पंजाबमध्ये सोशल मीडियावर पनामा जंगलातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. हे व्हिडीओ भारत आणि पाकिस्तानमधील पंजाबी लोकांनी शेअर केले आहेत. यात स्थलांतरीतांचे हाल होताना, मृत्यू होतानाचे हादरवणारे प्रसंग दिसत आहेत. हे व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘डाँकी मार्गाचा’ वापर कधीही करू नका, आपल्या देशातच काम शोधा, असं आवाहनही केलेले पाहायला मिळत आहे.

डाँकी मार्गाने अमेरिकेला न जाण्याचं आवाहन होऊनही जीव धोक्यात टाकत अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांच्या संख्येत फार घट झालेली नाही. आधी पंजाब आणि हरियाणात लोकप्रिय असणारा हा डाँकी मार्ग आता गुजरातमध्येही लोकप्रिय होत आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

२१ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपटही याच डाँकी मार्गाने जाणाऱ्या स्थलांतर करणाऱ्यांवर आधारित आहे. त्यामुळे डंकी म्हणजे काय, डाँकी मार्ग काय आहे याविषयी सर्वत्र उत्सुकता असलेली पाहायला मिळत आहे. अशातच शाहरुख खानने नुकतेच दुबईतील एका कार्यक्रमात चित्रपटाच्या नावाचा म्हणजे डंकीचा अर्थ काय हे सांगितलं. डंकी म्हणजे जगभरातील लोक आपल्या देशातून बाहेर पडण्यासाठी वापरत असलेला बेकायदेशीर मार्ग, त्यालाच डाँकी मार्ग म्हणतात, असं शाहरुखने सांगितलं.

पहिला थांबा – लॅटिन अमेरिका

लॅटिन अमेरिकन देशांमध्ये जाणं हे तसं फार अवघड काम नाही. मात्र, या देशांमध्ये पोहचायलाही अनेक महिने लागतात. मागील वर्षी ८ महिने प्रवास करून पंजाबमधून अमेरिकेत गेलेला एक व्यक्ती म्हणाला, “आमच्या एजंटने (तस्कर) आम्हाला दीड महिने मुंबईत ठेवलं होतं. त्याने सांगितलं होतं की, तो त्याच्या ब्राझिलमधील एजंटच्या सिग्नलची वाट पाहत होता. ब्राझिलमधील एजंटची वाट पाहावी लागली, तर तिकडे जाण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.”

काही एजंट दुबईहून थेट मेक्सिकोच्या व्हिसाची व्यवस्था करतात. मात्र, थेट मेक्सिकोत उतरणं हे अधिक धोकादायक मानलं जातं. कारण मेक्सिकोत उतरून तेथील स्थानिक प्रशासन अटक करण्याचाही धोका असतो. त्यामुळेच अनेक एजंट त्यांच्या ग्राहकांना लॅटिन अमेरिकन देशांमध्ये ठेवतात. त्यानंतर ते या ग्राहकांना कोलंबियाला नेतात. एखादा देश अमेरिकेच्या सीमेपासून जितका जवळ, तितका तेथील व्हिसा भारतीयांना मिळणं कठीण असतं.

धोकादायक जंगलं पार करावी लागतात

कोलंबियातून स्थलांतरितांना पनामात दाखल व्हावं लागतं. येथे दोन्ही देशातील धोकादायक जंगलातून प्रवास करावा लागतो. या जंगलातून चालताना स्वच्छ पाण्याचा अभाव, जंगली प्राणी आणि गुन्हेगारी टोळ्या अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या भागात अनेकदा स्थलांतरितांना लुटलं जातं. अगदी बलात्काराच्या घटना घडतात. या भागात घडलेल्या गुन्ह्यांची कुठेही नोंद होत नाही आणि गुन्हेगारांना शिक्षाही होत नाही.

इथपर्यंत सगळं काही ठीक राहिलं तर हा प्रवास पूर्ण व्हायला जवळपास ८ ते १० महिने लागतात. मात्र, या प्रवासात कुणाचा मृत्यू झाला, तर अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह मागे पाठवण्याचीही कोणतीही व्यवस्था नसते.

ग्वाटेमाला हे या मार्गावरील मोठे समन्वय केंद्र आहे. मेक्सिकोमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि अमेरिकेच्या सीमेकडे प्रवास सुरू ठेवण्यासाठी स्थलांतरितांना येथे नवीन तस्करांच्या स्वाधीन केले जाते. येथून सरकारी यंत्रणांशी लपाछपीचा खेळ सुरू होतो.

