-अभय नरहर जोशी

इस्रायल आणि ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ या दहशतवादी गटात नव्याने संघर्षास तोंड फुटले आहे. पॅलेस्टाईनमधील सत्ताधारी हमास संघटना मात्र यामध्ये सहभागी नसून, युद्धविरामाचे पालन करत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात गेल्या वर्षी अकरा दिवसांचे यद्ध झाले होते. त्यानंतर यंदा नुकतेच पुन्हा गाझा पट्टीत इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गटांत भीषण हिंसाचारास तोंड फुटले. इस्रायली हवाई हल्ल्यात इराणचा पाठिंबा लाभलेला दहशतवादी गट ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’च्या वरिष्ठ कमांडरसह ११ जण ठार झाले. या कमांडरला इस्रायलचे लक्ष्य केले होते. प्रत्युत्तरादाखल पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या शहरांवर डझनभर रॉकेट डागली. त्यामुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. हजारो इस्रायली नागरिकांना त्याची झळ पोहोचली. या पार्श्वभूमीवर या नव्या संघर्षाचे पैलू समजून घेणे आवश्यक आहे…

Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
what is isis khorasan
विश्लेषण : रशियातील हल्ल्याची जबाबदारी घेणारी ‘इस्लामिक स्टेट खोरासन’ संघटना नेमकी आहे तरी काय?
Narendra Modi On Terrorist attack in Russia Moscow
रशियातील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला निषेध, म्हणाले, “भारत रशियासोबत…”

सध्या ‘इस्लामिक जिहाद’ प्रभावी कसा?

‘हमास’कडे सत्तासूत्रे असताना भडकलेल्या पॅलेस्टाईन-इस्रायलमधील नव्या हिंसाचाराकडे नजर टाकली असता, या संघर्षात इस्रायलशी दोन हात करणारा ‘इस्लामिक जिहाद’ हा गट गाझा पट्टीतील दोन मुख्य पॅलेस्टिनी दहशतवादी गटांपैकी तुलनेने लहान आहे. पॅलेस्टाईनमधील सत्ताधारी ‘हमास’ संघटनेचा प्रभाव त्याच्यापेक्षा खूपच जास्त आहे. परंतु ‘इस्लामिक जिहाद’ला इराणकडून थेट आर्थिक आणि लष्करी सहाय्य मिळते. त्यामुळे इस्रायलशी दोन हात करण्यात हा गट आघाडीवर आहे. इस्रायलवर सातत्याने रॉकेट हल्ले करून इस्रायल विरोधकांसाठी हा गट एक प्रेरक शक्ती बनला आहे.

‘इस्लामिक जिहाद’चा उदय कधी व कसा झाला?

२००७ मध्ये तत्कालीन आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त पॅलेस्टिनी सरकारकडून, ‘हमास’ने गाझाचा ताबा मिळवला. परंतु पॅलेस्टाईनसारख्या गरीब देशाचे दैनंदिन प्रशासन चालवण्याची जबाबदारी ‘हमास’कडे आल्याने इस्रायलशी सातत्याने दोन हात करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर मर्यादा आली आहे. मात्र, अशा कुठल्याही प्रशासकीय अथवा इतर जबाबदाऱ्यांत ‘इस्लामिक जिहाद’ अडकलेले नाही. त्यामुळे ‘हमास’पेक्षा अधिक जहाल आणि लढाऊ गट म्हणून ते उदयास आले. काही वेळा तर ‘हमास’ला न जुमानता हा गट परस्पर कृती करतो. पश्चिम किनारपट्टी, गाझा आणि आता इस्रायलमध्ये इस्लामिक पॅलेस्टिनी राज्य स्थापण्याच्या उद्देशाने १९८१ मध्ये ‘इस्लामिक जिहाद’ गट स्थापण्यात आला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयासह युरोपियन महासंघ आणि इतर काही देशांनी या गटाला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. ‘इस्लामिक जिहाद’नेही ‘हमास’प्रमाणेच इस्रायलला नष्ट करण्याचा संकल्प केला आहे.

