Retired Out & Retired Hurt: भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान बंगळुरू इथे झालेल्या ट्वेन्टी२० सामन्याला फारसं महत्त्व नव्हतं. याचं कारण म्हणजे भारतीय संघाने तीनपैकी दोन सामने जिंकत मालिका खिशात टाकली होती. पण बुधवारी या सामन्यात जे घडलं ते जगभरातल्या क्रिकेटरसिकांना अवाक करणारं होतं. अफगाणिस्तानने भारताच्या २१२ धावसंख्येची बरोबरी केली. सुपर ओव्हरमध्येही बरोबरी कायम राहिली. हा गुंता सोडवण्यासाठी दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यामध्ये भारताने बाजी मारली. सुपर ओव्हरदरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. काय असतं हे? रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊट यात नेमका फरक काय असतो? हे समजून घेऊया.
दोन्ही डाव बरोबरीत संपल्यानंतर सुपर ओव्हरद्वारे निकाल लागणार हे स्पष्ट झालं. शतकी खेळी साकारणारा रोहित शर्मा सुपर ओव्हरमध्ये खेळणार हे स्वाभाविक होतं. रोहितच्या बरोबरीने यशस्वी जैस्वाल खेळायला उतरला. भारताला १७ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाने ४ चेंडूत १४ धावा केल्या. यामध्ये रोहितच्या दोन तडाखेबंद षटकारांचा समावेश होता. उर्वरित २ चेंडूत ३ धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. त्यानंतर त्याने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. रोहितने तंबूत परतण्याचा निर्णय घेतल्याने रिंकू सिंग नॉन स्ट्रायकिंग एन्डला आला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना यशस्वी-रिंकू जोडीला एकच धाव काढता आली आणि सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली.
रिटायर्ड आऊट किंवा रिटायर्ड हर्ट संदर्भात मेरलीबोन क्रिकेट क्लबचा नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नियम तयार करण्याची जबाबदारी क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स इथल्या मेरलीबोन क्रिकेट क्लबकडे आहे.
-२५.४.२ नुसार, फलंदाज दुखापतीमुळे, आजारपणामुळे किंवा अन्य एखाद्या कारणामुळे निवृत्त झाला तर फिट झाल्यानंतर तो त्याची खेळी पुन्हा सुरू करू शकतो. फलंदाज खेळण्यासाठी परतला नाही तर धावफलकावर ‘रिटायर्ड- नॉट आऊट’ असा उल्लेख केला जाईल.
-२५.४.३- दुखापत, आजारपण किंवा अन्य कारणाव्यतिरिक्त फलंदाजाने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तर तो फलंदाज, प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या परवानगीनेच पुन्हा फलंदाजीला उतरु शकतो. काही कारणाने तो खेळायला परतू शकला नाही तर धावफलकात त्याच्या नावापुढे ‘रिटायर्ड-आऊट’ असा उल्लेख केला जाईल.
-सुपर ओव्हर टाय झाल्यास- आधीच्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेला कोणताही फलंदाज हा पुढच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला उतरु शकत नाही.
सुपर ओव्हरसंदर्भात नियम काय सांगतो?
आयसीसी प्लेइंग कंडिशन्समध्ये नमूद केल्यानुसार, आधीच्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेला फलंदाज पुढच्या किंवा नंतरच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करु शकतो.
रोहित शर्मा पहिल्या सुपर ओव्हरमध्ये तंबूत परतला होता. तो रिटायर्ड आऊट झाला का रिटायर्ड हर्ट यासंदर्भात पंचांनी औपचारिक घोषणा केलेली नाही. रोहित ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन परतला असता तरच नियमानुसार तो पुढच्या सुपर ओव्हरमध्ये खेळू शकला असता. पण त्याला कोणतीही दुखापत झाल्याचं सकृतदर्शनी दिसलं नाही. मैदानावरील पंच जयरामन मदनगोपाळ आणि वीरेंदर शर्मा यांनी रोहित नेमक्या कोणत्या कारणासाठी तंबूत परतला याबाबत घोषणा केली नाही. पंचांनी स्पष्ट कौल न दिल्याने रोहित आणि पर्यायाने भारतीय संघाचा फायदा झाला. रोहित दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळू शकला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये त्याने ३ चेंडूत ११ धावा केल्या. या धावा भारताच्या विजयात निर्णायक ठरल्या.
रोहितने अशाप्रकारे मूळ डावात, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केली. अशा प्रकारे ट्वेन्टी२० प्रकारात तीन डावात खेळणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला.