What is Zoho Indian Platform : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना संबोधित करताना जीएसटीमधील फेरबदलाची माहिती दिली. आपल्या भाषणातून त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संदेश दिला. परदेशी वस्तू टाळून शक्य तितक्या प्रमाणात स्वदेशी वस्तूंचा वापर करा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. त्यांच्या या आवाहनाला केंद्रीय रेल्वे तथा माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिसाद दिला. सोमवारी त्यांनी अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपण ‘झोहो’ हा स्वदेशी प्लॅटफॉर्म (व्यासपीठ) वापरण्यास सुरुवात केल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. नेमका काय आहे हा प्लॅटफॉर्म आणि त्याचा वापर नेमका कशासाठी केला जाणार? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…

आश्विनी वैष्णव यांनी काय सांगितले?

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमधून झोहो या स्वदेशी प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली. “मी झोहो हा प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाची कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि कोणत्याही कामाच्या सादरीकरणासाठी या व्यासपीठाचा वापर केला जाणार आहे. झोहो हे स्वदेशी व्यासपीठ असून, मी सर्वांना त्याचा वापर करण्याचे आवाहन करतो. स्वदेशी उत्पादने आणि सेवा स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी मोहिमेत आपण सामील व्हायला हवे”, असे मंत्री वैष्णव आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

रेल्वेमंत्र्यांनी इतरांनाही हा स्वदेशी प्लॅटफॉर्म वापरण्याचा सल्ला दिला आहे. “आपण स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवल्यामुळे भारत आत्मनिर्भर होईल. तसेच, अशा प्लॅटफॉर्मचा वापर केल्याने जागतिक व्यासपीठावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची नवी ओळख निर्माण होईल,” असेही ते म्हणाले. गेल्या काही आठवड्यांपासून केंद्र सरकार तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भरतेला प्राधान्य देत आहे. भारतीय बनावटीचे सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन्स व हार्डवेअर विकसित करण्यावर आणि त्यांच्या वापराला चालना देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. वैष्णव यांचे हे पाऊल याच धोरणाचा एक भाग मानले जात आहे.

आणखी वाचा : Palestinian State : भारतानं ४७ वर्षांपूर्वी घेतलेली भूमिका आता युरोपला पटतेय! इस्रायल-पॅलेस्टाइन प्रकरणी काय असू शकतो मार्ग?

झोहो काय आहे? त्याचे संस्थापक कोण?

झोहो हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे तुम्ही सर्व महत्त्वाची कामे करू शकता. महत्वाची कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि कोणत्याही कामाच्या सादरीकरणासाठी या व्यासपीठाचा वापर करता येतो. भारतीय उद्योजक श्रीधर वेम्बू आणि टोनी थॉमस यांनी १९९६ मध्ये स्थापन केलेली ‘Zoho Corporation’ ही एक सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिस (SaaS) कंपनी आहे. चेन्नई शहरात या कंपनीचे मुख्यालय असून, कंपनीकडून व्यवसायांसाठी ५५ हून अधिक क्लाऊड-आधारित साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-मेल, लेखापाल (अकाउंटिंग), मानव संसाधन (एचआर), प्रकल्प व्यवस्थापन, ग्राहक व्यवस्थापन (सीआरएम) यांसारख्या सेवा झोहो कंपनीकडून दिल्या जातात.

झोहोचा वापर नेमका कशासाठी केला जातो?