इराणशी नेमके कुठल्या प्रकारचे संबंध?

इस्रायलचा कट्टर शत्रू असलेला इराण ‘इस्लामिक जिहाद’ला तज्ज्ञांचे सल्ले, कौशल्य प्रशिक्षण आणि निधी पुरवतो. परंतु या गटाला लागणारी बहुतांश शस्त्रांची निर्मिती ही स्थानिक पातळीवरच होते. अलिकडच्या काही वर्षांत, ‘इस्लामिक जिहाद’ने ‘हमास’प्रमाणे एक शस्त्रागार विकसित केले आहे. त्यांच्याकडे इस्रायलच्या मध्यवर्ती भागातील तेल अवीवसारख्या महानगरावर हल्ला करण्यास सक्षम असलेली लांब पल्ल्याची रॉकेट्स आहेत. जरी ‘इस्लामिक जिहाद’चे मूळ कार्यक्षेत्र गाझा असले तरी, त्याचे अस्तित्व लेबनॉनची राजधानी बैरूत आणि सिरियाची राजधानी दमास्कसमध्येही दिसून येते. तेथे या गटाचे इराणी अधिकाऱ्यांशी थेट व घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या आठवड्यात जेव्हा इस्रायलने गाझामध्ये लष्करी मोहीम सुरू केली, तेव्हा ‘इस्लामिक जिहाद’चा सर्वोच्च नेता झियाद अल-नखलाह हा तेहरानमध्ये इराणी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्याशी चर्चा करत होता.

‘इस्लामिक जिहाद’ कमांडरला का ठार केले?

इस्रायलकडून गाझामध्ये ‘इस्लामिक जिहाद’चा नेता मारला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. नुकताच ठार झालेला ‘इस्लामिक जिहाद’चा कमांडर तैसीर अल-जाबरीने बहा अबू अल-अट्टाची जागा घेतली होती. अल अट्टा २०१९ मध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मारला गेला होता. २०१४ पासून प्रथमच गाझा पट्टीतील संघर्षात अल अट्टाच्या हत्येच्या रूपाने इस्लामिक जिहाद’च्या एका मोठ्या नेत्याला इस्रायलकडून मारण्यात आले. नुकताच ठार झालेला ५० वर्षीय कमांडर अल-जबारी ‘इस्लामिक जिहाद’च्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या ‘मिलिटरी काऊन्सिल’चा सदस्य होता. मागील वर्षी युद्धादरम्यान गाझा शहर आणि उत्तर गाझा पट्टीमधील ‘इस्लामिक जिहाद’च्या दहशतवादी कारवायांचे नेतृत्व अल-जबारीने केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली इस्रायलविरुद्ध रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी सुरू होती, असा दावा इस्रायलने केला आहे.

बसम अल-सादी कोण आहे?

या आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम किनारपट्टीमधील ‘इस्लामिक जिहाद’च्या एका वरिष्ठ कमांडरला, बसम अल-सादीला इस्रायलने अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर कमांडर अल-जबारी मारला गेला. ६२ वर्षीय बसम अल-सादी हा ‘इस्लामिक जिहाद’चा वरिष्ठ नेता आहे. इस्रायली प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इस्लामिक जिहाद’ गटाचा प्रभाव पश्चिम किनारपट्टीमध्ये वाढवण्यासाठी व तो सर्वदूर पोहोचवण्यासाठी अल-सादी काम करत होता. ‘इस्लामिक जिहाद’चा सक्रीय सदस्य असलेल्या अल-सादीने एकूण १५ वर्षे इस्रायली कारागृहात घालवली आहेत. ‘इस्लामिक जिहाद’चे दहशतवादी असलेल्या त्याच्या दोन मुलांना इस्रायलने २००२ मध्ये स्वतंत्र घटनांत ठार मारले होते आणि त्याच वर्षी पश्चिम किनारपट्टीच्या जेनिन शहरात झालेल्या भीषण लढाईत त्याचे घरही उद्ध्वस्त केले होते.

‘हमास’वर तारेवरच्या कसरतीची पाळी कशी?

