Coldrif Cough Syrup Deaths: देशाच्या विविध भागांत कोल्ड्रीफ या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांनी आपला जीव गमावला. मध्य प्रदेशात या कफ सिरपमुळे तब्बल १४ मुलांचा मृत्यू झाला. हे जीवघेणे कफ सिरप श्रीसन कंपनीने तयार केले आहे. तामिळनाडू सरकारने फार्मास्युटिकल कंपनी श्रीसनला औषध परवाना (ड्रग लायसन्स) रद्द का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस रविवारी पाठवली. चाचण्यांमध्ये कोल्ड्रीफ कफ सिरपमध्ये अत्यंत विषारी पदार्थ आढळल्यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांच्या सरकारांनी त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
आरोग्य मंत्रालयानेदेखील स्पष्ट केले आहे की, कोल्ड्रीफ कफ सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन होते, जे सहसा औद्योगिक सॉल्व्हेंट्समध्ये वापरले जाते. डीईजीचे अगदी कमी प्रमाणही जीवघेणे ठरू शकते. गेल्या आठवड्यात केंद्राने डॉक्टरांना दोन वर्षांखालील मुलांना खोकला आणि सर्दीसाठी हे सिरप लिहून न देण्याचा सल्लादेखील जारी केला. श्रीसन कंपनीविषयी काय माहिती समोर आली? लहान मुलांच्या मृत्यूस जबाबदार कोण? तपासकर्त्यांना कंपनीत काय आढळून आले? त्याविषयी जाणून घेऊयात…
कफ सिरप तयार करणारी कंपनी
कोल्ड्रीफ सिरप तयार करणाऱ्या चेन्नईयेथील या कंपनीची सुरुवात एक खासगी फर्म म्हणून १९९० मध्ये झाली. ‘इंडियामार्ट’ या संकेतस्थळावर ‘श्रीसन फार्मास्युटिकल मेकर’ने स्वतःचा उल्लेख कफ सिरप, प्रोटीन पावडर, फार्मास्युटिकल सिरप्स आणि हर्बल चाईल्ड ग्रोथ सिरपचे व्यापारी असा केला आहे. या संकेतस्थळावर श्रीसन फार्मास्युटिकल मेकरमागील जीएसटी भागीदार म्हणून ‘रंगनाथन’ हे नाव नमूद आहे.

‘एनडीटीव्ही प्रॉफिट’ने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या कागदपत्रांनुसार, पूर्वी श्रीसन फार्मास्युटिकल्स नावाची एक खासगी मर्यादित कंपनी अस्तित्वात होती, ज्याचे संचालक रंगनाथन गोविंदराजन होते. ही कंपनी १९९० मध्ये समाविष्ट झाली होती. तपासात हेदेखील समोर आले आहे की, इंडियामार्टवर सूचीबद्ध असलेला पत्ता आणि उत्पादनाच्या पॅकेजिंगवर छापलेला पत्ता हे सर्व वेगळे आहेत, परंतु ते सर्व चेन्नईच्या एकाच परिसरातील आहेत.
कंपनीबाबत धक्कादायक माहिती उघड
अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील एका कारखान्याची झडती घेतली. कोल्ड्रिफ हे खोकल्याचे सिरपदेखील याच कारखान्यात तयार होते. या तपासात अधिकाऱ्यांना धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. त्यांना उघड्या गॅसच्या शेगड्यांवर रसायनांचे मोठे ड्रम दिसले, ज्यातील रसायन उकळत होते. तिथे प्लास्टिकच्या पाईप्समधून एका पदार्थाची गळती होत होती आणि कंपनीत सर्वत्र गंजलेली उपकरणे पडलेली होती. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, हातमोजे किंवा मास्क नसलेले कामगार निष्काळजीपणे घटक मिसळत होते. मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून मिळालेल्या माहितीनंतर, तामिळनाडूच्या औषध नियंत्रण विभागाने १ आणि २ ऑक्टोबर रोजी कांचीपुरम येथील श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या युनिटवर छापा टाकला.
