सी ही नामाभिधानेही चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी कायम राहतील. मात्र, चार वर्षांचा अभ्यासक्रम हा ऑनर्स म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे मूळ पदवी नामाभिधानाच्या पुढे कंसात ऑनर्स असा उल्लेख करावा लागेल. म्हणजेच चार वर्षांच्या बीए अभ्यासक्रमाची पदवी बीए (ऑनर्स) अशी असेल. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये एक वर्ष संशोधनाची मुभा आहे. संशोधनासहित पदवी घेतल्यास मूळ नामाभिधानापुढे कंसात ऑनर्स विथ रिसर्च असा उल्लेख असेल. म्हणजेच बी.कॉम.चा अभ्यासक्रम संशोधनासहित पूर्ण केल्यास त्याचा बी.कॉम. (ऑनर्स विथ रिसर्च) अशी पदवी दिली जाईल. नव्या धोरणात बहुविद्याशाखीय शिक्षणाचे धोरण अवलंबण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता घेऊन संस्था अभ्यासक्रम सुरू करू शकतील आणि अनुषंगाने नामाभिधानेही सुचवू शकतील. त्यामुळे या नामाभिधानांमध्ये येत्या काळात आणखी भर पडू शकेल. जुनी सर्व नामाभिधाने कायम राहणार आहेत. मात्र, एमफिल हा संशोधनाधारित अभ्यासक्रम आणि त्याची पदवी रद्द करण्यात आली आहे.
परिणाम काय होणार?
सध्या जवळपास १३० नामाभिधानांना मान्यता आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. सध्या प्रत्येक विद्याशाखेनुसार पदवी दिली जाते. पदवीचे नामाभिधान विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, विषय सूचित करते. म्हणजेच बीएस्सी ही पदवी विद्यार्थ्यांचे विज्ञान शाखेतील पदवी स्तरापर्यंतचे शिक्षण झाले आहे हे सूचित करते. मात्र आता एकाला एक समांतर पदव्या दिल्या जाणार आहेत. म्हणजे कला शाखेतील पदवी असेल तर तीन वर्षांचा बीए अभ्यासक्रम, बीए ऑनर्स, बीए ऑनर्स विथ रिसर्च, बीएस अशा पदव्या असतील. त्यातील ती वर्षांची पदवी १२० श्रेयांकाची आणि चार वर्षांची १६० श्रेयांकाची असेल. एकाच अभ्यासक्रमासाठी विविध पदव्यांमुळे संभ्रम निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.