इस्रायली हवाई दलाचे माजी प्रमुख झ्विका हैमोविच यांनी सांगितले, की जर कमांडरची हत्या केली तर त्याचा प्रतिकूल परिणाम संपूर्ण संघटनेवर होतो. त्यामुळे जिहादच्या कारवायांत मोठा अडथळा निर्माण होतो. २००७ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून, ‘हमास’ने इस्रायलशी चार युद्धे केली. यात त्यांना अनेकदा ‘इस्लामिक जिहाद’च्या दहशतवाद्यांचा सक्रिय पाठिंबा लाभला. गेल्या वर्षी झालेल्या अकरा दिवसांच्या युद्धानंतर इस्रायल-पॅलेस्टिनी सीमेवर मोठ्या प्रमाणात शांतता नांदली. मात्र, नुकत्याच पेटलेल्या संघर्षात ‘हमास’ स्वतःहून कटाक्षाने लांब राहिल्याचे चित्र दिसत आहे. अन्यथा चहुबाजूंनी हे युद्ध पेटले असते. ‘इस्लामिक जिहाद’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर सतत रॉकेट हल्ले करून व अनेकदा त्याची जबाबदारी न स्वीकारून ‘हमास’पुढे आव्हानच निर्माण केले. सर्वसामान्य पॅलेस्टिनी नागरिकांत आपला प्रभाव वाढवण्यासाठी ‘इस्लामिक जिहाद’ अशी कृत्ये करत आहे. मात्र, तरीही ‘हमास’ संयम राखून इस्रायलसोबतचा युद्धविराम पाळत आहे. मात्र, गाझा पट्टीतून होणाऱ्या या रॉकेट हल्ल्यासाठी इस्रायलने ‘हमास’लाच जबाबदार धरले आहे. ‘इस्लामिक जिहाद’ने इस्रायलशी सुरू केलेला संघर्ष मर्यादित ठेवताना पॅलेस्टिनी नागरिकांचा असंतोष टाळण्याची तारेवरची कसरतही ‘हमास’ला करावी लागणार आहे. मागील संघर्षाप्रमाणे इस्रायलविरुद्ध संघर्षाचा कालावधी, त्याची व्याप्ती, त्यातील हिंसाचाराची दाहकता याबाबत अखेर ‘हमास’चीच भूमिका निर्णायक असेल.

इस्रायल निवडणुकांचे भवितव्य संघर्षावर अवलंबून कसे?

इस्रायलमध्ये राजकीय पेच असताना, हा संघर्ष नव्याने सुरू झाला. चार वर्षांपेक्षा कमी काळात इस्रायलमध्ये पाचव्यांदा निवडणुका घ्याव्या लागत आहेत. या उन्हाळ्याच्या सुरुवातीला विविध विचारसरणीच्या पक्षांचे सरकार कोसळल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधानपदाची सूत्रे याइर लॅपिड यांनी घेतली. निवडणुका होईपर्यंत त्यांच्याकडे नेतृत्व असेल. लॅपिड हे दूरचित्रवाणी वाहिनीवरील सूत्रसंचालक व लेखक आहेत. बहुसंख्य इस्रायली नागरिकांना आपला नेता सुरक्षा दलाशी संबंधित असावा, असे वाटते. मात्र, लॅपिड यांना अशी पार्श्वभूमी नाही. त्यांचे राजकीय नशीब सध्या ‘इस्लामिक जिहाद’शी इस्रायलच्या सुरू असलेल्या संघर्षाच्या भवितव्यावर अवलंबून आहे. यातून एक तर ते स्वत:ला सक्षम नेता म्हणून सिद्ध करू शकतील, अन्यथा इस्रायलच्या नागरिकांना या उन्हाळी हंगामाअखेरच्या सप्ताहांचा आनंद लुटण्याची इच्छा असताना ‘इस्लामिक जिहाद’विरुद्ध जर प्रदीर्घ संघर्ष झाला तर त्याचा राजकीय फटका लॅपिड यांना बसू शकतो. येत्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला सुरू असलेल्या माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर मात करण्याची आशा लॅपिड बाळगून आहेत.