Advertisements on Whatsapp: फेसबुक, अर्थात मेटाने व्हॉट्सॲपला विकत घेतल्यानंतर बऱ्याच काळाने व्हॉट्सॲपमध्ये एक महत्त्वाचा बदल दिसून येणार आहे. इतर ॲप्सवर जाहिरातींचा होणारा भडिमार आतापर्यंत व्हॉट्सॲपवर कधीच झाला नव्हता. मात्र, आता जाहिरातींविषयी क्लिअर इंटरफेस राखणारा हा प्लॅटफॉर्म आता जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार आहे. सोमवारी या बदलाबाबत मेटाने माहिती देताना सांगितले की, आता व्हॉट्सॲपवर प्रचारात्मक कंटेंट दाखवला जाईल. हा ॲपमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असणार आहे. हा बदल खाजगी संवादांमध्ये कुठलेही बदल घडवणार नाही. उलट जाहिराती ॲपच्या एका विशिष्ट भागापुरत्या मर्यादित असतील.

व्हॉट्सॲपच्या खाजगी संवादाच्या मुख्य कार्यात व्यत्यय न आणता कंपनीसाठी महसूल निर्माण करणाऱ्या वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी व्हॉट्सॲप हे योग्य ठिकाण आहे असे मत मेटाने यावर व्यक्त केले आहे. “आम्ही वर्षानुवर्षे असा व्यवसाय तयार करण्याच्या आमच्या योजनांबाबत बोलत आहोत. हा बदल अमलात आणल्यावर तुमच्या वैयक्तिक संवादात काहीच व्यत्यय येणार नाही. आम्हाला विश्वास आहे की, हा बदल करण्याचा विचार आम्ही ज्या डिव्हाईससाठी करत आहोत तो योग्य आहे”, असे मेटाकडून त्यांच्या घोषणेत सांगण्यात आले. यामुळे मेटामधील वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अंतर्गत वादविवादांचा शेवट झाला आणि व्हॉट्सॲपच्या निर्मात्यांनी मांडलेल्या मूळ दृष्टिकोनाला पूर्णपणे बदलण्यात आले आहे.

वापरकर्त्यांना चॅट, ग्रुप किंवा कॉलमध्ये कोणतीही जाहिरात दिसणार नाही, त्यामुळे तुम्ही कॉलवर बोलत असाल, चॅट करत असाल तर काहीच फरक पडणार नाही. मात्र, जर तुम्ही चॅनेल आणि स्टेटसचे फीचर वापरत असाल तर काहीसा फरक पडू शकतो. चॅनेल आणि स्टेटस अपडेट अशा टॅबमध्ये जाहिराती दाखवण्याचे नियोजन मेटाने केले आहे. जगभरातून दररोज १.५ अब्ज लोक या टॅबमध्ये जातात. मेटाने दिलेल्या माहितीप्रमाणे वापरकर्त्यांच्या नियमित स्टेटस अपडेट्समध्ये प्रमोशनल कंटेंट दिसेल, त्यामुळे व्यवसाय खाजगी चॅटमध्ये व्यत्यय न आणता प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. यापैकी काही स्टेटस जाहिरातींवर क्लिक केल्यानंतर जाहिरात दाखवलेल्या संबंधित ब्रँडची थेट चॅट विंडो उघडेल आणि त्यामुळे संबंधित ब्रँडची त्वरित माहितीही मिळेल.

याव्यतिरिक्त अपडेट्समध्ये चॅनेलही समाविष्ट आहेत. चॅनेलची सुरुवात २०२३ च्या मध्यात केली होती. व्हॉट्सॲप चॅनेलचा वापर एखादी व्यक्ती, मीडिया संस्था आणि ब्रँड फॉलोअर्सना माहिती प्रसारित करण्यासाठी वापरतात. पैसे कमावण्याचा एक भाग म्हणून या चॅनेलना आता सशुल्क जाहिरातींद्वारे वाढवता येते, जेणेकरून ते शोधले जातील आणि अनेक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतील. ॲप चॅनेलमध्ये सबस्क्रिप्शनही देईल, त्यामुळे चॅनलचे ॲडमिन पैसे देऊन सबस्क्राईब केलेल्या चॅनेलच्या वापरकर्त्यांना विविध अपडेट्स शेअर करता येतील. ही सेवा सध्या मेटाच्या कमिशनपासून दूर असली तरी कंपनी भविष्यात सबस्क्रिप्शन फीच्या १० टक्के घेण्याची योजना आखत आहे. हे शुल्क गूगल किंवा ॲपलच्या ॲप स्टोअर्सकडून कोणत्याही प्लॅटफॉर्म फीच्या व्यतिरिक्त असेल.

व्हॉट्सअ‍ॅपचा जाहिरातींना विरोध

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मूळ उद्देशामुळे जाहिरातींना विरोध
  • सह-संस्थापक जॅन कौम आणि ब्रायन अ‍ॅक्टन यांनी जाहिरातींना ठामपणे विरोध केला
  • वापरकर्त्याचा अ‍ॅपबद्दलचा अनुभव आणि विश्वासार्हता धोक्यात येईल हे विरोध करण्यामागचं कारण
  • जाहिरांतीमधून उत्पन्न घेण्याला विरोध केल्यामुळे मेटा सोडले
  • जाहिरांतींचा समावेश झाल्यावर वापरकर्ते एक उत्पादन ठरतात असं मत जॅन कौम यांनी व्यक्त केलं होतं
  • २०१४ मध्ये मेटाने १९ अब्ज डॉलर्सला व्हॉट्सअ‍ॅपचे अधिग्रहण केले
  • मेटाकडे अधिकार गेल्यावर वापरकर्त्यांच्या आणि गोपनीयतेच्या विश्वासार्हतेबाबत चिंता
  • मेटा व्हॉट्सअ‍ॅपचे व्यावसायिकीकरण करणार असा अंदाज
  • ११ वर्षांनंतर हे व्यावसायिकीकरण प्रत्यक्षात आले

हे वापरकर्त्यांच्या अनुभवात कसा बदल घडवेल?

