महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालाची टक्केवारी दरवर्षी वाढत आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ वाढला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये चिंतेचे वातावरण असून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.
एमपीएसी राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप काय?
एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेची तीन टप्प्यांची रचना करण्यात आलेली आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे याचे स्वरूप आहे. पूर्व परीक्षा ही फक्त पात्रता तपासण्यासाठी असते. याचे गुण अंतिम गुणवत्तेत धरले जात नाहीत. यामध्ये सामान्य अध्ययन आणि सी-सॅट हे दोन पेपर असतात. दोन्ही पेपर बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. तर मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असते. मुख्य परीक्षेतील गुण हे अंतिम यश निश्चित करतात. यामध्ये मराठी (निबंध/अभिव्यक्ती), इंग्रजी यासोबतच अन्य विषयांची मिळून १७५० गुणांची परीक्षा असते. त्यानंतर मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. नुकताच २०२४च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जुन्या पद्धतीनुसार ही शेवटची परीक्षा होती. ‘एमपीएससी’तर्फे २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली. यात राज्यातील १ हजार ५१६ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले.
राज्यसेवा परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल?
एमपीएससीने जून २०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२३ पासून होणार होती. मात्र एका वर्षातच परीक्षेत इतका मोठा बदल होत असल्याने जुन्या परीक्षा पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांचे नुकसान होईल, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना आयोगाने किमान तीन वर्षांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नव्हता. त्यामुळे परीक्षेतील नवा बदल हा २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी राज्यातील प्रमुख शहरांत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. त्यानंतर नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर हा बदल करण्यात आला आहे. सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूपाच्या नऊ प्रश्नपत्रिका असतील. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी ३०० गुणांच्या असतील. मराठी किंवा इंग्रजी निबंधाची एक, सामान्य अध्ययनाच्या एकूण चार, वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील. कालानुरूप बदल करून परीक्षा आणि अभ्यासक्रमाची रचना नव्याने करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल. तसेच सुधारित रचनेमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांना आहे.
परीक्षेच्या ‘कट ऑफ’मध्ये कसा बदल?
यावर्षी राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पहिल्यांदाच प्रत्येक प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ वाढला आहे. यावर्षी खुल्या गटाचा ‘कट ऑफ’ ५०७ असून, एसईबीसी ४९०, ओबीसी ४८५, एनटी ४६३, ईडब्ल्यूएस ४४५, एससी ४४५.७५ तर एसटीचा ४१५ आहे. राज्यसेवा परीक्षेच्या मागील चार वर्षांच्या निकालावर लक्ष घातले असते दरवर्षी ‘कट ऑफ’मध्ये वाढ होताना दिसत आहे. खुल्या वर्गाचा मागील पाच वर्षांचा कट ऑफनु २०१८-४६७, २०१९-४५९, २०२०-४६७, २०२१-४७७, २०२२-४८८, २०२३-४७५ असा आहे. तर २०२४ मध्ये हा ५०७ असा आहे. दरवर्षी दहा ते पंधरा गुणांनी ‘कट ऑफ’ वाढत आहे. मुख्य परीक्षेमध्ये एकेक गुणही फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे गुणांची टक्केवारी वाढत गेल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
भविष्यात याचा काय परिणाम होणार?
एमपीएससी’तर्फे २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ घेण्यात आली होती. यात राज्यातील १ हजार ५१६ विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरले. त्यातील सर्वाधिक १००४ विद्यार्थी पुणे केंद्रातील आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर येथील १४३, नाशिक येथील १११, नवी मुंबई १०८, नागपूर १०४ आणि सर्वात कमी ४६ विद्यार्थी अमरावती येथील आहेत. आयोगाकडून निकालासह पात्रता गुणही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पात्रता गुणांचा ‘कट ऑफ’ पाहिला असता प्रत्येक प्रवर्गात वाढ दिसत आहे. मागील काही वर्षे ‘कट ऑफ’ ४९० पर्यंत होता. यंदा तो ५०७ पर्यंत गेला आहे. त्यामुळे परीक्षेची काठीण्यपातळी दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी परीक्षेचा कट ऑफ वाढत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक तयारी करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची एका गुणासाठी मारामार असते. अनेक विद्यार्थ्यांना एक गुण कमी मिळाल्याने त्यांना मुलाखतीचा टप्पा गाठता येत नाही. त्यामुळे वाढती टक्केवारी पाहता स्पर्धा अधिक कठीण होणार आहे.
ईडब्लूएस प्रवर्गाच्या निकालात अचानक घट
राज्यसेवा मुख्य परीक्षेत खुल्या (ओपन) प्रवर्गाचा कट ऑफ ५०७.५०, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाचा ४९०.७५, इतर मार्गासवर्गीयांचा ४८५.५० तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी) प्रवर्गाचा कट-ऑफ हा ४४५ इतका आहे. मराठा उमेदवारांना आता ‘एसईबीसी’ किंवा पात्र असल्यास ओबीसी असे दोनच प्रवर्ग उपलब्ध आहेत. मराठा उमेदवार आता ‘ईडब्ल्यूएस’ कोट्यातून बाहेर पडल्याने ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील स्पर्धक कमी झाले. याचा परिणाम त्यांच्या कट ऑफवर झाला आहे. पुढील परीक्षांमध्ये ‘ईडब्ल्यूएस’चा कट ऑफ आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे स्पर्धा परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे. येत्या काळात ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारांना सुगीचे दिवस येतील. कमी गुणांवरसुद्धा निवड होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.