गुरदासपूरच्या गुरपाल सिंग या २६ वर्षांच्या तरुणाचा बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतर करताना मेक्सिकोमध्ये बस अपघातात मृत्यू झाला होता. त्याने मृत्यूपूर्वी पंजाबमध्ये त्याच्या बहिणीला केलेल्या शेवटच्या कॉलमध्ये सांगितलं होतं की, त्यांना मेक्सिकन पोलिसांनी अडवले होते. त्यामुळे त्यांना पळून जाण्यासाठी घाईघाईने बस पकडावी लागली होती.

बस अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो फोनवर बहिणीशी बोलतच होता. मात्र, त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळण्यास एक आठवडा लागला. भाजपाचे गुरदासपूरचे खासदार सनी देओल यांनी गुरपालचा मृतदेह भारतात आणण्यास मदत केली.

अमेरिकेला जाताना जंगल टाळणं शक्य, धोके नाही

अमेरिकेला जाताना पनामातील जंगल टाळण्यासाठी कोलंबियातून आणखी एक मार्ग आहे. तो सॅन आंद्रेसपासून सुरू होतो, पण तो मार्ग जास्त सुरक्षित नाही.सॅन आंद्रेस येथून स्थलांतरित बोटीने मध्य अमेरिकेतील निकाराग्वा या देशात जातात. बेकायदेशीर स्थलांतरित असलेल्या या मासेमारी बोटी सॅन अँड्रेसपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या फिशरमन्स के येथे जातात. तेथून स्थलांतरितांना दुसऱ्या बोटीने मेक्सिकोला नेले जाते.

अमेरिकेच्या सीमेवर

अमेरिका आणि मेक्सिकोला विभक्त करणारी ३ हजार १४० किमीची सीमा आहे. अमेरिकेत जाण्यासाठी स्थलांतरितांना हेच सीमेवरील कुंपण पार करावे लागते. अनेकजण अमेरिकेत जाण्यासाठी धोकादायक रिओ ग्रांडे नदी ओलांडण्याचा पर्याय निवडतात. स्थलांतरीत अमेरिकेची सीमा ओलांडताना अमेरिकन अधिकारी फार विरोध करत नाहीत. सीमा ओलांडल्यानंतर स्थलांतरितांना ताब्यात घेऊन छावण्यांमध्ये ठेवले जाते. तेथे अमेरिकन अधिकाऱ्यांना स्थलांतरित आश्रयासाठी योग्य वाटतात की नाही यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असते.

एक नवीन, सुरक्षित मार्ग

सध्या अमेरिकेला जाण्यासाठी आणखी एक सोपा डाँकी मार्ग आहे. बरेच स्थलांतरित पहिल्यांदा युरोपला जातात आणि तेथून थेट मेक्सिकोला जातात. अमेरिकेत जाण्यासाठी डाँकी मार्गाने ९ देश पार केलेल्या एका स्थलांतरिताने सांगितले, “हे सर्व एजंट्सची किती ओळख आणि संपर्क आहेत यावर अवलंबून असते. युरोपमधून जाणे सोपे आहे. मात्र, ज्या दिवशी युरोप-मेक्सिको मार्ग सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येईल, त्या दिवशी लोकांना पुन्हा जुन्याच मार्गांचा वापर करावा लागेल.”

धोकादायक आणि महागडा प्रवास

डाँकी मार्गाने प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीला सरासरी १५ लाख ते ४० लाख रुपये खर्च येऊ शकतो. परंतु, काही वेळा त्याची किंमत ७० लाख रुपये इतकीही असते. काही एजंट अधिक पैशांच्या बदल्यात प्रवासात कमी त्रास होईल असं आश्वासन देतात.

भारतातील एजंट्सचे संपूर्ण अमेरिकेतील तस्करांशी संबंध आहेत. जर काही कारणाने भारतीय एजंट पेमेंट करण्यात अपयशी झाले तर तिकडे अमेरिकेत स्थलांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या जीवन आणि मृत्यूचा प्रश्न तयार होतो. मुलांच्या स्थलांतरासाठी अनेकदा कुटुंबं हप्त्याने पैसे भरतात.

हेही वाचा : KBC 15: ‘वडिलांबाबत एवढंही माहीत नाही’, सुहाना खानचे उत्तर चुकल्यावर अमिताभ बच्चन यांची फिरकी

“मी तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले होते. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला हप्ता दिला. नंतर कोलंबियाला पोहोचल्यानंतर दुसरा हप्ता दिला आणि आम्ही अमेरिकेच्या सीमेजवळ पोहोचल्यानंतर शेवटचा हप्ता दिला. जर माझ्या घरचे पेमेंट करण्यात अयशस्वी झाले असते, तर मेक्सिकोतील तस्करांनी मला गोळ्या घालून ठार मारले असते”, असं अमेरिकेत आश्रयाला परवानगी मिळण्याची वाट पाहत असलेल्या एका ट्रक चालकाने सांगितले.