मंकीपॉक्स संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शनिवारी (२३ जुलै) ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ची घोषणा केली. मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाबाबत चर्चा केल्यानंतर आठवडाभाराने ही आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढताना दिसत आहे. ही आणीबाणी घोषित करताना डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले की, “मंकीपॉक्स संसर्गाचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणीच्या पातळीवर पोहोचला आहे. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत या विषाणूचा उद्भाव झाला असून गेल्या अनेक दशकांपासून हा विषाणू तेथे अस्तित्वात आहे. तथापि, हा विषाणू आता इतर देशातही पसरला आहे. अमेरिका, कॅनडा आणि अगदी भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. युरोपमध्ये सर्वात जास्त गंभीर स्थिती आहे.

सार्वजनिक आरोग्य आणीबाणी कधी जाहीर केली जाते?

‘पब्लिक हेल्थ इमरजेंसी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न’ (PHEIC) ही जागतिक आरोग्य संघटनेची लोकांना सतर्क करण्याची अथवा इशारा देण्याची सर्वोच्च पातळी आहे. WHO ने PHEIC ची व्याख्या- एक असाधारण घटना अशी केली आहे. एखाद्या आजाराचा किंवा विषाणूचा संसर्ग आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचल्यानंतर सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो. अशावेळी संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधणं आवश्यक असतं, त्यावेळी सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली जाते.

मंकीपॉक्स संसर्गासाठी आणीबाणी जाहीर करण्यासाठी १६ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. WHO च्या लसीकरण विभागाचे माजी संचालक जीन-मेरी ओक्वो-बेले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. या समितीनं मंकीपॉक्सच्या धोक्याची चर्चा केली. यावर समिती एकमत होण्यात अयशस्वी ठरली. पण मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता, सार्वजानिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यात आली.

WHO ने यापूर्वी अशी आणीबाणी कधी जाहीर केली?
जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्या दोन दशकांत सातवेळा सार्वजानिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. २००९ मध्ये स्वाइन फ्लू, २०१४ मध्ये पोलिओ आणि इबोला, २०१५ मध्ये झिका, २०१९ मध्ये इबोला आणि कोविड-१९ या आजारांसाठी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. त्यानंतर शनिवारी (२३ जुलै) मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजारासाठी आणीबाणी घोषित केली आहे.

मंकीपॉक्स विषाणू कसा पसरतो?
मंकीपॉक्स रोगाचा विषाणू ‘फ्लेविविरिडे विषाणू’ या कुटुंबातून येतो आणि हा रोग माकडांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. याला ‘मंकी फिव्हर’ असंही म्हणतात. मंकीपॉक्स हा प्राण्यापासून माणसात आणि नंतर माणसापासून माणसात पसरू शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्स विषाणूमुळे होणाऱ्या गंभीरतेबद्दल चेतावणी दिली आहे. या आजारामध्ये त्वचा संक्रमण, न्यूमोनिया, भ्रम आणि डोळ्यांच्या समस्यांचा समावेश आहे. मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, लिम्फ नोड्स सुजणे, थंडी वाजणे आणि थकवा येणे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठते आणि याची सुरुवात चेहऱ्यापासून होते, जी सहसा संसर्ग झाल्यानंतर ६-१३ दिवसांनंतर दिसू लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंकीपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
१. अलीकडेच विषाणूचे निदान झालेल्या किंवा ज्यांना संसर्ग झाला असेल अशा लोकांच्या संपर्कात येणे टाळा.
२. जर तुम्ही लक्षणे असलेल्या एखाद्याच्या जवळच्या संपर्कात असाल तर फेस मास्क वापरा.
३. शारीरिक संबंध ठेवल्यास कंडोमचा वापर करावा.
४. व्हायरस वाहून नेणाऱ्या प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळा. यामध्ये आजारी किंवा मृत प्राणी आणि विशेषत: ज्यांना संसर्गाचा इतिहास आहे, जसे की माकडे, उंदीर आणि कुत्रे यांचा समावेश आहे.
५. आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवा किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा.
६. पुष्टी किंवा संशयित मंकीपॉक्स संसर्ग असलेल्या रूग्णांची काळजी घेताना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरा.