Sansad Ratna Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ फेब्रुवारी रोजी एक ट्विट करत ‘संसद रत्न २०२३’ पुरस्कार मिळालेल्या आपल्या संसदेतील सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पुरस्कार प्राप्त खासदार आपल्या कामकाजातून ते संसदीय परंपरा आणखी समृद्ध करतील, असा संदेश मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये दिला आहे. महाराष्ट्रातील चार खासदारांनी यंदाच्या या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. यापैती दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि दोन भाजपचे आमदार आहेत. संसद रत्न पुरस्काराची घोषणा कधी झाली?

संसद रत्न पुरस्काराची घोषणा कधी झाली?

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रेरित होऊन २०१० साली या पुरस्काराची घोषणा झाली होती. त्यांच्याहस्तेच पहिल्या संसदरत्न पुरस्काराचे वितरण चेन्नई येथे करण्यात आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ९० खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यंदा १३ खासदारांना संसदरत्न पुरस्काराने गौरविले जात असून या पुरस्काराची ही १३ आवृत्ती आहे.

यावर्षी संसदरत्न पुरस्कार मिळवणारे खासदार कोण?

पुरस्कार समितीने संसदरत्न पुरस्कारासाठी १३ खासदारांची निवड केली असून यावर्षी पहिल्यांदाच जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त खासदारांमध्ये लोकसभेचे ८ आणि राज्यसभेच्या ५ सदस्यांचा समावेश आहे. यातील ३ सदस्य हे निवृत्त झाले आहेत. यापैकी लोकसभेतून विदयुत बरन महतो (भाजप, झारखंड), डॉ. सुकांत मजुमदार (भाजपा, पश्चिम बंगाल), कुलदीप राय शर्मा (काँग्रेस, अंदमान निकोबार बेट), डॉ. हीना विजय कुमार गावीत आणि गोपाळ शेट्टी (भाजप, महाराष्ट्र), सुधीर गुप्ता (भाजपा, मध्य प्रदेश), अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

तर राज्यसभेतून जॉन ब्रिटास (सीपीआय-एम, केरळ), मनोज कुमार झा (आरजेडी, बिहार) आणि फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र), विशंभर प्रसाद निषाद (सपा, युपी) आणि छाया वर्मा (काँग्रेस, छत्तीसगढ) यांना संसदरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. विशंभर निषाद आणि छाया वर्मा हे दोन खासदार निवृत्त झाले आहेत.

तसेच आणखी एक निवृत्त खासदार टी. के. रंगराजन (राज्यसेभेचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ सीपीआय-एम नेते) यांना ‘संसद आणि भारतीय नागरिक’ यांच्यासाठी गेल्या काही वर्षात दिलेल्या योगदानाबद्दल “डॉ. एपीजे अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार”ने सन्मानित केले जाणार आहे.

विजेते कोण आणि कसे निवडतात?

संसद रत्न पुरस्काराच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, पुरस्कार देणाऱ्या समितीमध्ये संसदेतील अनुभवी सदस्य आणि सदस्य नसलेल्यांपैकी तज्ज्ञ लोकांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे या समितीचे अध्यक्ष असून माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती सह अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन २०२२ संपेपर्यंतचा काळ सदस्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडण्यात आलेला आहे. संसदेतील खासगी विधेयक, चर्चेतील सहभाग आदींमध्ये खासदारांचा सहभाग किती होता, या बाबी यामध्ये तपासल्या गेल्या आहेत. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने प्रदान केलेल्या माहितीवरुन सदस्यांच्या कामगिरीचा डेटा काढला जातो.

संसद रत्न पुरस्कार कुणाकडून दिला जातो?

संसद रत्न पुरस्कार भारत सरकारकडून दिला जात नाही. पुरस्कार देणाऱ्या समितीमध्ये सरकारमधील सदस्यांचा सहभाग असला तरी पुरस्कार प्राइम पॉईंट या संस्थेकडून दिले जातात. १९९९ मध्ये प्राइम पॉईंट फाऊंडेश या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संवाद जागरूकता वाढविण्यासाठी या फाऊंडेशनची सुरुवात करण्यात आली होती. तसेच आयआयटी मद्रासच्या माध्यमातून हे पुरस्कार सुरु करण्यात आले होते.