धोकादायक रसायनांची खरेदी
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने वैद्यकीय-मानक घटकांऐवजी रंग आणि डिंकांसाठी वापरली जाणारी औद्योगिक-मानक (Industrial-Grade) रसायने खरेदी केली होती. कागदपत्रे आणि तपासणी टाळण्यासाठी, ही खरेदी रोखीत आणि गूगल पेद्वारे सनराईज बायोटेक आणि पांडिया केमिकल्स या चेन्नईतील लहान विक्रेत्यांकडून करण्यात आली होती.
कंपनीने सिरपमधील एक महत्त्वाचा घटक असलेले प्रोपीलीन ग्लायकोल प्रमाणित औषधी पुरवठादारांकडून न घेता, स्थानिक रासायनिक व्यापारी आणि पेंट उद्योगाच्या डीलर्सकडून खरेदी केले होते. उत्पादनात वापरण्यापूर्वी, या रसायनांमध्ये जीवघेणे विषारी घटक आहेत की नाही, याची कोणतीही तपासणी केली गेली नव्हती, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
विषारी घटक आणि सुरक्षा तपासणीचे अभाव
तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना असेही आढळले की, वापरलेल्या प्रोपीलीन ग्लायकॉलमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol) होते, जे एक अत्यंत विषारी रसायन आहे. हे रसायन सामान्यतः ब्रेक फ्लुइड्स, लुब्रिकंट्स आणि डिंकांमध्ये वापरले जाते. हा पदार्थ मूत्रपिंड (किडनी), यकृत (लिव्हर) आणि मज्जासंस्थेचे (नर्व्हस सिस्टीम) गंभीरपणे नुकसान करू शकतो.
छिंदवाडा येथे मृत्यू झालेल्या मुलांच्या मूत्रपिंडाच्या तपासणीत डायथिलीन ग्लायकॉलच्या विषबाधेचे उच्च प्रमाण दिसून आले. कोल्ड्रिफच्या विषारी ठरलेल्या बॅच (SR-13) मध्ये ४८.६ टक्के डायथिलीन ग्लायकॉल होते, जे मर्यादेपेक्षा जवळजवळ ५०० पट जास्त आहे. कंपनीकडे कोणतीही गुणवत्ता चाचणी प्रणाली नव्हती आणि उत्पादनाच्या दुष्परिणामांचे किंवा परत मागवण्याचे कोणतेही निरीक्षण नव्हते. कंपनीत कोणतीही औषध-सुरक्षा प्रणाली कार्यरत नव्हती. याचाच अर्थ एकदा उत्पादन कारखान्यातून बाहेर पडल्यावर, त्याची सुरक्षा किंवा दुष्परिणाम यांचा मागोवा कोणीही घेतला नाही.
कोल्ड्रिफ सिरपची जीवघेणी बॅच
छिंदवाडा येथील मुलांनी सेवन केलेली कोल्ड्रिफ सिरपची बॅच SR-13 मे २०२५ मध्ये तयार करण्यात आली होती आणि ती एप्रिल २०२७ पर्यंत वैध होती. धोक्याची सूचना मिळेपर्यंत त्याची बाजारात सर्रास विक्री केली जात होती. याच बॅचचे वितरण तामिळनाडू, ओडिशा आणि पुद्दुचेरी येथेही झाले असावे, असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, याच सुविधेत तयार करण्यात आलेले इतर सिरप्स, म्हणजेच रेसपोलाईट डी, जीएल, एसटी आणि हेप्सँडिन – गुणवत्ता चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले, पण कोल्ड्रिफ जीवघेणे निघाले.
ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान छिंदवाडा येथील डॉक्टरांनी ताप आणि खोकला असलेल्या मुलांसाठी हे सिरप लिहून दिले. त्यापैकी अनेकांना मूत्रपिंड निकामी झाल्याचा त्रास सुरू झाला. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, तपासणीत सहभागी असलेल्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, ही दुर्घटना एका निष्काळजीपणाचे कृत्य नसून ती एका संपूर्ण प्रणालीचे अपयश आहे. चेन्नईतील रसायनांच्या खरेदीपासून ते कांचीपुरममधील गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव आणि मध्य प्रदेशात कोणतीही तपासणी नसताना झालेले वितरण, हे त्या अपयशाचे उदाहरण आहे. छाप्यानंतर, तामिळनाडू औषध नियंत्रण प्राधिकरणाने श्रीसन फार्मास्युटिकल्सला उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले आणि त्यांचा सर्व साठा गोठवला. कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.