अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये ११-१२ ऑक्टोबरदरम्यान अभूतपूर्व संघर्ष उफाळून आला. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले आणि सीमावर्ती भागांतील चौक्यांवर हल्ला चढवला. तेहरीके तालिबान – पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेच्या तळावर हल्ले चढवण्यासाठी ही कारवाई केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला असल्याचे सांगत अफगाणिस्तानने पाकिस्तानचा अनेक सीमावर्ती तळांवर प्रतिकार केला. संघर्ष सुरू होता त्याच काळात तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे अफगाण-पाक संघर्षातील कथित भारताच्या भूमिकेची चर्चाही सुरू झाली.
अफगाणिस्तान-पाकिस्तान कटुता कशामुळे?
ऑगस्ट २०२१मध्ये अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान उफाळून आलेला हा सर्वांत तीव्र संघर्ष ठरला. विशेषतः ११ आणि १२ ऑक्टोबर या काळात डुरँड सीमेवर अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यानची ही २६०० किलोमीटर लांबीची सीमारेषा दोन्ही देशांना मान्य नाही. सीमेच्या रेखांकनावरून वाद वारंवार होत असतात. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित तालिबान संघटनेने पहिल्यांदा अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा, म्हणजे १९९०च्या दशकात हे वाद कमी झाले होते. पण तालिबान २.० पाकिस्तानी सरकारला तितके जुमानत नाहीत. अफगाणिस्तानात आश्रयास असलेली टीटीपी ही संघटना पाकिस्तान सरकारविरुद्ध वारंवार हल्ले करत असते. या संघटनेचे पाकिस्तान सरकार किंवा तेथील सरकारच्या आश्रयास असलेल्या विविध जिहादी संघटनांशी वाकडे आहे. पाकिस्तानातील पख्तुन प्रांतासह विशाल पख्तुनिस्तान बनवण्याचा तालिबान सरकारचा कट आहे असही पाकिस्तान सरकार आणि लष्कराला वाटते. यंदाच्या वर्षी जवळपास ८० हजार अफगाण निर्वासितांची पाकिस्तानने अफगाणिस्तानात पाठवणी केली. यामुळेही दोन्ही देशांमध्ये विलक्षण कटुता निर्माण झाली.
पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार?
दोन्ही देशांदरम्यान अलीकडच्या काळात इतका तीव्र संघर्ष झालेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीही झालेली नव्हती. या संघर्षात पाकिस्तानचे ५८ सैनिक आणि ९ तालिबान सैनिक मारले गेल्याचा दावा तालिबान सरकारने केला. पाकिस्तानने तो खोडून काढत, २०० तालिबान हल्लेखोरांना ठार केल्याचे म्हटले. मात्र आपले २३ सैनिक मारले गेल्याची कबुलीही दिली. पाकिस्तानने काबूलजवळ टीटीपीच्या तळांवर हवाई हल्ले केले. हे हल्ले अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग करणारे होते, या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केले, असे तालिबानने स्पष्ट केले. टीटीपी ही तालिबानचीच शाखा, पण तिने विशेषतः पाकिस्तानी लष्करी आणि निमलष्करी तळांवर सातत्याने हल्ले चालवले आहेत. तिचा बंदोबस्त करायचा, तर अफगाण सीमेवर हल्ले करण्यावाचून गत्यंतर नाही.
संघर्ष चिघळण्याची शक्यता किती?
सध्या हा संघर्ष थांबलेला दिसतो. सौदी अरेबिया आणि कतारने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मध्यस्थीचे आश्वासन दिले होते, तशी वेळ आली नाही. पण टीटीपीच्या कारवाया पाकिस्तानात सुरू राहिल्या, तर परिस्थिती पुन्हा चिघळू शकते. तालिबानला आता पाकिस्तानचा हस्तक्षेप सहन होत नाही. पाकिस्ताननेही सीमेवर कारवाई करण्यापेक्षा अफाणिस्तानच्या भूमीवर हल्ले करण्याचे धोरण अंगिकारले आहे.
भारत-अफगाण मैत्रीमुळे थयथयाट?
अफगाणिस्तानने गेल्या काही महिन्यांत भारताशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. पहलगाम हल्ल्याचा तालिबान सरकारने निषेध केला होता, तर ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा जाहीर केला होता. ही बाब पाकिस्तानी नेतृत्वाच्या नजरेतून सुटलेली नाही. सौदी अरेबिया, इराण आणि तुर्कीये हे बडे इस्लामी देश पाकिस्तानशी मैत्री वृद्धिंगत करत असताना, कंगाल आणि एके काळच्या मांडलिक अफगाणिस्तानने ठेंगा दाखवावा ही बाब पाकिस्तानला अजिबात रुचलेली नाही. तशात या देशाने भारताशी मैत्री वाढवल्यामुळे पाकिस्तानचा स्वाभाविक थयथयाट झाला.
भारत-अफगाण वि. पाकिस्तान?
अनेक विश्लेषक ही शक्यता बोलून दाखवतात. पण इतक्या खोलवर ही मैत्री जाण्याची शक्यता कमी आहे. भारताने अद्याप तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही. काबूलमध्ये दूतावास पुन्हा सुरू करणे हे त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरते. इराणमधील चाबहार बंदर भारत विकसित करत आहे. या बंदराच्या यशासाठी अफगाण भूमीतून मध्य आशियात मालवाहतूक होणे अत्यावश्यक ठरते. यासाठीच तालिबानी राजवटीच्या जुलमांकडे दुर्लक्ष करून भारताने त्या देशाशी दोस्तीचा पर्याय निवडला आहे. पण या समीकरणात पाकिस्तानचा विचार होत असेल ही शक्यता कमीच. पाकिस्तानची त्यांच्या पश्चिम सीमेवरही कोंडी करावी इतकी अफगाणिस्तानची क्षमता नाही. भारत अफगाणिस्तानकडे सामरिक नव्हे तर व्यापारी भागीदार म्हणून पाहतो.