पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. या परिस्थितीत भारतीय सैन्याची हवाई क्षमता वाढवण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम (VSHORADS) (NG) घेण्याच्या तयारीत आहे. पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ही एअर डिफेन्स सिस्टीम घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. संरक्षण मंत्रालयाने या आठवड्याच्या अखेरपर्यंत भारतीय सैन्याला नाईट व्हिजन साईट्सने सुसज्ज असलेले ४८ लाँचर्स, ८५ क्षेपणास्त्रे व एक क्षेपणास्त्र चाचणी केंद्र देण्यासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) जारी केले आहे. मात्र, VSHORADS नक्की काय आहे? त्यामुळे युद्ध क्षमतेला चालना कशी मिळणार? त्याविषयी जाणून घेऊयात.

VSHORADS काय आहे?

VSHORAD म्हणजे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. त्याला सामान्यतः मॅन-पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम (मॅनपॅड्स) असेही म्हणतात. VSHORADS ही एक हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी कमी उंचीवरील हवेतील लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे. ही संरक्षण प्रणाली इन्फ्रा-रेड होमिंग (आयआर) तंत्रज्ञानावर काम करते. ‘द वीक’नुसार, VSHORADS मध्ये तीन भाग असतात, ज्यात प्रोजेक्टाइल, लाँच ट्यूब व ग्रिप आणि एक बॅटरी युनिटचा समावेश असतो. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे एखाद्या संयत्रातून डागण्याची आवश्यकता नाही, तर ही क्षेपणास्त्रे एखादा सैनिक खाद्यांवरूनही डागत हवेतील लक्ष्यावर मारा करू शकतो. या क्षेपणास्त्राची किमान श्रेणी सुमारे अर्धा किलोमीटर आहे.

VSHORAD म्हणजे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, हे क्षेपणास्त्र सहा किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूची विमाने, ड्रोन, लढाऊ विमाने व हेलिकॉप्टरवर मारा करू शकते. तज्ज्ञ सांगतात की कमी पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी कोणतीही शस्त्र प्रणाली यापेक्षा योग्य असू शकत नाही. ‘आउटलेट’नुसार, अफगाणिस्तानवरील आक्रमणादरम्यान अमेरिकन सैन्याविरुद्ध या प्रणालींचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता. एका सेवारत अधिकाऱ्याने ‘द वीक’ला सांगितले, हे एक सिंगल शॉट क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रांद्वारे करण्यात येणारे ९५ टक्के हल्ले यशस्वी ठरतात.

त्यांनी पुढे सांगितले, “मॅनपॅड्सचा आणखी एक फायदादेखील आहे की, ते कुठूनही डागले जाऊ शकतात. डोंगरमाथा असो, वाहने असो अगदी कुठूनही हे क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते.” ‘आयडीआरडब्ल्यू’च्या मते, युक्रेनमध्ये ड्रोन आणि हेलिकॉप्टरविरुद्धही या प्रणालीचा वापर करण्यात आला होता. जगभरात १०५ देशांतील सैन्य हे शस्त्र वापरतात. मात्र, भारतासह केवळ १२ देश या शस्त्राची निर्मिती करतात. VSHORADS प्रमाणे अमेरिकेची ‘स्टिंगर’ क्षेपणास्त्र प्रणाली आणि रशियाची ‘9K32 स्ट्रेला-२’ क्षेपणास्त्र प्रणालीदेखील कार्यक्षम आहे . चीनने स्वतःची ‘FN-16’ प्रणालीदेखील विकसित केली आहे. तसेच, रशियाकडे ‘IGLA-S’, स्वीडनकडे ‘RBS70NG’ व फ्रान्सकडे ‘MBDA’ मिस्ट्रल प्रणाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ)देखील VSHORADS वर काम करीत आहे.

फेब्रुवारीमध्ये ‘डीआरडीओ’ने ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून VSHORADS च्या सलग तीन यशस्वी चाचण्या घेतल्या होत्या. या चाचण्या अतिशय कमी उंचीवर उडणाऱ्या हाय-स्पीड लक्ष्यांवर घेण्यात आल्या, असे संरक्षण मंत्रालयाने त्यावेळी आपल्या निवेदनात म्हटले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, भारतात विकसित करण्यात येणारी ही प्रणाली अजूनही विकासाच्या प्रक्रियेत आहे. भारताने यापूर्वी रशियाकडून ‘IGLA-S’ प्रणाली मागवली होती. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी ‘IGLA-S’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा नवीन पुरवठा भारतीय लष्कराला करण्यात आला आहे. आता सीमेवरील शत्रूची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर व ड्रोन यांचा धोका लक्षात घेता, ही प्रणाली पुढील तुकड्यांना पुरवली जात आहे.

भारतीय लष्कराकडून हे पाऊल उचलण्याचे कारण काय?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर वाढता तणाव आणि पाकिस्तानच्या कुरापती बघता, भारतीय लष्कर हे पाऊल उचलत आहे. भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “लष्कराला हवाई धोक्याला तोंड देण्यासाठी इन्फ्रा-रेड होमिंग तंत्रज्ञानावर आधारित फायर-अँड-फॉरगेट VSHORADS-NG ची आवश्यकता आहे. पर्वतीय भागातून शत्रुपक्षाचे हवेतील लक्ष्य भेदणे हे VSHORAD क्षेपणास्त्र प्रणालीमुळे सोपे होणार आहे.

‘ऑपरेशनल कॅरॅक्टिरिस्टिक्स अँड फीचर’ नावाच्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी)च्या एका कागदपत्रात म्हटले आहे, “विकसित होत असलेल्या हवाई धोक्याला तोंड देण्यासाठी आर्मी एअर डिफेन्सला प्रभावी टर्मिनल आणि पॉइंट डिफेन्स करीत व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स (VSHORADS) मॅनपोर्टेबल मिसाइल सिस्टीमची आवश्यकता आहे. या सिस्टीममध्ये मॅनपोर्टेबल लाँचिंग मेकॅनिझम, तसेच दिवसा व रात्री दोन्ही वेळी लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी योग्य प्रणालीचा समावेश असावा,” असेही त्यात म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र म्हणजे कोणत्याही हवाई धोक्याला तोंड देण्यासाठी लष्कराच्या हवाई-संरक्षण क्षमतांना बळकटी देण्याचा एक प्रयत्न आहे.

रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी)च्या एका निवेदनात असेही म्हटले आहे, “VSHORADS (NG) चा वापर तिन्ही सेवांद्वारे सर्व प्रकारच्या विमाने, हेलिकॉप्टर आणि यूएएस विरुद्ध टर्मिनल अँड पॉइंट डिफेन्स सिस्टीम म्हणून केला जाईल”. ही प्रणाली उंचावरील क्षेत्रे, मैदाने, वाळवंट, किनारी क्षेत्रे व सागरी क्षेत्रासह सर्व भूभागांवर वापरण्याचा प्रस्ताव आहे. VSHORADS (NG) प्रणाली बर्फाच्छादित ठिकाणांसह सर्व हवामान परिस्थितीत, दिवसा व रात्री हवाई लक्ष्यांवर लक्ष ठेवण्यास आणि कार्य करण्यास सक्षम असावी,” असेही निवेदनात म्हटले आहे. दिवस, रात्र, वादळ, पाऊस असो किंवा बर्फाच्छादित प्रदेश असो; ही प्रणाली तेथील हवाई लक्ष्ये नष्ट करण्यास सक्षम असेल. याचा वेग ध्वनीच्या दीड पट म्हणजे १.५ मॅक एवढा असेल, असाही अंदाज आहे.