अवर वर्ल्ड इन डेटा (Our World in Data) या विज्ञान प्रकाशनाने शेतीसंबंधी एक अहवाल नुकताच प्रकाशित केला. या अहवालानुसार जगातील एकूण कार्बन उत्सर्जनात शेतीचा वाटा एकचतुर्थांश असून जगातील जैवविविधतेचे नुकसानही यामुळे होत आहे. अन्न उत्पादन करणे ही वातावरणासाठी भयंकर बाब बनली आहे. पर्यावरणीय घटकांचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे. संयुक्त राष्ट्रांनी अंदाज वर्तवल्यानुसार २०५७ पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्जाच्या जवळ पोहोचेल. जैवविविधतेचा ऱ्हास आणि हवामानात बदल होत असताना आपण अन्नधान्याचे उत्पादन ५० टक्क्यांनी कसे वाढविणार? हा सध्याच्या घडीला कळीचा प्रश्न आहे. जर्मनीच्या बॉन विद्यापीठातील अन्न अर्थव्यवस्था आणि विकासात्मक संशोधन केंद्राचे संचालक मॅटिन कईम (Matin Qaim) यांनी सांगितले की, शेतीसाठी अधिक जमिनीचा वापर करणे, हे हवामान बदल आणि जैवविविधतेच्या दृष्टीने सर्वात मोठे पाप असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. निसर्गाचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला कमी जागेत अधिक अन्न उत्पादित करावे लागेल, असा याचा अर्थ होतो. १० अब्ज लोकांना अन्न कसे पुरविणार? कईम यांनी या समस्येला तोंड देण्यासाठी डीडब्लू संकेतस्थळाशी बोलत असताना दोन भूमिका मांडल्या. एक म्हणजे, आपण आपल्या आहार पद्धतीत बदल करावेत. म्हणजे अन्न कमी वाया घालवणे, मांस कमी खाणे. दुसरी भूमिका म्हणजे, आपण पर्यावरणपूरक शेतीची पद्धत विकसित करेल असे तंत्रज्ञान शोधले पाहिजे. कईम यांच्या मते दोन्ही भूमिका आज गरजेच्या आहेत. एक तर आपण अन्नाचे उत्पादन करण्याची पद्धत बदलली पाहिजे. तर दुसरीकडे प्राण्यांच्या माध्यमातून घेत असलेले प्रथिने आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण कमी केले पाहिजे. पण या दोन्ही गोष्टी करून भागणार नाहीत. अनेक तज्ज्ञ आणि कईम यांच्या मते जनुकीय तंत्रज्ञान हा शाश्वत अन्नपद्धतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कमी जागेत, कमी रासायनिक कीटकनाशके आणि कमी खतांचा वापरून अधिक अन्न उत्पादन करण्याची इच्छा सर्वांनाच आहे. जर तुम्ही जनुकीय सुधारित वाण वापरून अधिक सहनशील आणि अधिक प्रतिरोधक असे उत्पादन घेणार असाल तर हे चांगलेच आहे ना!, अशी भूमिका कईम यांनी मांडली. हे वाचा >> जनुक संस्कारित पिकांचे धोके जनुकीय सुधारित (GM) अन्न म्हणजे काय? जनुकीय सुधारित जीव (Genetically modified organisms) यांच्या जनुकीय रचनेत बदल केलेले असतात. जनुकीय सुधारित पिकांमुळे उत्पादनात वाढ होते. कीटकांपासून प्रतिरोध करण्याची त्यांची क्षमता वाढलेली असते, तसेच थंडी किंवा दुष्काळात तग धरून राहण्याची त्यांची सहनशीलताही अधिक असते. जनुकीय बदल करून पिकांद्वारे होणारे कार्बन उत्सर्जनदेखील कमी करणे आणि शाश्वत अन्न उत्पादनात वाढ करता येऊ शकते. व्यापक दृष्टीने पाहता, बिगरजनुकीय उत्पादनाच्या तुलनेत तेवढेच उत्पादन जनुकीय सुधारित पीक केवळ १० टक्के जमिनीवर घेऊ शकते. जीएम म्हणजे जुनकीय सुधार हे दुसरे-तिसरे काही नसून प्रजनन तंत्रज्ञान आहे. गेल्या हजारो वर्षांपासून जिज्ञासू आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी निरीक्षणाच्या माध्यमातून पिकांच्या हजारो वाणांची निर्मिती केली. मात्र आता अत्याधुनिक पद्धतीने या प्रक्रियेत आपल्याला हवे तसे बदल, तेही अगदी वेगाने करता येत आहेत, अशी माहिती डेव्हिड स्पेन्सर यांनी दिली. डेव्हिड हे रिप्लॅनेट (Replanet) संस्थेचे प्रवक्ते आहेत. जैवविविधतेचे नुकसान आणि हवामान बदलावर वैज्ञानिक उपाय शोधण्यासाठी बिगरसरकारी संस्थांसोबत रिप्लॅनेट काम करीत आहेत. जनुकीय सुधारित जीव (GMOs) याचा वापर सर्वात पहिल्यांदा अमेरिकेत १९९४ साली करण्यात आला. तेव्हा याचा वापर टोमॅटो पिकांवर करण्यात आला होता. त्यानंतर सोयाबिन, गहू आणि तांदूळ पिकांसाठीदेखील जनुकीय सुधारित बियाणे वापरण्यास सुरुवात झाली. यासोबतच जनुकीय सुधारित जिवाणूंमुळे प्रथिनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले. हे ही वाचा >> जनुकीय तंत्रज्ञानाविना शेतीची माती भारतामधील शास्त्रज्ञांनी सब १ (स्वर्णा) हे तांदळाचे वाण विकसित केले आहे. हे वाण पूर प्रतिरोधक आहे. उत्तर भारतातील आणि बांगलादेशमधील भात उत्पादन क्षेत्रात पुराची मोठी समस्या भेडसावते. सब १ हे वाण पूर प्रतिरोधक असल्यामुळे चांगले उत्पादन देते. सध्या साठ लाख शेतकरी सब १ हे वाण वापरून तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. त्याचप्रमाणे गोल्डन राइस हेही जनुकीय सुधार केलेले वाण आहे. आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये 'अ' जीवनसत्त्वाची कमतरता भासते, त्या पार्श्वभूमीवर 'अ' जीवनसत्त्वाने युक्त असलेले गोल्डन राइस हे वाण शोधण्यात आले. रोगप्रतिकारक क्षमता जनुकीय बदल करणाऱ्या तंत्रज्ञानामुळे पिकांवरील रोगावर नियंत्रण आणण्यास मदत होत आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस हवाईमध्ये पपई पिकांवर रिंगस्पॉट नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगामुळे संपूर्ण हवाईमधून पपईचे पीक नष्ट झाले. मात्र त्यानंतर स्थानिक संशोधकांनी जनुकीय बदल केलेले पपई वाण शोधले आणि या रोगाचा प्रतिबंध करण्याचा मार्ग शोधला. एका दशकानंतर या वाणाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आणि पुन्हा जोमाने पपईचे पीक घेतले गेले. रिप्लॅनेटचे डेव्हिड स्पेन्सर हे सुद्धा अमेरिकेत सोयाबिनला बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी नवीन वाण शोधण्याच्या मोहिमेवर आहेत. डीडब्ल्यू संकेतस्थळाशी बोलत असताना ते म्हणाले, सध्या बुरशीनाशक फवारणी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पण कुणालाही (शेतकऱ्यांना) हा पर्याय नको आहे. त्यामुळेच आम्ही बुरशीरोधक जनुकीय रचना असणारे वाण शोधत आहोत. जीएमशी निगडित असलेले वाद २०२० साली २० देशांमध्ये जनुकीय तंत्रज्ञानावर आधारित अन्नासंबंधी सर्व्हे घेण्यात