मुंबई ते रत्नागिरी, मालवण प्रवास अतिजलद आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग (मालवण) अशी रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थीच्या दोन-तीन दिवस आधी रो रो वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन सागरी मंडळाचे होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा मुहूर्त चुकला असून आता मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते रत्नागिरी प्रवास तीन तासात तर मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास पाच तासांत पार करता येणार आहे. मात्र या अतिजलद प्रवासासाठी प्रवाशांना २५०० ते ९००० रुपये मोजावे लागणार आहे. तर दुसरीकडे चारचाकी आणि इतर वाहने नेण्यासाठीही भरमसाट शुल्क मोजावे लागणार आहे. रो रो सेवेचे प्रवाशांसाठीचे, वाहनांसाठीचे दर काय असणार, केव्हा ही सेवा सुरू होणार याचा हा आढावा…
मुंबई ते कोकण अतिजलद प्रवासाचा पर्याय
मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातही गणेशोत्सवात मुंबईतून मोठ्या संख्येने प्रवाशी कोकणात जातात. रेल्वे, रस्ते आणि एसटी असे पर्याय वापरत प्रवाशी कोकणात पोहचतात. मात्र गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रेल्वे आणि एसटी अतिरिक्त सेवाही अपुरी पडते. दाटीवाटीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. रस्ते मार्गे जाणाऱ्या वाहनांची संख्याही प्रचंड मोठी असते. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी असते. तर कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या वाहनांची ही संख्या अधिक असते. मुंबई ते कोकण प्रवास करणार्यासाठी प्रवाशांना १२ ते १४ तास वा त्यापेक्षाही अधिक तास घालवावे लागतात. त्यातही मुंबई-गोवा द्रुतगती महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षांपासून पूर्ण होत नसल्याने मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद आणि सुकर करण्याचे प्रवाशांचे स्वप्न काही पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी जलवाहतूकीचा पर्याय पुढे आणला आहे. मुंबई ते विजयदुर्ग अशी रो रो सेवा (रोल-ऑन, रोल-ऑफ) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई ते मालवण प्रवास पाच तासांत?
मुंबई ते रत्नागिरी प्रवासासाठी किमान आठ तास लागतात. तर मुंबई ते सिंधुदुर्ग रस्ते प्रवासासाठी १२ ते १४ वा कधी-कधी त्याहीपेक्षा अधिक तास लागतात. त्यामुळे अतिजलद प्रवासासाठी मुंबई ते विजयदुर्ग अशी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी भाऊचा धक्का आणि विजयदुर्ग जेट्टी येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. विजयदुर्ग प्रवासी जेट्टीचे रुपांतर रो रो जेट्टीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई ते विजयदुर्ग अशी रो रो लवकरच धावणार असून या रो रोला जयगड (रत्नागिरी) इथे एक थांबा असणार आहे. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई ते रत्नागिरी प्रवास तीन तासात तर मुंबई ते मालवण प्रवास पाच तासांत करता येणार असल्याचा दावा सागरी मंडळाने केला आहे. कारण मुंबई ते विजयदुर्ग जलमार्गावर एम टू एम प्रिन्सेस २ नावाची बोट २५ नाॅट्स वेगाने संचारणार आहे. त्यामुळे रत्नागिरीला तीन तासांत तर सिंधुदुर्गला पाच तासांत पोहचणे सोपे होणार आहे. दरम्यान या रो रो सेवेत रत्नागिरी असा एक थांबा असणार आहे. पण पुढे या सेवेत मांडवा आणि श्रीवर्धन असे आणखी दोन थांबे असण्याचीही शक्यता आहे.
गणेशोत्सवाआधीचा मुहूर्त हुकला
मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा गणेश चतुर्थीच्या दोन ते तीन दिवस आधी सुरू करण्याचे नियोजन सागरी मंडळाचे होते. मात्र मुंबई, कोकणात पावसाचा जोर वाढल्याने रो रोच्या चाचण्या सुरू होण्यास विलंब झाला. तर दुसरीकडे रो रो सेवा सुरू करण्यासाठीच्या काही परवानग्या मिळण्यासही वेळ लागला. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दोन ते तीन दिवस आधी रो रो सेवा सुरू करता आली नाही आणि प्रवाशांचे गणेशोत्सवासाठी कोकणात रो रो ने केवळ तीन ते पाच तासात जाण्याचे स्वप्न भंगले. पण आता मात्र आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून १ सप्टेंबरपासून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू होणार असल्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात रो रो ने जात आले नाही तरी गणेशोत्सव पार पाडून कोकणातून मुंबईत परतण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
२५०० ते ९००० रुपये तिकीट?
कोकणात अतिजलद जाण्यासाठी रो रो सेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यापासून यासाठी किती तिकीट असणार याची उत्सुकता प्रवाशांमध्ये होती. ही उत्सुकता आता संपली आहे. नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार इकॉनॉमी क्लासमधून मुंबई ते विजयदुर्ग प्रवास करण्यासाठी २५०० रुपये तर प्रिमियम इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करण्यासाठी ४००० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचवेळी बिझनेस क्लासचे तिकीट ७५०० रुपये तर प्रथम वर्गाचे तिकीट ९००० रुपये असणार आहे. या रो रोमधून चारचाकी वाहनांसह इतर वाहनेही नेता येणार आहेत. त्यानुसार चार चाकी वाहनासाठी ६००० रुपये, दुचाकीसाठी १००० रुपये, सायकलसाठी ६०० रुपये तर मिनीबससाठी १३००० रुपये असे तिकीट दर असणार आहेत. हे दर प्रवाशांना परवडतील की महाग वाटतील हे रो रो सेवा सुरू झाल्यानंतर या सेवेला मिळणाऱ्या प्रतिसादावरून स्पष्ट होईल.
कशी असेल एम टू एम प्रिन्सेस बोट?
मागील कित्येक वर्षांपासून भाऊचा धक्का ते मांडवा, अलिबाग अशी रो रो सेवा देणाऱ्या एम टू एम कंपनीची एम टू एम प्रिन्सेस २ ही बोट मुंबई ते विजयदुर्ग जलमार्गावर धावणार आहे. २५ नाॅट्स वेगाने धावणारी ही बोट असून दक्षिण आशियातील सर्वात वेगवान अशी ही बोट असल्याचा दावा केला जात आहे. ६०० हून अधिक प्रवाशी क्षमतेची ही बोट असून या बोटीत मोबाईल चार्जिंगपासून खाण्यापिण्यापर्यंतची सर्व सुविधा या बोटीत असणार आहे. आरामदायी खुर्च्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर, आरामदायी होणार आहे. या बोटीत इकॉनॉमी वर्गात ५५२ आसनांची व्यवस्था असून प्रिमीयम इकॉनॉमीची ४४ आसने, बिझनेस क्लासची ४८ आणि प्रथम वर्गातील १२ आसने आहेत. तर ५० चारचाकी आणि ३० दुचाकी वाहने यातून एका वेळी नेता येणार आहेत. अशा बोटीतून १ सप्टेंबरपासून प्रवाशांना प्रवास करता येईल असे जाहिर करण्यात आले आहे. तेव्हा या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.