संबंधित जाहिराती देण्यासाठी वापरकर्त्याची कमीत कमी माहिती वापरली जाईल असं मेटाने म्हटलं आहे.चॅट किंवा कॉलिंगच्या फीचरमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र, तुम्ही बातम्या, मनोरंजन किंवा सार्वजनिक अपडेटसाठी व्हॉट्सॲप वापरतात, त्यांच्यासाठी ॲपमधील अनुभव थोडा बदलणार आहे. आता स्टेटस आणि चॅनेलमध्ये जाहिराती आल्याने जाहिरातविना हे अपडेट वापरणाऱ्यांसाठी हा नवीन अनुभव असणार आहे.

जे लोक स्वेच्छेने मेटाच्या अकाउंट्स सेंटरशी व्हॉट्सॲप लिंक करतात, त्यांच्या अकाउंट्समधील माहिती वापरून जाहिराती दाखवल्या जातील, तसंच त्यांच्या पसंतीला प्राधान्य दिले जाईल असे मेटाने स्पष्ट केले आहे. तसंच एन्क्रिप्टेड संवादांमध्ये काहीही बदल होणार नसल्याचेही मेटाने स्पष्ट केले आहे.

जाहिरातांसाठी डेटावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने खाजगी चॅट्स, व्हॉइस कॉल्स, ग्रुप मेसेज आणि मेसेज कंटेंटमध्ये अजिबात हस्तक्षेप केला जाणार नाही. मेटाने वापरकर्त्यांना आश्वासन दिले आहे की कोणत्याही परिस्थितीत फोन नंबर जाहिरातदारांना विकले जाणार नाहीत किंवा शेअर केले जाणार नाहीत. जाहिरात आणि खाजगी संदेश हे दोन्ही रीतसर वेगळे ठेवण्यात आले आहेत आणि याची खात्रीही मेटाने दिली आहे. हे नवीन फीचर तुमच्या वैयक्तिक चॅट्सशी संबंधित नसेल तर ते फक्त अपडेट टॅबवर दिसतील, असे मेटाने सांगितले आहे.

व्हॉट्सॲपवर जाहिरातींची सुरुवात करणे हे मेटाच्या प्लॅटफॉर्मचे अधिक प्रभावीपणे पैसे कमावण्याचे ध्येय आहे. मेटाचे इतर ॲप्स बऱ्याच काळापासून व्यवसाय साधने आणि जाहिरात प्रणालींशी एकत्रित करण्यात आले आहेत. मात्र, व्हॉट्सॲप हा त्यांचा सर्वात मोठा डेटाबेस असूनही जाहिरातींसाठी त्याचा वापर फारच कमी केला गेला. मेटाला याआधी फेसबुक इन्स्टाग्रामवर क्लिक टू मेसेज जाहिरातींबाबत चांगले यश मिळाले आहे. म्हणजेच व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तर देतच होते, पण आता अपडेट टॅबमध्ये जाहिरातीदेखील दाखवेल. नवीन जाहिराती रोलआउटमुळे आता गुंतवणुकीला थेट व्हॉट्सॲपमध्येच सुरुवात करता येईल.

व्हॉट्सअॅपवरही आता जाहिराती दिसणार, युजर्सवर कसा होणार परिणाम?

सीएनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्गने व्यवसाय आणि ग्राहकांमधील मेसेजिंगला मेटाच्या व्यावसायिक धोरणाचा पुढील आधारस्तंभ म्हणून वर्णन केले आहे. व्हॉट्सॲप दर महिन्याला तीन अब्जाहून अधिक वापरकर्त्यांना सेवा देते. त्यामध्ये अमेरिकेतील १०० दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांचा समावेश आहे. तसंच ॲपची व्यवसाय क्षमताही वेगाने वाढत आहे. मेटाने आतापर्यंत व्हॉट्सॲपच्या कमाईचे आकडे उघड केलेल नाही, मात्र विश्लेषकांच्या अंदाजानुसार, त्यांचे दरवर्षी ५०० दशलक्ष ते १ अब्ज डॉलर्स इतके उत्पन्न आहे. जाहिराती आणि सबस्क्रिप्शनची भर पडल्याने व्हॉट्सॲप फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणेच जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा पाया ठरेल.

सशुल्क चॅनेल आणि सबस्क्रिप्शन

व्हॉट्सॲप आता कंटेंट क्रिएटर्स आणि ब्रँड्सना उत्पन्नवाढीच्या संधी देणार आहे. विशिष्ट चॅनेल्सना विशेष अपडेट्ससाठी सबस्क्राइब करू शकतील. यासाठी दरमहा एक निश्चित रक्कम द्यावी लागेल, त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या आवडीच्या चॅनेलशी कनेक्टेड राहण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत. तसंच काही चॅनेल्सना अधिकाधिक लोकांनी फॉलो करावे, त्यासाठी त्यांना प्रमोटही केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.