आला. ज्यामध्ये ५० टक्के लोकांनी सांगितले की, जनुकीय बदल केलेले अन्न खाण्यासाठी योग्य नाही. तसेच असे अन्न सुरक्षित नसल्याचेही मत अनेकांनी नोंदविले. ३० वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा जनुकीय बदल केलेले वाण वापरण्यात आले, तेव्हा याच्या सुरक्षिततेबाबत शास्त्रज्ञांनी अनिश्चितता आणि चिंता व्यक्त केली होती. पण त्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. बायोसेफ्टी या दक्षिण आफ्रिकेतील कंपनीचे विश्लेषक जेम्स रोड्स म्हणाले, ३० वर्षांचा अभ्यास आणि निरीक्षणातून लक्षात येते की, जनुकीय सुधार केलेले अन्न हे पारंपरिक अन्नापेक्षा अधिक सुरक्षित आहे. आमच्याकडे ३० वर्षांच्या प्रयोगाची आकडेवारी आहे. जीएम आधारित अन्न खाण्यासाठी अतिशय सुरक्षित असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तसेच असे पीक पर्यावरणासाठीदेखील घातक नसल्याचे या अभ्यासातून लक्षात आले आहे, असेही ते म्हणाले. जीएमच्या वापरात खत उत्पादक कंपन्यांचा खोडा मॅटिन कईम यांच्या म्हणण्यानुसार, विविध कृषी उत्पादने करणाऱ्या बड्या कॉर्पोरेट औद्योगिक कृषी कंपन्यांनी जीएम वापरण्यासंबंधी मोठा वाद निर्माण केला आहे. मोनसँटो ही शेती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी अनेक वर्षांपासून याचा विरोध करीत आहे. कईम यांनी सांगितले की, मोनसँटोसारखी कंपनी कीटकनाशके आणि महागडे बियाणे शेतकऱ्यांना विकते. तसेच शेतीच्या क्षेत्रातील चुकीचे पायंडे या कंपनीकडून घातले गेले आहेत. आणखी वाचा >> ‘जीएम’ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी पोषक की घातक? कईम पुढे म्हणाले की, काही निवडक लोकांच्या हातात कॉर्पोरेट औद्योगिक कृषी क्षेत्र असणे, ही चुकीची बाब आहे. जनुकीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत असे नाही. जनकीय तंत्रज्ञानावर बंदी आणणे म्हणजे अमली पदार्थ आणि पोर्नोग्राफीमुळे इंटरनेटवर बंदी आणण्यासारखे आहे. इंटरनेटवर बंदी आणली तरी या दोन्ही गोष्टी सुरू राहतीलच, ही त्यातली मेख आहे. जनुकीय तंत्रज्ञान (जीएम) उद्योग बदलतोय जनुकीय तंत्रज्ञान आता बड्या कॉर्पोरेट उद्योगांच्या विरोधाच्याही पुढे गेला आहे. स्थानिक छोट्या शेतकऱ्यांना कोणत्या समस्या भेडसावतात त्या आधारावर जनुकीय तंत्रज्ञान काम करीत असून छोट्या शेतकऱ्यांना उपयोगी होईल, असे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे जनुकीय तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. नियमन आणि परवाने देणे हे सध्या या तंत्रज्ञानाच्या वापरातील सर्वात मोठे आव्हान आहे. रिप्लॅनेट यासाठी काम करीत असून जनुकीय तंत्रज्ञानाचा प्रचार करीत आहे. कईम म्हणाले की, मानवतावादी सार्वजनिक संघटनाकडून जनुकीय सुधारित वाण कोणत्याही पेटंटशिवाय विकसित केले जात आहेत. यासाठी आपल्याला उत्तम नियमन करणे आणि बाजारात स्पर्धा असल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कारण कॉर्पोरेट औद्योगिक कृषी उत्पादन हे चुकीचे मॉडेल आहे.