महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ११ वर्षांनी निकाल लागणार आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी (१० मे) डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात निकाल देण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हत्या कधी आणि कशी?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरले.

आणखी वाचा-केजरीवालांवर दहशतवाद्याच्या सुटकेसाठी पैसे घेतल्याचा आरोप; कोण आहे देविंदर भुल्लर?

आरोपपत्रात काय नमूद आहे?

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सुरुवातीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास सोपविण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. सातारा), सचिन अंदुरे (र. छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (रा. जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (दोघे रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली. विक्रम भावे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ॲड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावह गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हत्या प्रकरणाचा कट कसा उलगडला?

या प्रकरणाचे धागेदोरे मिळवणे पोलिसांना जिकिरीचे झाले होते. पुणे पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला. मात्र, हाती ठोस काही लागले नव्हते. वर्षभरानंतरही मारेकरी न सापडल्याने पत्रकार केतन तिरोडकर यांनी संबंधित तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली होती. दरम्यान, बंगळुरूत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात कर्नाटकातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील चिंचवड परिसरातून अमोल काळे याला ताब्यात घेतले. काळे सनातन संस्थेशी संबंधित आहे. त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरातून शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शरद कळसकरला ताब्यात घेतले. कळसकरने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली.

आणखी वाचा-कोण आहेत सॅम पित्रोदा? वर्णद्वेषावर विधान केल्याने अडचणीत; काँग्रेसच्या ओव्हरसीज अध्यक्षपदाचाही दिला राजीनामा

प्रत्यक्ष खटला कधी सुरू झाला?

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर आठ वर्षांनी खटल्याच्या कामकाजास सुरुवात झाली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात १५ सप्टेंबर २०२१ रोजी सुनावणी सुरू झाली. या खटल्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. ‘सीबीआय’कडून विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली. विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली असून, सरकार तसेच बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. प्रकाश सालसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी अंतिम युक्तिवाद केला.

‘सीबीआय’चा अंतिम युक्तिवाद काय?

‘डॉ. दाभोलकर यांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू होता. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले आहे. डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून सनातन संस्था आणि आरोपी तावडे यांच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती, हे सिद्ध झाले आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे. आरोपी अंदुरेने गुन्हा केल्याचा कबुलीजबाब दिला आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल जप्त झाले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे सांगितले आहे. दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर काढण्यात आल्याचे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे गोळीबार झाल्याचे सिद्ध होते,’ असे ‘सीबीआय’चे वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तिवादात नमूद केले होते.

rahul.khaladkar@expressindia.com