अभिनेता समीक्षक कमाल खानला अटक झाली आणि साऱ्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरू झाली. २०२० साली काही दिग्गज अभिनेत्यांबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी केआरकेला अटक झाल्याचं समोर आलं आहे. पण ही काही पहिली वेळ नाही, आज बॉयकॉट बॉलिवूड हा जो ट्रेंड सुरू झालाय याचा खरा कर्ता धर्ता हा केआरकेच आहे. बऱ्याच वर्षांपासून तो बॉलिवूडबद्दल आणि खासकरून हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल अशी विधानं करत आहे. गेल्या काही दिवसांत त्याची ही वादग्रस्त वक्तव्य फारच टोकाला गेल्याने त्याला अटक करण्यात आलं असल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियावर ही अटक करण जोहरने घडवून आणल्याचीही चर्चा करत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी करणने केआरकेला अटक केल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केआरके हा प्रथम २००८ च्या ‘देशद्रोही’ चित्रपटातून पुढे आला. या चित्रपटात त्याने फक्त अभिनयच नाही तर लिखाण आणि दिग्दर्शनसुद्धा केलं होतं. त्याच्या या पहिल्याच चित्रपटात त्याने उत्तरेकडच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये कशी दुय्यम वागणूक दिली जाते यावर प्रकाश टाकला होता. हा चित्रपट सपशेल आपटला, महाराष्ट्रात तर या चित्रपटावर तब्बल २ महीने बंदी घातली होती.

पुढच्याच वर्षी म्हणजे २००९ मध्ये केआरकेनी बिग बॉस ३ या रिअलिटी शोच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला. तिथेही त्याची अशीच वागणूक होती. इतर स्पर्धकांशी तो सतत भांडायचा. एका स्पर्धकाला तर त्याने बाटली फेकून मारायचा प्रयत्न केला होता आणि त्याला जीवेमारण्याची धमकीदेखील दिली होती. केआरकेच्या अशा वागणुकीमुळे तो बिग बॉसच्या घरातूनही बाहेर पडला.

आणखी वाचा : केआरकेला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

त्यानंतर तो स्वयंघोषित चित्रपट समीक्षक बनला. २०१० मध्ये त्याने ट्वीटरवर स्वतःचं अकाऊंट उघडलं आणि नंतर लगेच २०१३ मध्ये त्याने स्वतःचं अधिकृत युट्यूब चॅनलदेखील सुरू केलं. या दोन्ही माध्यमातून तो प्रत्येक चित्रपटाबद्दल स्वतःचं मत स्वतःच्या अशा खास शैलीत मांडू लागला. त्याचे काही व्हिडिओ लोकांनी पसंत केले. त्यानंतर तो स्वतःला बॉलिवूडचा अभ्यासक म्हणवून घेऊ लागला. त्याच्या समीक्षणातून तो येणाऱ्या चित्रपटावर आणि येऊ घातलेल्या चित्रपटांवर असभ्य अशा भाषेत टीका करायला लागला. चित्रपटात अभिनेता कुणीही असो केआरके त्याच्या या खास शैलीत प्रत्येक चित्रपटाबद्दल वाईट समीक्षण देत होता. इतकंच नाही तो लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावरही टिप्पणी करायला लागला.

चित्रपटसृष्टीतल्या कोणत्याच व्यक्तीने केआरकेकडे गांभीर्याने पाहिलं नाही. बऱ्याचदा त्याच्या व्हिडिओवर त्या व्यक्ति पोट धरून हसायच्या. शाहरुख खानला स्वतःचा स्पर्धक म्हणणारा, सलमान खानला ‘२ रुपयांचा अभिनेता’ म्हणून हिणवणाऱ्या कमाल खानची सगळेच खिल्ली उडवू लागले होते. इतकंच काय तर आजच्या काळातल्या वरुण धवन, रणवीर सिंगसारख्या नव्या अभिनेत्यांच्या बाबतीतही केआरके अशीच भाषा वापरत होता. नुकत्याच आलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘लाइगर’सारख्या चित्रपटांबद्दल सुद्धा त्याने अशीच टीका केल्याचं आपण पाहिलं आहे. अक्षय कुमारला ‘ढोंगी’ म्हणणं, विजय देवरकोंडाला एनाकोंडा म्हणून संबोधणं इतकंच नव्हे तर क्रिकेटर विराट कोहलीच्या खराब खेळीसाठी अभिनेत्री अनुष्का शर्माला जबाबदार ठरवणं अशी कित्येक वक्तव्यं केआरकेने केलेली आहेत. ट्वीटर, युट्यूब, आणि इनस्टाग्रामवर केआरकेचे भरपूर फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडिओकडे किंवा टिप्पणीकडे लोकं मस्करी म्हणून बघतात. एवढंच नव्हे तर तो जे बोलतो ते ऐकताना समोरच्याला माहीत असतं की हा आता पातळी सोडून बोलत आहे तरी लोकं त्याचे व्हिडिओ ऐकतात, शेअर करतात.

आणखी वाचा : बहुचर्चित ‘लाइगर’ चित्रपटाबद्दल अभिनेता, समीक्षक केआरकेने केली वेगळीच भविष्यवाणी!

मनोज बाजपेयी यांना ‘व्यसनी’ म्हणणं, सलमान खानला ‘डाकू’ म्हणणं ही बऱ्याचदा केआरकेला चांगलंच महागात देखील पडलं आहे. मनोज बाजपेयी आणि सलमान खान या दोघांनी त्याच्याविरुद्ध मानहानीची तक्रारदेखील दाखल केली होती. त्यानंतर केआरके ने ट्वीट डिलिट केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे सध्या कुणीच केआरकेची वक्तव्यं मनावर घेत नाही. मध्यंतरी तर त्याने स्वतःचं आडनाव काढून बायकोचं आडनाव लावणार असल्याचंही ट्वीट केलं होतं. त्याप्रमाणे त्याने ‘कमाल राशीद कुमार’ असं स्वतःच्या ट्वीटर आकाऊंटचं नाव देखील बदललं होतं.

एकंदरच केआरकेच्या अटकेमागे हा एवढा मोठा इतिहास आहे. केवळ २ दिग्गज दिवंगत अभिनेत्यांबद्दलच नव्हे तर याआधीही त्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीबद्दल अशीच वक्तव्यं दिलेली आहेत. उत्तर प्रदेशच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या केआरकेच्या खासगी आयुष्याबद्दल फारसं कुणाला काहीच माहीत नाही. चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या केआरकेला बॉलिवूडच्या दिग्गज लोकांवर टीका करून नेमकं मिळवायचंय तरी काय हे सांगणं खरंच अवघड आहे. केआरकेने नुकतंच एक विधान केलं होतं जे त्याच्या इतर विधानांप्रमाणेच कुणीच मनावर घेतलं नाही. तो म्हणतो की “माझा आगामी देशद्रोही २ हा चित्रपट हा एस एस राजामौली यांच्या बाहुबली २ पेक्षा जास्त भव्य असेल.” अटक झाल्यानंतर केआरके यापुढे अशी वक्तव्यं देणार की नाही ते मात्र येणारा काळच ठरवेल!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is kamaal rashid khan who always criticized bollywood in very disrespectful way avn
First published on: 31-08-2022 at 15:18 IST