scorecardresearch

विश्लेषण : लंपी व्हायरस काय आहे? गुजरात आणि राजस्थानमध्ये या आजारामुळे गुरांचा मृत्यू का होत आहे?

गेल्या काही आठवड्यांमध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये सुमारे ३,००० गुरे या आजारामुळे मरण पावली आहेत.

Lumpy Skin Disease

भारतात कोरोना विषाणू आणि मंकीपॉक्सनंतर आणखी एका रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. हा आजार मुख्य: प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ‘लंपी स्किन डिसीज’ असे या आजाराचे नाव असून त्वचेशी संबंधित असणाऱ्या या रोगामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू झाला आहे. या आजाराची नेमकी लक्षणे कोणती? आणि प्राण्यामध्येच हा आजार मोठ्या प्रमाणात का परसत आहे? जाणून घेऊया.

या रोगाचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हा आजार एका विषाणूमुळे गुरांमध्ये परसतो. ज्याला ‘लंपी स्किन डिसीज व्हायरस’ (LSDV) म्हणतात. त्याच्या तीन प्रजाती आहेत. ज्यामध्ये पहिली प्रजाती ‘कॅप्रीपोक्सव्हायरस’ आहे. त्यानंतर गोटपॉक्स व्हायरस आणि मेंढीपॉक्स व्हायरस अशा आणखी दोन प्रजाती आहेत.

या रोगाची लक्षणे कोणती?

या आजाराची अनेक लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये ताप, वजन कमी होणे, लाळ वाहणे, डोळे व नाकातून पाणी येणे, कमी दूध येणे, शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी दिसतात. यासोबतच या आजारात शरीरात गाठीही तयार होतात. सोबतच यामुळे मादी गुरांना वंध्यत्व, गर्भपात, न्यूमोनिया, पांगळेपणाचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही दिसून आले आहे.

हेही वाचा- विश्लेषण : तैवानजवळ चीनचा युद्धसराव की युद्धभडका?

गुजरामध्ये ९९९ गुरांचा मृत्यू

गुजरातमध्ये आत्तापर्यंत सुमारे ९९९ गुरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक गाई-म्हशी आहेत. राज्याचे कृषी व पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी ही माहिती दिली. हा रोग हा डास, माश्या, उवा आणि कुंड्यांमुळे पसरणारा रोग आहे. यासोबतच या रोगाची लागण झालेल्या गुराचा दुसऱ्या गुरांशी थेट संपर्क आला तर इतर गुरांनाही या रोगाची लागण होते. दूषित अन्न व पाण्यामुळेही या रोगाचा प्रसार होतो.

राजस्थानमध्ये ३ हजार पशूंचा मृत्यू

राजस्थानातील ११ जिल्ह्यांमध्ये त्वचेच्या आजाराने थैमान घातले आहे. राज्यातील प्राणी या संसर्गाला बळी पडत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत ५० हजारांहून अधिक प्राणी संसर्गाचे बळी ठरले आहेत. त्याचबरोबर या आजारामुळे तीन हजारांहून अधिक गाई-म्हशींचा मृत्यू झाला आहे. तथापि, हा आकडा पूर्णपणे अचूक नाही. राज्यातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सर्वेक्षणात मृत जनावरांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार राज्यात २७२७ नोंदणीकृत गोशाळा आहेत. याशिवाय राज्यात अनेक नोंदणी नसलेल्या डेअरी सुरू आहेत. खेड्यापाड्यात आणि शहरात राहणारे लाखो लोकही गाई-म्हशी आपल्या घरात पाळतात.

हेही वाचा- विश्लेषण : गुजरात-मराठी भाषिक वाद, कॉस्मोपॉलिटन मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ; जाणून घ्या सर्वकाही

या रोगावर उपाय काय?

हा एक प्रकारचा विषाणू आहे ज्यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. डास आणि माश्या यांसारख्या रक्त शोषणार्‍या कीटकांमुळे हा आजार पसरतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दूषित पाणी आणि चाऱ्यामुळे हा संसर्ग जनावरांना होतो. कोणत्याही प्राण्यामध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला इतर गाई व म्हशींपासून वेगळे करावे. त्यांचे पाणी किंवा चारा इतर कोणत्याही प्राण्याला देऊ नका. तसेच ज्या ठिकाणी लागण झालेला प्राणी ठेवला आहे त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is lumpy skin disease why are cattle dying due to this disease in gujarat and rajasthan dpj

ताज्या बातम्या