कंपनीची नोंदणी अमेरिकेत केली गेली असली तरीही ‘झोहो’ नेहमीच ‘मेड इन इंडिया’ या संकल्पनेशी बांधील राहिली आहे. तिचे प्रमुख काम तमिळनाडूच्या ग्रामीण भागातून चालवले जाते. विशेष बाब म्हणजे जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये झोहो कंपनीच्या व्यासपीठाचा वापर केला जातो. जवळपास १० कोटींपेक्षा अधिक लोक ‘झोहो‘चे वापरकर्ते आहेत, ज्यामध्ये स्टार्टअप्सपासून ते फॉर्च्युन अशा ५०० कंपन्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. झोहो कंपनीकडून Zoho Workplace आणि Zoho Office Suite या पॅकेजच्या अंतर्गत अनेक उत्पादकता साधनदेखील पुरवली जातात. त्यापैकी अनेक साधने स्वतंत्र ॲप्लिकेशन्स म्हणूनही उपलब्ध आहेत आणि ती थेट Microsoft Office 365 आणि Google Workspace यासारख्या कंपन्यांशी थेटपणे स्पर्धा करतात.

झोहोमधील कोणकोणती अ‍ॅप लोकप्रिय?

‘झोहो‘च्या लोकप्रिय ॲप्समध्ये Zoho Writer, Zoho Sheet, Zoho Show, Zoho Notebook, Zoho WorkDrive, Zoho Mail, Zoho Meeting व Zoho Calendar यांचा समावेश होतो. या प्लॅटफॉर्मचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते जाहिरातींवर अवलंबून नाहीत. वापरकर्त्यांचा डेटा आणि त्याची गोपनीयता सुरक्षित ठेवण्याला ‘झोहो‘ प्राधान्य देते. नियामक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आपला डेटा या कंपनीकडून विविध भौगोलिक ठिकाणी साठवून ठेवला जातो. मायक्रोसॉफ्ट आणि गूगलच्या तुलनेत Zoho Workspace ची पॅकेजेस अत्यंत स्वस्त आहेत. याच कारणांमुळे भारतासह परदेशातील लहान आणि मध्यम उद्योगांमध्ये या कंपनीचा मोठा ग्राहकवर्ग निर्माण झाला आहे.

हेही वाचा : चीन-पाकिस्तानला मोठा दणका, अमेरिकेने घेतला ‘त्या’ प्रस्तावावर आक्षेप; आता पुढे काय?

झोहोच्या संस्थापकांनी मानले मंत्री वैष्णव यांचे आभार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील नागरिकांना झोहो प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करीत त्यांचे आभार मानले आहेत. “रेल्वेमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कंपनीतील अभियंत्यांचे मनोबल वाढेल. गेल्या दोन दशकांपासून आमच्या कंपनीतील अभियंते खूप कष्ट घेत असून, वेगवेगळी उत्पादने विकसित करीत आहेत. आज त्यांच्या कामाचे कौतुक झाले आहे. तुम्हाला (रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव) व देशाला अभिमान वाटेल, असे काम आम्ही यापुढेही करीत राहू”, असे श्रीधर वेम्बू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘एक्स’ला पर्याय म्हणून आणलेल्या कू-अ‍ॅपचे काय झाले?

२०२१ मध्ये भारतात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरून केंद्र सरकार आणि त्या वेळच्या ट्विटर (आताचे एक्स) या प्लॅटफॉर्ममध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता ट्विटरला पर्याय म्हणून मेड इन इंडिया ‘KOO’ हे स्वदेशी अ‍ॅप चर्चेत आले होते. त्या वेळीही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरला स्वदेशी पर्याय म्हणून Koo अ‍ॅपचा वापर सुरू केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात Koo अ‍ॅपचा उल्लेख केला होता. त्यावेळी भारतातील अनेकांनी या अॅपला प्रतिसाद दिला. मात्र, २०२४ मध्ये ‘कू’चे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयांक बिदावतका यांनी हे अॅप सार्वजनिकरीत्या बंद करण्याची घोषणा केली. “आम्ही २०२२ मध्ये ट्विटरला मागे टाकण्याच्या अगदी जवळ होतो आणि अल्पावधीत आम्ही ते ध्येय साध्यही केले असते; मात्र त्यासाठी पुरेसे भांडवल आम्हाला मिळू शकले नाही,” असे ते म्हणाले होते.