-अनिकेत साठे

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी हवाई दलाचे चित्ता हेलिकॉप्टर पुन्हा अपघातग्रस्त होऊन वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव हे शहीद झाले. अपघातात या मेजर हुद्द्याचा सहवैमानिक गंभीररित्या जखमी झाला. सैन्यदलाच्या ताफ्यातील चित्ता आणि चेतक या जुनाट हेलिकॉप्टरच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यात आजवर अनेक लष्करी अधिकाऱ्यांना, जवानांना प्राण गमवावे लागले. असे असूनही तंत्रज्ञानदृष्ट्या कालबाह्य झालेली आणि आयुर्मान संपुष्टात आलेली ही हेलिकॉप्टर कधी बदलणार, हा प्रश्न मात्र तितक्याशा गांभीर्याने हाताळला जात नसल्याचे चित्र आहे.

नेमके काय घडले?

चीनलगतच्या सीमेवर नियमित उड्डाणादरम्यान संबंधित चित्ता हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. त्यात शहीद झालेले वैमानिक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव हे प्रशिक्षक होते. म्हणजे त्यांच्याकडे हवाई उड्डाणाचा दीर्घ अनुभव होता. अशा प्रशिक्षकांमार्फत लष्करातील भावी वैमानिक घडवले जातात. हवाई उड्डाणाचा कालावधी जसा वृद्धिंगत होतो, तसे ते सारथ्यात कुशल, निपुण होत जातात. त्यांची हेलिकॉप्टरवरील पकड अधिक मजबूत व विश्वासार्ह असते. मानवी चुकांचा फारसा संभव नसतो. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी लष्कराने चौकशी समिती गठीत केली आहे.

अपघातांची मालिका कशी?

मागील पाच वर्षांत विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात सैन्यदलातील ४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. लष्करी हवाई दलाची वर्षाकाठी दोन ते तीन हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होतात. पाच वर्षांत लष्कर व हवाई दलाच्या १५ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. २०१०मध्ये अपघातांची संख्या नऊवर पोहोचली होती. २०११ ते एप्रिल २०१७ या काळात ४८ विमाने व २१ हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाली. त्यात ७९ जणांचा मृत्यू झाला. अतिउंच सीमावर्ती भागात मुख्यत्वे चित्ता आणि चेतक या हेलिकॉप्टरचा वापर होत आहे. सीमावर्ती भागात दळणवळण, पुरवठा व्यवस्था व टेहेळणी आदींची जबाबदारी त्यांच्यामार्फत पार पाडली जाते.

हेलिकॉप्टरची स्थिती काय?

लष्कराकडील चित्ता आणि चेतक ही दोन्ही हेलिकॉप्टर तब्बल पाच दशके जुनी आहेत. त्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे. आधुनिक हेलिकॉप्टर दाखल होत नसल्याने लष्कराला त्यांचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते. लष्कराच्या ताफ्यात सुमारे २०० चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर आहेत. त्यांच्या इंजिनची आजवर कित्येकदा संपूर्ण दुरुस्ती (ओव्हरहॉल) केली गेली. त्यांचे सुटे भाग मिळत नाहीत. देखभाल-दुरुस्ती करणे अवघड झाल्यामुळे त्यांच्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. चित्ता आणि चेतक ही एक इंजिन असणारी हेलिकॉप्टर आहेत. तंत्रज्ञानदृष्ट्या ती आता कालबाह्य ठरतात. प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानतेवेळी वैमानिकाला सतर्क करण्यास ती असमर्थ ठरतात. दिशादर्शक, संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना या सध्याच्या हेलिकॉप्टरमधील आधुनिक उपकरणांपासून ती बरीच दूर आहेत.

जुनाट लष्करी सामग्री विरोधात अधिकाऱ्यांच्या पत्नींचा संघर्ष कसा?

२०१४ साली बरेली येथे लष्कराच्या हवाई दलाचे चित्ता हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन त्यात दोन वैमानिकांसह तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी लष्करातील जुनाट, कालबाह्य सदोष सामग्रीचा वापर तातडीने थांबवून अधिकारी व जवानांचे प्राण वाचविण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने संरक्षण मंत्रालयाला साकडे घातले होते. संघटनेच्या प्रमुख ॲड. मिनल भोसले-वाघ यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची दिल्लीत भेट घेऊन आयुर्मान संपुष्टात आलेल्या धोकादायक हेलिकॉप्टरची स्थिती मांडली होती. चित्ता आणि चेतकच्या जागी लवकरच नवीन अत्याधुनिक हेलिकॉप्टर दाखल होतील, असे आश्वासन दिले गेले होते. परंतु, त्याची अद्याप पूर्तता झाली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मध्यंतरी सियाचिन भागात वापरल्या जाणाऱ्या काही चित्ता हेलिकॉप्टरचे इंजिन बदलले गेले. ती चितल या नावाने ओळखली जातात. उर्वरित हेलिकॉप्टर आजही जुन्या इंजिनवर आकाशात झेपावत आहेत. या संदर्भात लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा गट आता पंतप्रधानांना साकडे  घालणार आहे. 

सरकारचे नियोजन काय?

अपघातांच्या फेऱ्यात सापडलेल्या चित्ता आणि चेतकची जागा रशियन बनावटीच्या कामोव्ह-२२६ हेलिकॉप्टरला देण्यात येणार आहे. दोन इंजिनचे हे हेलिकॉप्टर आहे. मेक इन इंडिया अंतर्गत त्यांची देशांतर्गत बांधणी केली जाईल. २०० कामोव्ह हेलिकॉप्टरचा रशियाशी करार झाला आहे. त्यातील १३५ लष्कराला तर उर्वरित ६५ हवाई दलास मिळणार आहेत. परंतु, त्यांच्या उत्पादनाला अजून मुहूर्त लाभलेला नाही. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टर (एलसीएच) बांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यातून लष्कराला १२६ आणि हवाई दलास ६१ हेलिकॉप्टर देण्याचे नियोजन आहे.