Silver Price Increase Reasons सोन्यापेक्षा यंदा चांदीच्या दरांत झालेल्या वाढीने सर्वांना अचंबित केले आहे. या सणासुदीच्या काळात सोन्याबरोबर चांदीचा दरही गगनाला भिडला आहे. जगातील चांदीचा सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या भारतात लाखो गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीमुळे चांदी जागतिक दरांपेक्षा खूप जास्त किमतीत विकली जात आहे. हा दर जागतिक किमतींच्या तुलनेत तब्बल १० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मुख्य म्हणजे दिवाळीच्या आधी चांदीच्या खरेदीत मोठी वाढ होते. त्यामुळे चांदीच्या दरांत आणखी मोठी उसळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चांदीच्या किमती वाढण्याची कारणे काय? तज्ज्ञांनी याविषयी काय सांगितले? जाणून घेऊयात…
दरवाढीची कारणं काय?
- गेली चार वर्षे चांदीची जागतिक मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे मागील पाच वर्षांत उत्पादित झालेला अतिरिक्त साठा वापरला गेला आहे.
- २०२५ मध्येदेखील पुरवठा मागणीनुसार ठेवणे कठीण होत आहे. कारण- सुमारे ७० टक्के चांदी इतर धातूंच्या खाणकामातून मिळते.
- पुरवठ्याची चणचण असताना चांदीची औद्योगिक मागणी, विशेषतः अक्षय ऊर्जा आणि उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांकडून चांदीची मागणी वाढतच आहे.
- पुरवठा आणि मागणीतील या तफावतीमुळे चांदीची किंमत लक्षणीयरीत्या वाढत आहे आणि गुंतवणूकदारही चांदीकडे वळत आहेत.
- सप्टेंबरमध्ये चांदीचा समावेश अमेरिकेच्या ‘महत्त्वाच्या खनिजां’च्या (Critical minerals) मसुदा सूचीमध्ये झाला.
- अमेरिकेकडे चांदीची आयात मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारावर अधिक ताण निर्माण झाला आहे.

या चांदीच्या टंचाईचा भारताला एवढा मोठा फटका का?
चांदीचा जगातील सर्वांत मोठा ग्राहक असलेला भारतात चांदीचा वापर चांदीची भांडी, दागिने, नाणी, बार्स (विटा) आणि सौरऊर्जा ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या औद्योगिक ॲप्लिकेशन्समध्ये केला जातो. चांदीची ८० टक्क्यांपेक्षा जास्त मागणी पूर्ण करण्यासाठी भारत आयातीवर अवलंबून आहे. २०२५ च्या पहिल्या आठ महिन्यांत चांदीची आयात ४२ टक्क्यांनी कमी होऊन ३,३०२ टन झाली; तर गुंतवणूक मागणी, विशेषतः ETFs मधून विक्रमी पातळीवर पोहोचली. या वाढीमुळे २०२४ मध्ये आयात झालेल्या अतिरिक्त साठ्याचाही वापर झाला. आता चांदीची ही टंचाई पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त परदेशी मालवाहतुकीची गरज निर्माण झाली आहे.
भारतीय ईटीएफने नवीन सदस्यत्व का थांबवले?
ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) हा म्युचुअल फंडाच्या इंडेक्स फंडासारखाच फंड असतो. मात्र, हा स्टॉक एक्स्चेंज लिस्ट असल्याने शेअरप्रमाणे विकत घेता येतो आणि याच्या युनिटची बाजारातील किंमत अंडर लायिंग असेटच्या (मूलभूत मालमत्ता) किमतीनुसार कमी-अधिक होत असते.
सप्टेंबरमध्ये चांदीच्या ईटीएफमध्ये ५३.४२ अब्ज रुपयांचा विक्रमी ओघ आला. हा ट्रेंड ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही कायम राहिला. नियमांनुसार, ईटीएफद्वारे घेतलेली चांदी भौतिक स्वरूपात ठेवावी लागते, जी सामान्यतः बँका आणि सराफांकडून खरेदी केली जाते.
परंतु, जेव्हा त्यांनी गेल्या आठवड्यात चांदी घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना जास्त प्रीमियम भरावा लागला. या प्रीमियममुळे नवीन सदस्यांसाठी खरेदीचा खर्च वाढला आहे. गुंतवणूकदारांना वाढीव किमती भरावे लागू नयेत म्हणून ईटीएफने तात्पुरत्या स्वरूपात नवीन सदस्यत्व घेणे थांबवले आहे. या टंचाईमुळे उत्पादकांसाठी चांदीची भांडी तयार करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. नाणी आणि बार्स (विटा) सणासुदीतील लोकप्रिय भेटवस्तू आहेत, ज्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुंतवणूकदारांना आणखी भाव वाढण्याची अपेक्षा असल्याने, फार कमी लोक आपले जुने साठे विकण्यास तयार आहेत, ज्यामुळे स्क्रॅप (जुनी चांदी)चा पुरवठा कमी आहे.
चांदीच्या दरवाढीविषयी तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आज चांदीचे महत्त्व केवळ दागिने किंवा गुंतवणुकीपुरते मर्यादित नाही. सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हार्डवेअर आणि 5जी पायाभूत सुविधांसह अनेक आधुनिक तंत्रज्ञानामध्ये हा धातू एक महत्त्वाचा घटक आहे. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या सहायक उपाध्यक्ष वंदना भारती म्हणाल्या, “या तेजीचा पाया गेल्या चार ते पाच वर्षांत रचला गेला. चांदीची मागणी वाढत आहे; तर पुरवठा मात्र कमी आहे. सोन्याच्या तुलनेत रिसायकलिंगचे प्रमाण कमी आहे आणि नवीन चांदीच्या खाणी सुरू होण्यासाठी सात ते आठ वर्षे लागतात. यावेळी एआय हार्डवेअर, सौरऊर्जाक्षेत्राकडून केली जाणारी मागणी खूप वाढली आहे आणि या क्षेत्रांमध्ये चांदीशिवाय कोणताही पर्याय नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, या वाढत्या मागणीमुळे जागतिक स्तरावर चांदीच्या ETF खरेदीतही वाढ झाली आहे. “अमेरिकेपासून युरोप आणि चीनपर्यंत सर्वत्र भौतिक चांदीचा पुरवठा कमी आहे. किंबहुना, भौतिक चांदी आता वायदे बाजारातील चांदीपेक्षा तीन डॉलर्स जास्त प्रीमियमवर विकली जात आहे, जे असामान्य आहे. ही बाब हे दर्शवते की, बाजारपेठेत किती तणाव आहे.” जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याबरोबरच चांदीचीही खरेदी सुरू केली आहे.
“अनेक मध्यवर्ती बँका आपले चांदीचे साठे वाढवत आहेत.” तज्ज्ञ सध्याच्या काळात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. चांदीच्या बाजारपेठेत सध्या अत्यंत ताण आणि अस्थिरता आहे, ज्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी यात उडी घेणे धोकादायक आहे. “गुंतवणूकदारांनी चांदीचे ईटीएफ किंवा भौतिक चांदी खरेदी करण्यापूर्वी परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहावी. पुढील दोन ते तीन महिन्यांत किमती स्थिर होऊ शकतात,” असे भारती यांनी सांगितले.