‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर हा पक्षी स्थानिक पातळीवर ‘गवताळ मोर’ म्हणून ओळखला जातो. या पक्ष्याच्या अधिवासावर गदा आल्यामुळे ते वेगाने नामशेषाच्या दिशेने वळत आहेत. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांचा इशारा काय ?
‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर या पक्ष्यासंदर्भात डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. जगभरात केवळ १५० ते २०० पर्यंत या दुर्मिळ पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे. जुलै ते ऑक्टोबर हा काळ तणमोर पक्ष्यांचा विणीचा काळ असून त्यातही ऑगस्ट हा सर्वाधिक प्रजननाचा हंगाम मानला जातो. मात्र, या हंगामात गुजरात आणि राजस्थानमध्ये फक्त १९ नर तणमोर आढळले आहेत. यातूनच ‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर हा पक्षी नामशेषाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत असल्याचा इशारा डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
‘लेसर फ्लोरिकन’ झपाट्याने नामशेष का होत आहेत?
डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या ३६व्या वार्षिक संशोधन चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी संशोधक मोहिब उद्दीन यांनी ‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर या पक्षासंदर्भात निष्कर्ष जाहीर केले. गेल्या दहा वर्षांपासून ते या प्रजातीचा सखोल अभ्यास करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान त्यांची संख्या झपाट्याने कमी झालेली आढळून आली. साधारपणपणे पक्ष्यांची संख्या मोजताना ग्रिड पाडण्यात येतात. या पक्ष्याची गणना करताना सहा ग्रिड पाडण्यात आले आणि या सहा ग्रिडमध्ये केवळ १९ पक्षी दिसले. अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातीसाठी ही खूप कमी संख्या आहे. लेसर फ्लोरिकन (सिफिओटाइड्स इंडिकस) पावसाळ्यात त्याच्या उडी मारणाऱ्या प्रेमसंबंधांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु शेती, खाणकाम आणि अतिचराईमुळे त्याचे पारंपारिक अधिवास नष्ट होत आहेत. एकेकाळी भारतातील अर्ध-शुष्क गवताळ प्रदेशात आढळणारा हा पक्षी आता जगण्यासाठी संघर्ष करत आहे.
गेल्या काही वर्षांत लोकसंख्या कशी बदलली आहे?‘
लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर या पक्ष्याच्या संख्येत तीव्र घट होत आहे. मागील साडेतीन दशकात या पक्ष्यांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिकने घटली. १९८२ मध्ये ४,३७४ पक्षी होते, ते २०१८ मध्ये सुमारे ८०० पर्यंत शिल्लक राहीले. मागील सर्वेक्षणांमध्ये १९८९ मध्ये १,६७२ पक्षी, १९९४ मध्ये २,२०६ आणि १९९९ मध्ये ३,५३० पक्ष्यांची नोंद झाली होती मात्र,२००६ मध्ये ती २,२०० पर्यंत घसरली. आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) या निसर्ग संवर्धनासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने १९९४ मध्येच या पक्ष्याला ‘क्रिटीकली एन्डेजर्ड’ म्हणजेच गंभीर संकटात असलेल्या गटात सूचीबद्ध केले. थोड्याशा सुधारणेनंतर २०२१ मध्ये पुन्हा त्याच गटात त्याला सूचीबद्ध करण्यात आले. या पक्ष्यांचे घरटे जगण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि यांत्रिक शेतीमुळे त्याच्या जगण्याचा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. दर हंगामात फक्त २७ घरटेच टिकतात. वीज तारा, भटके कुत्रे आणि शेतीचे कुंपण यामुळे धोक्यांची यादी वाढत आहे.
प्रजनन हंगामानंतर पक्षी कुठे जातात?
या पक्ष्याच्या टेलिमेट्री अभ्यासातून त्यांच्या हालचालींची तपशिलवार माहिती समोर आली. नऊ नर आणि तीन मादी ‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर या १२ टॅगिंग करण्यात आलेल्या पक्ष्यांचा टेलिमेट्री अभ्यास करण्यात आला. ऑक्टोबरच्या मध्यान्हात ते अजमेर ते दख्खनपर्यंत सुमारे १५०० किलोमीटरचा प्रवास करतात. हिवाळ्यात ते महाराष्ट्र, कनार्टक आणि तेलंगणा राज्यात निवासी असतात. तर स्थलांतरणादरम्यान ते मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून जातात. हा पक्षी फक्त रात्री आणि दररोज सुमारे २० ते २७ किलोमीटरपर्यंत प्रवास करतो. बऱ्याचवेळा एका रात्रीत ते २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापतात. ‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर पक्ष्यांमध्ये प्रौढांचे जगण्याचे प्रमाण कमी म्हणजेच ५३ टक्के आहे. मादी पक्ष्यांचे निरीक्षण करणे विशेषतः कठीण आहे, कारण ते लाजाळू असतात आणि कोरड्या गवतात मिसळतात. ज्युलिफ्लोरा (विलायती शमी) वनस्पतींच्या प्रसारामुळे प्रजातींना गवताळ प्रदेशातून शेतजमिनीकडे स्थलांतर करण्यास भाग पाडले आहे, जिथे धोके जास्त आहेत.
संवर्धन प्रयत्नांमुळे नामशेषाची वाट रोखता येईल का?
‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर हा पक्षी नामशेषाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याने सारेच चिंतेत आहेत. मात्र, राजस्थानमधील अजमेरमधील या पक्ष्याच्या एका संवर्धन प्रजनन केंद्रात आशेचा किरण आहे. या सुविधेत दहा पक्षी, सहा मादी आणि चार नर पक्षी आहेत. त्यात उष्मायन कक्ष आणि पिल्ले संगोपन क्षेत्रे समाविष्ट आहेत. या पक्ष्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने घरट्यांजवळ राहणाऱ्या तीन हजाराहून अधिक विद्यार्थी आणि सुमारे अडीच हजार गावकऱ्यांशी संपर्क साधला आहे. स्थानिक गवताळ प्रदेश पुनर्संचयित करण्याची आणि घरट्यांचे रक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे. गवताळ प्रदेश पुनर्संचयित करणे कठीण नाही. अंडी उबविण्यासाठी जंगलातून अंडी गोळा करणे, भक्षकांचे व्यवस्थापन करणे आणि प्रजनन स्थळांचे संरक्षण करणे देखील लोकसंख्या पुन्हा निर्माण करण्यास मदत करू शकते.
rakhi.chavhan@expressindia.com
