अनिश पाटील

देशात २०२० मध्ये करोनाने हाहाकार माजवला असताना देशात सर्वाधिक ट्रेन्डिंग विषय ठरत होता, तो अभिनेता सुशांत सिंह याचा मृत्यू. या घटनेला ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष जाहीर केलेला नाही. सुशांतच्या मृत्यूबाबत त्यावेळी प्रसिद्धी माध्यमे, समाज माध्यमांवर रोज नवे दावेॉ-प्रतिदावे केले जात होते. मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणातील अनेक मुद्दे राजकीय ठरले. या प्रकरणाचा तपास सध्या ‘जैसे थे’ स्थितीत आहे. त्यात कोणताही ठोस निष्कर्ष तपास यंत्रणांकडून काढण्यात आलेला नाही.

सुशांत सिंहच्या मृत्यूवेळी नेमके काय घडले?

१३ जून २०२० या दिवशी रात्रीपासून ते १४ जून पहाटेपर्यंत बहुतांश काळ सुशांत त्याच्या बंद खोलीत होता. सुशांतचा नोकर दिपेश सावंत याने १३ जूनला रात्री सुशांतला जेवणाबद्दल विचारले. रात्री साडेदहाच्या सुमारास दिपेशने सुशांतच्या मोबाईलवर दूरध्वनी केला. सुशांतने दूरध्वनी उचलला नाही. सुशांत झोपला असल्याचे गृहित धरून दिपेश झोपला. त्यानंतर १४ जूनला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास स्वयंपाकी केशव डाळिंबाचा रस व नारळ पाणी घेऊन सुशांतच्या खोलीत गेला. ती त्याची आणि सुशांतची शेवटची भेट ठरली. सुशांतला जेवणासाठी काय पाहिजे ते विचारण्यासाठी केशव गेला असता सुशांतची खोली आतून बंद होती. खोलीचा दरवाजा ठोठवल्यानंतरही त्याने प्रतिसाद दिला नाही. सुशांतचा मित्र व क्रिएटिव्ह आर्ट डिझायनर सिद्धार्थ पिठानी हादेखील मृत्यूच्या दिवशी त्याच घरात होता. दिपेशने साडेदहाच्या सुमारास सिद्धार्थला सुशांतच्या खोलीचे दार बंद असल्याचे सांगितले. खूप वेळ दार उघडत नसल्याने घरात उपस्थित सिद्धार्थ, केशव, मदतनीस नीरज व दिपेश या सर्वांनीच दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. सिद्धार्थने सुशांतची बहीण मितूला दूरध्वनी करून या प्रकाराची माहिती दिली. घरात उपस्थितीत चौघांनी खोलीची दुसरी चावी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडालाही दूरध्वनी करण्यात आला. अखेर चावीवाल्याच्या मदतीने दार उघडल्यानंतर दिपेश व सिद्धार्थ सर्वप्रथम सुशांतच्या खोलीत शिरले. तेव्हा दिवे बंद होते. खिडक्यांचे पडदेही सोडलेले होते. दिवे लावल्यानंतर सुशांतने फास लावून घेतल्याचे आढळले. सिद्धार्थने सर्वप्रथम सुशांतची बहीण मितूला दूरध्वनी करून याची माहिती दिली. नीरज व केशव तोपर्यंत सुशांतच्या खोलीच्या बाहेर होते. सिद्धार्थने १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून डॉक्टर व रुग्णवाहिकेची मागणी केली. सुशांतच्या मोठ्या बहिणीचा सिद्धार्थला दूरध्वनी आला. त्यावेळी बहिणीच्या पतीने सर्वप्रथम सुशांतला खाली उतरवण्यास सांगितले, तसेच त्याचा श्वास तपासण्यास सांगितला. सुशांतला खाली उतरवून बेडवर ठेवण्यात आले. त्याच्या पाच मिनिटांनी सुशांतची बहीण मितू तेथे पोहोचली. सुशांतला शुद्धीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. काही वेळाने पोलिसही सुशांतच्या घरी पोहोचले.

सुशांत सिंह व दिशा सालीयन मृत्यूप्रकरणाचे धागेदोरे जुळलेले आहेत का?

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचे धागे दोरे दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशीही जोडले जात आहेत. दिशा सालियन ही सुशांत सिंगची व्यवस्थापक होती. सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस दिशाचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. प्रसिद्धी माध्यमांनीही हा विषय लावून धरला. दिशा सालीयनच्या शवविच्छेदन अहवालात इमारतीवरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच लैंगिक अत्याचाराचेही कोणतेही पुरावे नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. सुशांत सिंगच्या शवविच्छेदनातही हत्येचा संशय फेटाळण्यात आला आहे. दिशा सालीयनच्या मृत्यूप्रकरणी १५ जुलै २०२० रोजी मुंबई पोलिसांनी भगवती रुग्णालयाला एक प्रश्नावली पाठवली होती. त्यात लैंगिक अत्याचार झाला आहे का, तसेच हत्येबाबत काही पुरावे सापडले आहेत का, असे थेट प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर हत्या व लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे नाहीत. उंचावरून पडल्यामुळे झालेल्या सहा जखमांमुळे दिशाचा मृत्यू झाला, असे उत्तर देण्यात आले. दिशा सालीयनचे वडील सतीश सालीयन यांनी ५ ऑगस्टला मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. त्यात मुलीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याबाबतही अनेक तर्कवितर्क करण्यात आले होते. पण कोविडचे संकट असल्यामुळे सुरुवातील कोविड चाचणी करण्यात आली. दिशाला कोविड नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ११ जूनला डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आले होते.

सुशांतच्या मृत्यूपूर्वी १३ जूनला त्याच्या घरी पार्टी होती. त्यात एक युवा नेता सामील झाल्याचा दावाही करण्यात आला होता. पिठाणीच्या जबाबात त्याने सुशांतच्या घरी अशी कुठलीही पार्टी नसल्याचे सांगितले आहे. मुंबई पोलिस, सीबीआय व बिहार पोलिसांच्या तपासातही अशी कोणतीही माहिती आलेली नाही. सुशांत सिंगचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका बदलण्यात आली, असा आरोपही करण्यात येतो. पण प्रत्यक्षात सुरुवातीला आलेल्या रुग्णवाहिकेच्या स्ट्रेचर व्हील खराब झाल्यामुळे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका बोलवण्यात आली. त्यानंतर या रुग्णवाहिकेच्या पाठोपाठ प्रसिद्धी माध्यमांची वाहनेही जात होती. त्यामुळे भर रस्त्यात रुग्णवाहिका बदलण्यात आल्याचा दावाही चुकीचा असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

समाज माध्यमांद्वारे प्रकरणाचा गुंता वाढवण्यात आला का?

समाज मााध्यामांवर करण्यात आलेल्या या दाव्यामुळे सुशांत सिंगच्या मृत्यूबाबत संभ्रम आणखी वाढला. तपास मुंबई पोलिसांकडे असताना त्यांनी वेळीच माध्यमांसमोर येऊन या प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना अधिक उधाण आले. बिहार पोलिस याप्रकरणी मुंबईत दाखल झाल्यानंतर या चर्चांना अधिकच खतपाणी मिळाले. महाराष्ट्र पोलिस विरुद्ध बिहार पोलिस असे चित्रही रंगवण्यात आले. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली, असा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यासाठी बोट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती एक लाखाहून अधिक असल्याचे तपासात उघड झाले. इटली, जर्मनी, पोलंड, स्लोवेनिया, इंडोनेशिया, टर्की, थायलंड, रोमानिया व फ्रान्स येथून ही काही खात्यांवरून सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी पोस्ट करण्यात आल्या होत्या. काही पोस्ट परदेशी भाषांमध्ये करण्यात आल्या होत्या. पण जस्टीस फॉर सुशांत, सुशांत सिंग राजपुत व एसएसआर हॅशटॅगने या पोस्ट करण्यात आल्यामुळे त्या पोलिसांच्या निदर्शनात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी काय तपास केला?

सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात मुंबईत पोलिसांनी सुमारे ५६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश आहे. सुशांतने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. मृत्यूपूर्वी सुशांत स्वतःविषयीच्या ऑनलाईन बातम्या, दिशा सालियन व मानसिक आजाराबद्दल सर्वाधिक गुगल सर्च करत होता. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा तपास सुरू होता. पण समाज माध्यमांवर मात्र त्याच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही याप्रकरणी हत्येचाच संशय व्यक्त केला होता. पण याप्रकरणी सीबीआयचे विशेष पथकही चौकशी करत आहे. पण दिशा व सुशांत या दोघांच्याही मृत्यूचा तपास हा मुंबई पोलिसांच्या कागदोपत्री पुराव्यांवरच अवलंबून आहे. ईडीचाही तपास हा पूर्णपणे आर्थिक गैरव्यवहारांवर अवलंबून होता. मुंबई पोलिसांनी तपासात कमालीची गुप्तता पाळली. या प्रकरणात कोणतेही निष्कर्ष अद्याप जारी न करण्यात आल्यामुळे हे प्रकरण आजही समाज माध्यमांवर चर्चिले जात आहे.