-सुशांत मोरे
मुंबई महानगरातील लोकसंख्या गेल्या काही दशकांत झपाट्याने वाढली. परराज्यातून मुंबईत स्थलांतर वाढत गेले. त्याचा भार थेट महानगरातील मेल, एक्स्प्रेस गाड्यांवरही येऊ लागला. बाहेरगावी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आणि त्याची संख्या वाढवण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसवरून  (एलटीटी) गेल्या काही वर्षांत नियमित धावणाऱ्या आणि विशेष गाड्याची संख्या वाढवण्यात आली. आता या टर्मिनसची क्षमताही कमी पडू लागली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल टर्मिनसचा पर्याय शोधाला आहे. तर परळ टर्मिनस मात्र रखडले आहे. पनवेल टर्मिनसला अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या सुरू असून २०२३मध्ये आणखी काही मेल, एक्स्प्रेस येथून सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सीएसएमटी, एलटीटीवर मेल, एक्स्प्रेसवर भार किती?

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
lawrence bishnoi gang, dadar station
दादर रेल्वे स्थानकावर लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड, पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सीएसएमटी, एलटीटी ही सर्वांत मोठी टर्मिनस आहेत. सीएसएमटीत सध्या १८ फलाट असून यामध्ये सात फलाट उपनगरीय रेल्वेसाठी तर उर्वरित फलाट हे मेल, एक्स्प्रेससाठी आहेत. या टर्मिनसमधील १५ ते १८ क्रमांच्या फलाटातून २२ आणि २४ डब्यांच्या गाड्या, तर उर्वरित फलाटातून १६ आणि १८ डब्यांच्या गाड्या सोडल्या जातात. सीएसएमटीतून दररोज ४३ मेल, एक्स्प्रेस सुटतात. एलटीटीमध्येही सहा फलाट असून १८ ते २४ डब्यांच्या दररोज २५ मेल, एक्स्प्रेस सोडण्यात येतात. दादर स्थानकातही असलेल्या एका फलाटातून दररोज ५ गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. येथून १८ डब्यांपर्यंतच्या मेल, एक्स्प्रेस सोडण्यात येतात. सीएसएमटी आणि एलटीटीची गाडी क्षमता जवळपास संपुष्टात आली आहे. या दररोज धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त सणासुदीत विशेष गाड्याही सोडल्या जातात. त्यामुळे दोन्ही टर्मिनसवर भार वाढला आहे.

सीएसएमटी टर्मिनसची क्षमता वाढणार?

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने सीएसएमटीतील मेल, एक्स्प्रेसच्या चार फलाटांच्या विस्ताराचेही काम सुरू केले आहे. काही मेल, एक्स्प्रेस या २४ डब्यांच्या आहेत. त्यामुळे २४ डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटाचा विस्तार करण्याचे काम हाती घेतले आहे. या टर्मिनसमधील १० ते १३ क्रमांकाच्या फलाटात सध्या १६ ते १८ डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. त्यामुळे २४ डब्यांच्या गाड्यांसाठी या चार फलाटांचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विस्तारीकरण पूर्ण होताच चार फलाटांवर दररोज २४ डब्यांच्या दहा गाड्यांच्या फेऱ्या होतील. त्यामुळे प्रवासी क्षमताही वाढणार आहे. मार्च २०२३पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

पनवेल टर्मिनसचा पर्याय का?

सीएसएमटी, एलटीटीवर मेल, एक्स्प्रेसचा भार वाढत आहे. त्यातच अनेक गाड्या दादर, एलटीटीपर्यंत येताच रिकाम्या होतात.  सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या फारच कमी असते. शिवाय दररोज मोठ्या प्रमाणात मेल, एक्स्प्रेसची सीएसएमटीपर्यंत ये-जा असल्याने काही वेळा लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आणि सीएसएमटी, एलटीटीवरील भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने पनवेल टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत टर्मिनसचे सरासरी ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे टर्मिनस डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून २०२३ पासून पनवेल टर्मिनसमधून गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २४ डब्यांसह भविष्यात २६ डब्यांच्याही गाड्या सोडता येतील, अशी फलाट उभारणी केली जात आहे. यासह अनेक सुविधांची भर पडेल.

पनवेल टर्मिनसमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा?

सध्या पनवेलमध्ये लोकलसाठी चार फलाट असून चार फलाट मेल, एक्स्प्रेससाठी आहेत. या टर्मिनसमधूनही कोकण, उत्तर भारतासाठी मेल, एक्स्प्रेस सुटतात. दररोज पाच गाड्या पनवेलमधून सोडण्यात येतात.

याव्यतिरिक्त विशेष गाड्या तसेच आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस सुटणाऱ्या गाड्याही असतात. त्यामुळे या स्थानकाला लागूनच पनवेल टर्मिनसची उभारणी केली जात आहे. नवीन टर्मिनसमुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यात खासकरून कोकणात जाणाऱ्या गाड्या वाढवण्याचे नियोजन आहे. मुंबई ते कोकणातील जिल्ह्यांदरम्यान दररोज २० गाड्या धावतात. पनवेल टर्मिनस होताच आणखी नवीन दहा गाड्यांची भर पडणार आहे. सध्या पनवेल येथे नवीन फलाटांची ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नवीन टर्मिनसमधून २४ डब्यांच्या गाड्या सोडण्याचा विचार आहे.

परळ टर्मिनस का रखडले?

सीएसएमटी, एलटीटीवरील मेल, एक्स्प्रेस गाड्यांचा भार हलका करण्यासाठी मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेच्या परिसरातच मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी आणखी एक टर्मिनस उभारण्याचे नियोजन आहे. डिसेंबर २०२० पूर्वी करोनाकाळात याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यानंतर रेल्वे बोर्डाने यात काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. बदल करून नव्याने ऑगस्ट २०२१ मध्ये अहवाल पाठवण्यात आला. परंतु त्याचाही विचार झाला नाही. या टर्मिनसला परळ कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. टर्मिनस झाल्यास कर्मचाऱ्यांना अन्यत्र स्थलांतरित केले जाणार आहे. प्रस्तावानुसार, मेल-एक्स्प्रेस टर्मिनससाठी पाच फलाट, त्याच्या जवळच गाड्या उभ्या करण्यासाठी आणखी पाच स्टेबलिंग मार्गिका, तर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची व्यवस्थित पाहणी करून त्यात काही तांत्रिक दुरुस्ती करता यावी, यासाठी पाच पिट लाईनचे नियोजन आहे. हे टर्मिनस झाल्यास २४ डब्यांच्या, लांब पल्ल्याच्या ५० मेल-एक्स्प्रेस चालवण्याची योजना आहे. परंतु या टर्मिनसची मंजुरीची प्रक्रियाच रखडल्याने आता पनवेल टर्मिनसची प्रतीक्षा आहे.