What is the Sejjil missile : इस्रायल आणि इराण यांच्यात सशस्त्र संघर्ष सुरू होऊन आठ दिवस झाले आहेत. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागत असल्याने तेथील नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. गुरुवारी इराणने पहिल्यांदाच इस्रायलवर मध्यम पल्ल्याच्या ‘सेज्जिल’ क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने या हल्ल्याची पुष्टी केली असून ही घटना अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण, इराणकडून या क्षेपणास्त्राचा प्रत्यक्षात पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. दरम्यान, इराणचे सेज्जिल क्षेपणास्त्र किती घातक आहे? त्यामुळे इस्रायलचं किती नुकसान झालं? ते जाणून घेऊ…
१२ जून रोजी पहाटेच्या सुमारास इस्रायने इराणच्या तेहरानमधील अनेक लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. इराणमधील आण्विक तळांना प्रामुख्याने इस्रायलनं लक्ष्य केल्याचं सांगितलं जातं. त्याच दिवशी दुपारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली. इस्रायलला असणारा धोका पूर्णपणे निपटून काढल्याशिवाय हे ऑपरेशन थांबणार नाही, असा निर्धार यांनी देशाला उद्देशून केलेल्या निवेदनात व्यक्त केला. दरम्यान, इस्रायलच्या या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ३’ ही मोहिम सुरू केली आहे.
इराणचं सेज्जिल क्षेपणास्त्र किती घातक आहे?
- सेज्जिल (Sejjil) हे इराणचं अत्यंत प्रगत आणि घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते अनेक बाबतीत खूप शक्तिशाली मानलं जातं.
- शत्रू देशावर दोन टप्प्यात मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्राची रचना करण्यात आलेली आहे.
- सेज्जिल हे क्षेपणास्त्र लांब अंतरावर अधिक वेगाने आणि अचूकपणे मारा करू शकतं.
- सेज्जिल क्षेपणास्त्र पटकन लाँच करता येतं. शत्रूंवर अचानक हल्ला करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
- या क्षेपणास्त्रामध्ये सुमारे २००० किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील अनेक देश त्याच्या टप्प्यात येतात.
- ७०० किलोपर्यंत स्फोटकं घेऊन जाणाऱ्या या क्षेपणास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणण्याची क्षमता आहे.
- सेज्जिल हे क्षेपणास्त्र सुमारे १८ मीटर लांब आणि २३,६०० किलो वजनाचं असल्याचं सांगितलं जातं.
- २००८ व २००९ मध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आणि २०१२ नंतर ते इराणच्या लष्करात समाविष्ट करण्यात आलं.
आणखी वाचा : अमेरिकेने १९५३ मध्ये इराणमधील सत्ता कशी उलथवून टाकली होती? ४ दिवसांत काय घडलं होतं?
सेज्जिल क्षेपणास्त्र युद्धात निर्णायक ठरू शकतं का?
इराणचं सेज्जिल क्षेपणास्त्र इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भेदू शकलं का? हे सांगणं खूपच कठीण आहे. मात्र, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने असा दावा केलाय की, इराणच्या सेज्जिल क्षेपणास्त्रामुळे इस्रायलच्या प्रमुख शहरातील सोरोका मेडिकल सेंटल, तेल अवीव स्टॉक एक्सचेंज आणि काही निवासी इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे इस्रायलकडून मात्र सेज्जिल क्षेपणास्त्र अडवल्याचा दावा करण्यात आला असून, त्याच्या हल्ल्यात फक्त एका वाहनावर किरकोळ नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

इस्रायल आणि इराणचं युद्धात मोठं नुकसान
इराण व इस्रायलमध्ये पेटलेल्या युद्धात आत्तापर्यंत १ हजाराहून जास्त नागरिकांचा बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर १३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबरच इराणमधील तेल उत्पादनावरही युद्धाचा परिणाम झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला जाणार?
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष कमी करण्यासाठी जी-७ नेत्यांनी तयार केलेल्या संयुक्त निवेदनाच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. या निर्णयामुळे कॅनडातील अल्बर्टा येथे सुरू असलेल्या वार्षिक शिखर परिषदेत अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. रॉयटर्सच्या मते, मसुदा निवेदनासाठी युरोपियन अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यात म्हटले आहे की, इस्रायलला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार असला तरी, इराणला अण्वस्त्र विकसित करण्याची परवानगी दिली जाऊ नये.
हेही वाचा : इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर का परिणाम झाला नाही? काय आहे कारण?
इराणविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर करत इराणला इशारे देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी थेट इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार करण्यासंदर्भात विधान केलं होतं. त्यानंतर आता इराणकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. अमेरिकेने आपली फौज मध्यपूर्वेकडे वळवली आहे. ३१ हून अधिक इंधन भरणारी विमाने युरोपमध्ये पाठवण्यात आली आहेत, तसेच ‘USS Nimitz’ ही विमानवाहू युद्धनौका त्या भागात वळवण्यात आली आहे, ज्याचा उद्देश अमेरिकन तळांचे संरक्षण करणे आणि हवाई शक्ती वाढवणे असा आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण हे युद्ध जिंकूच शकत नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान रिकामे करण्यास सांगितले आहे. इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही आणि ते इस्रायलबरोबरचे युद्ध जिंकू शकत नाही, अशी पोस्ट ट्रम्प यांनी त्यांच्या ट्यूथ या सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबविण्याच्या संयुक्त निवेदनावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, इस्रायलबरोबरच्या युद्धात अमेरिका सहभागी होऊ नये यासाठी इराणने सावध पवित्रा घेतला आहे. त्यांनी अमेरिकेच्या कोणत्याही तळांवर हवाई हल्ला केला नाही. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर हल्ले करून हा संघर्ष वाढविण्याचा प्रयत्नही केलेला नाही.