Worlds First Plastic Road in Delhi : काही राज्यांमध्ये ‘प्लास्टिक बंदी’ असली तरी सध्या अस्तित्वात असलेल्या प्लास्टिकचे काय करायचे, असा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र, कचऱ्यात टाकलेल्या, वाया गेलेल्या किंवा जप्त केलेल्या प्लास्टिकचा वापर आता रस्ते बांधणीसाठी केला जात आहे. राजधानी दिल्लीत प्लास्टिकचा रस्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसं पाहता, आजवर अनेक रस्त्यांमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे; पण दिल्लीत तयार केला जाणारा हा रस्ता पूर्णत: प्लास्टिकचा असेल असं सांगितलं जात आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिओसेल’ (Geocell) तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प राबवला जात आहे. या तंत्रज्ञानाची सखोल चाचणी झाल्यानंतर पेटंटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. दरम्यान, जिओसेल तंत्रज्ञान म्हणजे काय? दिल्लीतील रस्ता नेमका कसा असणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
राजधानी दिल्लीमध्ये तयार केला जाणारा हा रस्ता जगातील पहिलाच प्लास्टिकचा रस्ता ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात सहभागी असलेले भारत पेट्रोलियम व सीआरआरआयचे अधिकारी याला एक मोठी उपलब्धी मानत आहेत. सध्या प्लास्टिक ही संपूर्ण जगाची गंभीर समस्या झाली आहे. अनेक ठिकाणी त्यावर बंदी असूनही सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचं दिसून येत आहे, ज्यामुळे शहराभोवती प्लास्टिकचे मोठमोठे पहाड उभे राहत आहेत. समुद्रात फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर टाकाऊ प्लास्टिकचा वापर रस्ते बांधकामात करण्यात आला तर प्रदूषणापासून मुक्तता मिळेल आणि देशाच्या विकासातही हातभार लागेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. प्लास्टिकच्या रस्त्याचे हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर भारत हा संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जिओसेल तंत्रज्ञान म्हणजे काय?
- दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवरील सराई काळे खान चौकाजवळ १६० मीटर लांबीचा प्लास्टिकचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
- दिल्लीत नवीन रस्ता तयार करण्यासाठी जिओसेल या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
- या तंत्रज्ञानामध्ये नऊ इंच लांब, नऊ इंच रुंद आणि नऊ इंच उंच अशा बॉक्ससारख्या कप्प्यांची रचना केली जाते.
- या बॉक्सची जाळी रस्त्यावर व्यवस्थित टाकली जाणे आणि त्यात डांबर, खडी आणि इतर साहित्य भरलं जातं.
- सुमारे १०० मीटर रस्ता तयार करण्यासाठी जवळपास ३० टन प्लास्टिकचा वापर केला जातो.
- हे तंत्रज्ञान केवळ पर्यावरणपूरक नाही, तर टिकाऊ आणि खर्चिकदृष्ट्या देखील फायदेशीर ठरतं.
- जिओसेल तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले रस्ते अधिक काळ टिकतात तसेच त्यावर खड्डेही पडत नाहीत.
- रस्ता तयार करीत असताना प्लास्टिकचा वापर केल्याने पावसाळ्यात माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
आणखी वाचा : ‘नॉन-व्हेज दूध’ म्हणजे काय? भारत-अमेरिका व्यापार करारात त्यावरून वाद कशासाठी?
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अधिकारी काय म्हणाले?
दरम्यान, यासंदर्भात माहिती देताना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. रवि कुमार व्ही. सांगतात की, जिओसेल तंत्रज्ञानात टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून बॉक्ससारखे कप्पे तयार केले जातात आणि त्याचा वापर रस्ते बांधणीसाठी केला जातो. या तंत्रज्ञानामुळे रस्ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात तब्बल २५ टक्के बचत होऊ शकते. भारत पेट्रोलियमचे मुख्य व्यवस्थापक डॉ. महेश सांगतात की, प्लास्टिकचा वापर केल्यानंतर अनेकजण त्याला कचऱ्यात फेकून देतात. हे प्लास्टिक वर्षानुवर्षे तसेच टिकून राहते आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन प्रदूषण वाढते. मात्र, प्लास्टिकचा योग्य वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यातही मदत होऊ शकते. जिओसेल तंत्रज्ञानामुळे टाकाऊ प्लास्टिक आता उपयोगात आणले जाईल आणि त्याचे तयार झालेले मोठमोठे ढीग कमी होण्यात मदत होईल.

प्लास्टिकपासून होणार कायमची मुक्तता?
या प्रकल्पावर काम करणारे सीआरआरआयचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. गगनदीप म्हणाले की, जिओसेल तंत्रज्ञानाचा हा प्रयोग देशातला पहिलाच मानला जात आहे. त्यामुळे रस्त्याचे आयुष्य वाढेल आणि ते लवकर खराब होणार नाहीत. त्याशिवाय प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही नियंत्रण ठेवता येईल. या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी वाढतील व रस्ते अधिक मजबूत तयार होतील. टाकाऊ प्लास्टिकचा वापर केल्यामुळे त्यापासून तयार झालेले मोठमोठी ढीग आरोआप कमी होतील आणि काही वर्षांनंतर देशातील प्लास्टिकची समस्या कायमची संपुष्टात येईल. दरम्यान, केंद्र सरकारने या तंत्रज्ञानाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.
हेही वाचा : ‘मॅरेथॉन’ काय हेच माहीत नव्हतं, पण जगातले सर्व विक्रम मोडले; फौजा सिंग यांना कशी मिळाली ओळख?
प्लास्टिकचा वापर करून डांबरी रस्ते कसे तयार केले जातात?
२०२१ पर्यंत देशातील रस्त्याच्या पृष्ठभागावर प्लास्टिक कचरा वापरून ७०३ किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. त्यानंतर रस्ते बांधतांना किती प्लास्टिक वापरले गेले याची सविस्तर आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, महाराष्ट्रातील बरेच रस्ते तयार करताना प्लास्टिकचा वापर करण्यात आला, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रस्त्याचे डांबरीकरण करताना डांबरात विशिष्ट प्रमाणानुसार टाकाऊ प्लास्टिक मिसळले जाते. त्यानंतर ते डांबर डांबरीकरणासाठी वापरले जाते. डांबर व प्लास्टिक एकत्र होते तर खडी-डांबर हे एकमेकांना घट्ट चिटकून राहिल्याने रस्ता टिकण्याची क्षमता वाढते. टाकाऊ प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे इतर साहित्य या रस्त्यात वापरले जाणार असून हे प्लास्टिक डांबरात मिश्रित केल्याने ते डोळ्याला दिसून येत नाही.
गडकरींच्या जिल्ह्यात कचरा, प्लास्टिकपासून रस्त्याचे बांधकाम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात कचरा- प्लास्टिकपासून रस्ता निर्मिती केली गेली. कळमेश्वर तालुक्यातील सेलू-कळम येथील प्रकल्पात बिटुमिन मॅकडम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन अंतर्गत या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. त्याची जबाबदारी उपविभागीय अभियंता रूपेश बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आली असून रस्ता निर्मितीसाठी कंत्राटदार आनंद अशोक बुधराजा यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी व उपविभागीय अभियंता रूपेश बोदडे यांनी बिटुमिन बांधकामासंदर्भात प्रत्यक्ष रस्ता बांधकामाचे प्रात्यक्षिक यावेळी सादर केले.